बेरोजगारांच्या प्रश्नांवरून भाऊ-बहिण आमने सामने, वायएस शर्मिला रेड्डी यांचा भावाविरोधात मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्रप्रदेशात  राजकीय संघर्ष चिघळताना पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी या बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी मोर्चा उघडला आहे.

आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो मंत्रालय नारा दिला. बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्न आंध्र प्रदेशमध्ये निर्माण झाला आहे. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगनमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. यादरम्यान, वायएस शर्मिला रेड्डी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारला सवाल केला आहे की, आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार आहात का?

वायएस शर्मिला रेड्डी यांनी विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन (काँग्रेस कार्यालय) येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी जगन मोहन रेड्डी सरकारच्या विरोधातील आरोपांचा पाढे वाचले, त्या म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तसेच राज्य सरकार आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असून स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल, आमच्या कार्यकर्त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशारा शर्मिला रेड्डी यांनी यावेळी सरकारला दिला.

आक्रमक झालेल्या वायएस शर्मिला रेड्डी यांनी त्यांचा भाऊ जगनमोहन रेड्डी यांना धारेवर धरले, त्या पुढे म्हणाल्या की, आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी, यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी, लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतावादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान आता पोलिसांनी वायएस शर्मिला रेड्डी यांना  ताब्यात घेतले आहे.