
लोकलची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेकडे पाहून अश्लील कृत्य करणाऱ्या शमशाद मुमताज अन्सारीला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली. तक्रारदाराची बहीण लोअर परळ ते चर्चगेट असा लोकलने प्रवास करते. गेल्या आठ-दहा दिवसांपासून शमशाद हा तक्रारदारांच्या बहिणीच्या पाठलाग करायचा. प्रवासादरम्यान तो तक्रारदारांच्या बहिणीकडे अश्लील नजरेने पाहायचा. महिलेने सुरुवातीला त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले, मात्र शमशादचे अश्लील कृत्य सुरूच राहिल्याने अखेर महिलेने याची माहिती तिच्या भावाला दिली. सोमवारी तक्रारदार आणि त्याची बहीण हे लोअर परळ स्थानकात लोकलची वाट पाहत उभे होते तेव्हा शमशाद तेथे आला. महिलेला पाहून तो पुन्हा अश्लील कृत्य करू लागला. हा प्रकार तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर त्याने शमशादला जाब विचारला. जाब विचारल्यावर शमशादने तक्रारदारांना धक्का मारून पळून जायचा प्रयत्न करत होता. तक्रारदाराने पाठलाग करून शमशादला पकडून मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.


























































