
हिंदुस्थान आणि मालदीवमध्ये जुने संबंध आहेत. मात्र मालदीवमध्ये गेल्या काही वर्षांपासून चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. चीनमुळे हिंदुस्थान आणि मालदीव या देशांमध्ये दरी निर्माण होत आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात ‘इंडिया आऊट’ नावाचे टी-शर्ट घालून मालदीवचे काही लोक निदर्शने करत असल्याचे दिसते.
हिंदुस्थानसारखा मित्र गमावणे मालदीवला परवडणारे नाही आणि त्यामुळे सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘इंडिया आऊट’ मोहीम रेटणाऱ्या माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन (Abdulla Yameen) यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सत्ताधारी पक्षाने हा निर्णय घेतला आहे.
मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन (Abdulla Yameen) हे चीनच्या धोरणांना पाठिंबा देणारे असून त्यांनी सध्या हिंदुस्थानविरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यांच्या मार्फतच देशात ‘इंडिया आऊट’ नावाची मोहीम चालवली जात आहे. या मोहिमेमुळे हिंदुस्थानसोबतचे संबंध विकोपाला जातील अशी शक्यता असल्याने मालदीव सरकार नवीन विधेयक घेऊन येत आहे. यामुळे मालदीवमध्ये हिंदुस्थानविरोधी घोषणा दिल्यास संबंधित व्यक्तीची तुरुंगात रवानगी केली जाईल, तसेच त्याला दंडही ठोठावला जाईल.
नव्या विधेयकानुसार हिंदुस्थानविरोधी घोषणाऱ्या देणाऱ्याला 20 हजार मालदीवियन रुफिया दंड आणि सहा महिने तुरुंगाव किंवा एक वर्षासाठी नजरबंद केले जाईल. याबाबत मालदीवचे पत्रकार अहमद अजान यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. मालदीवने ‘इंडिया आऊट’ घोषणेला अपराध घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी पक्षाद्वारे तयार करण्यात आलेल्या विधेयकानुसार या मोहिमेत भाग घेणाऱ्याला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असे ट्वीट अहमद अजान यांनी केले आहे.
Govt of Maldives has decided to criminalize the use of #IndiaOut slogan. According to a bill drafted by the ruling party, those who take part in the campaign can be jailed up to 6 months.
— Ahmed Azaan (@axanner) January 30, 2022
ही मोहीम कशी सुरू झाली?
माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांचे समर्थक मालदीवमधील हिंदुस्थानी सैनिक आणि उपकरणांविरोधात आंदोलन करत आहेत. याची सुरुवात 2018 मध्ये झाली होती. हिंदुस्थानने आपले हेलिकॉप्टर आणि विमान आपल्या देशात न्यावे यासाठी यामिन यांनी मोहीम सुरू केली असून याला ‘इंडिया आऊट’ असे नाव देण्यात आले आहे.

























































