
तालुक्यातील चिचोंडी पाटील व आठवड या गावांमध्ये एकूण 11 अंगणवाडी केंद्रे असून, या अंगणवाडी केंद्रांमध्ये निकृष्ट दर्जाचे पोषण आहारवाटप सुरू आहे. याबाबत चिचोंडीच्या सरपंचांनी पोषण आहाराची पोलखोल करीत जिल्हा परिषद सीईओंकडे तक्रार केली आहे.
नगर तालुक्यामध्ये अनेक गावांत पोषण आहाराच्या वाटपाबद्दल तक्रारी आहेत. चिचोडी पाटील आणि आठवड या गावांमधील 11 अंगणवाडी केंद्रांतून पोषण आहाराचे वाटप सुरू आहे. याबात ग्रामस्थांनी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्याकडे पालकांसह अंगणवाडीसेविकांनी लेखी व तोंडी तक्रार केली होती. आज सरपंच पवार यांनी अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन शहानिशा केली असता, यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
लाभार्थी बालकांना शासनातर्फे दिला जाणारा ‘टीएचआर’ आहाराची वैधता संपलेली असतानाही त्याचे वाटप येथील कंत्राटदाराकडून केले गेले आहे. या ‘टीएचआर’ आहारात अनेक त्रुटी आढळून आल्या असून, हा पोषण आहार एकात्मिक बालविकास योजनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही. त्यात प्रोटिन, लोह, कॅल्शियम, थायमिन, साखर, शेंगदाणे अशा अनेक घटकांचाही समावेश नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.
याबाबत सरपंच शरद पवार यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्याकडे तक्रार केली. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन निकृष्ट आहाराचे वाटप त्वरित थांबवून वाटप केलेला आहार लाभार्थ्यांकडून परत मागवावा. या पोषण आहाराचे अन्न व औषध प्रशासनामार्फत परीक्षण व्हावे, या बनावट महिला बचत गटाचे टेंडर तत्काळ रद्द करावे, त्याची बिले-देयके तत्काळ थांबवावीत, यापूर्वीची शासनाची देयकांची रक्कम व्याजासह वसूल करावी, तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी सरपंच पवार यांनी केली.
बालकांची तब्येत खालावली
तालुक्यातील चिचोंडी पाटील व आठवड या गावांतील अनेक लाभार्थ्यांनी पोषण आहार अंगणवाडीतून घेतला आहे. याचे सेवन केल्यानंतर अनेक बालकांना उलटय़ा, जुलाब, मळमळ झाल्याचे अनेक पालकांनी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांना लेखी कळविले आहे.




























































