सणासुदीला गोड खाताना…

>>  अर्चना रायरीकर (आहार तज्ञ)

सणासुदीला आपण जे वेगवेगळे पदार्थ खातो त्यामध्ये साखर ही खूप जास्त प्रमाणात खाल्ली जाते. आपण जी रिफाइंड साखर खातो ती आपल्या शरीरामध्ये पटकन शोषली जाते आणि त्यामुळे वजन वाढणे, शरीरातील चरबीचे प्रमाण वाढणे तसेच शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्राईग्लिसराइड वाढणे, फॅटी लिव्हर अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात.

मोदक, पेढे, लाडू, बर्फी यांमध्ये भरभरून साखर असते. बऱयाच जणांना असेही वाटेल की, असे सण आपल्या आयुष्यात काही रोज येत नाहीत. त्यामुळे कधीतरी खाल्ले तर काय होते? परंतु हा नियम सर्वांना लागू पडत नाही. कारण काहींना डायबिटीस असतो किंवा काहींना वैद्यकीय आजार असतो. त्यांना मात्र जास्त निष्काळजीपणा भारी पडू शकतो.

त्यातल्या त्यात पांढरी साखर ही शरीराला जास्त हानीकारक ठरते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पोषक घटक असत नाहीत आणि बऱयाच लोकांना असं वाटतं की, आपण साखर खूप कमी खातो. परंतु जर तुम्ही ब्रेड, बिस्कीट, मैदायुक्त पदार्थ खात असाल, जाम किंवा जेली खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये अशी भरपूर साखर जाते.
सणासुदीला साखर जर कमी खायची असेल तर काही टिप्स याप्रमाणे…

दिवसाची सुरुवात आपण चहा किंवा कॉफीने करतो. सणासुदीला बिनसाखरेचा किंवा कमी साखर घातलेला चहा घ्यावा. म्हणजे सुरुवात तरी कमी साखरेने करावी.
साखरेला अनेक पर्याय आहेत. उदाहरणार्थ,
– आपण जर घरामध्ये मोदक बनवत असाल किंवा लाडू बनवत असाल तर साखरेऐवजी आपण गूळ वापरू शकतो. रसायनविरहित गुळाची पावडरदेखील वापरू शकतो.
– गुळाच्या पावडरबरोबर लिक्विड गूळदेखील मिळतो.
– अजून एक नैसर्गिक पदार्थ म्हणजे खजूर. खजूर पाण्यात भिजवून आपण त्याचा कोळ वेगवेगळय़ा पदार्थांमध्ये वापरू शकतो किंवा खजूर पाण्यात न भिजवता मिक्सरला वाटून आपण त्याचा पल्प पण लाडू बनवण्यासाठी, इतर गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो.
– मनुकांमध्येदेखील नैसर्गिक गोडवा असतो. आपण आदल्या रात्री या मनुका भिजत घालून दुसऱया दिवशी जर खाल्ल्या तर पोट साफ होते, तसेच रक्त शुद्ध होते आणि हिमोग्लोबिनदेखील वाढू शकते.
– अंजीरदेखील आपल्याला पाण्यात भिजवून दुसऱया दिवशी वापरता येतात किंवा थेट मिक्सरला लावून विविध पदार्थांमध्ये आपण ते वापरू शकतो.
आजूबाजूला लोक जेव्हा गोड पदार्थ खात असतात, तेव्हा आपल्यालादेखील ते खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस शक्य असेल तर आपण फळे नक्की खाऊ शकतो.
अति साखर आपल्याला मारक ठरणार आहे हे आपल्याला माहीत असते तरीही आपण आपल्या जिभेचे गुलाम असल्याने आणि इतरांच्या आग्रहाला बळी पडून ‘‘अजून एक गुलाबजाम घ्या’’ असा आग्रह झाला की, ‘‘जाऊ दे, आज खाऊन घेऊ या’’ असा विचार करतो, परंतु लक्षात घ्या, उद्या कधी उजाडत नाही. आपल्याला खातापिताना कायम जागरूक असणे गरजेचे असते.