
सध्या मुंबईत ‘काळा घोडा फेस्टिव्हल’ सुरू आहे. यामधील अनेक कलाकृती कलारसिकांची मने जिंकून घेताना दिसत आहेत. संविधानाचा जागर करणारे ‘कोरो इंडिया’चे मांडणी शिल्प लक्षवेधी ठरत आहे. चर्चगेट स्टेशनजवळील क्रॉस मैदानात ही कलाकृती उभारण्यात आली आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत हे मांडणी शिल्प पाहता येणार आहे.
आपल्या समाजातील वैविध्यता, विविध समूहांचे प्रतिनिधित्व दाखवणारे हे आर्ट इन्स्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून तयार केलेले आहे. कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्ये लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. या मांडणी शिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध कला प्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आले नाही, त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या तळातल्या कार्यकर्त्यांनी या आर्ट इन्स्टॉलेशनकरिता जमेल ती वर्गणी दिली आहे, हे मांडणी शिल्पाचे वैशिष्टय़ आहे.
‘कोरो इंडिया’ ही संस्था गेल्या 33 वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी काम करीत आहे. फेस्टिव्हल सुरू झाल्यापासून मांडणी शिल्पाजवळ विविध कलाकारांनी समतेची गाणी सादर केली आहेत. युवकांनी संविधानावर आधारित गीतावर समूहनृत्यही सादर केले आहे.
























































