नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक,ब्रिटनमध्ये पकडवॉरंट जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लंडन

ब्रेकिंग न्यूज: अखेर नीरव मोदीला अटक

 

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून लंडनला पळून गेलेला हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी याच्यावर येथील वेस्टमिंस्टर कोर्टाने पकडवॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी 13 हजार 700 कोटींना पंजाब नॅशनल बँकेला बुडवले आहे. त्या दोघांनीही परदेशात पलायन केले असून पीएनबी घोटाळय़ाची चौकशी सीबीआय आणि ‘ईडी’ म्हणजे अंमलबजावणी संचालनालय करत आहे.

नीरव मोदी याच्याबाबत जारी करण्यात आलेल्या ‘रेड कॉर्नर’ नोटिसीवर कारवाई करून त्याला त्वरित अटक करावी अशी मागणी सीबीआयने इंटरपोल आणि ब्रिटनच्या सरकारकडे केली होती. तसेच मोदी याचे प्रत्यार्पण करण्यात यावे अशी मागणी ब्रिटनकडे करण्यात आली आहे. नीरव मोदी हा लंडनमध्ये ऐषोआरामात जगत असून त्याने तिथे हिऱ्यांचा व्यवसायही सुरू केल्याचा व्हिडीओच ‘टेलिग्राफ’ या इंग्रजी दैनिकाने प्रसृत केला होता. मोदी हा लंडनमध्ये 72 कोटींच्या फ्लॅटमध्ये राहत असून त्यासाठी महिन्याला 15 लाखांवर भाडे देत आहे, असे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानने केलेल्या विनंतीनुसार ब्रिटनच्या गृह सचिवांनी न्यायालयात कायदेशीर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले होते.

पत्नीवर अजामीनपात्र वॉरंट

अंमलबजावणी संचालनालयाच्या विशेष न्यायालयाने पीएनबी घोटाळय़ात नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिच्यावर अजामीनपात्र  वॉरंट नुकतेच बजावले आहे. त्याआधी ‘ईडी’ने नवे आरोपपत्र दाखल केले असून नीरवच्या पत्नीला पहिल्यांदा आरोपी बनवले आहे.