ठसा – अनिल नेने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
anil-nene

>> डॉ. सच्चिदानंद शेवडे ([email protected])

काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ शहरात मराठी अकादमीने स्वा. सावरकरांवर दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी अश्विन खरे यांनी वक्ता म्हणून आम्हाला आमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कानात भिकबाळी घातलेला उंचापुरा आणि गोरापान माणूस भेटला. कैक वर्षांची ओळख असल्यासारखा पुढे आला आणि व्याख्यानाची स्तुती करीत गप्पा मारत बसला. अगदी सहजपणे जवळीक साधत समोरच्या माणसाला आपलेसे करण्याची हातोटी असलेल्या त्या भारदस्त व्यक्तीने स्वतःची ओळख करून दिली. त्या दिवसापासून अनिल नेने या अनेक गुणसंपन्न व्यक्तीशी मैत्री सुरू झाली. चाळीस वर्षांहून अधिक काळ लंडनला राहिलेला, पण मनाने पक्का भारतीय असलेला हा माणूस आयुष्यभर माणसे जोडत राहिला, भरपूर भटपंती करीत राहिला.

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार।
शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार।।
माणसाला व्यवहारज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याकडे सांगितल्या आहेत त्यात ‘केल्याने देशाटन’ पहिल्या क्रमांकावर आहे. अनिलजींनी 60/70 देशांची भटकंती आणि खाद्यंती करून ते सार्थ केले असे म्हणायला हवे. ‘खावे त्याच्या देशा’ या त्यांच्या पुस्तकातील विविध खाद्यांनुभव वाचले तर त्यांच्या खुमासदार शैलीचे प्रत्यंतर येते. त्यापूर्वी त्यांचा ‘मनोगत’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. मराठीतील अनेक मान्यवर वृत्तपत्रांतून आणि अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘एकता’ या त्रैमासिकातून त्यांचे आजवर जवळपास दोनशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. अर्थशास्त्र, व्यापार, व्यवस्थापनशास्त्र, राजकारण, उद्योगधंदे आणि अन्य विषयांवर ते लिहीत असत. याशिवाय इंग्लंड, युरोप, भारत आणि इस्रायलमधील अनेक धर्मादाय, सामाजिक, कला व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. इंग्लंडमधील शिलर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत ते प्राध्यापक होते. एमबीए आणि एमएससी या पदव्युत्तर पदव्यांसाठी त्यांनी स्ट्रटेजिक मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल मार्केटिंग या विषयांचे अध्यापन युरोप व इंग्लंडमध्ये केले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या प्रगतीवर ते खूप समाधानी होते आणि त्यावर भरभरून बोलत असत. आकडेमोडीच्या किचकट जगात त्यांनी विनोदाचा झरा वाहता ठेवला हे कौतुकास्पद होते. याशिवाय सावरकर, सशस्त्र क्रांतिवीर, सैन्य व्यवस्था हे त्यांचे आवडते विषय होते. भोपाळला त्यांचा परिचय झाल्यावर लंडन व पुण्यातून फोन करताना खास आवाजात, ‘‘नमस्कार शेवडेशास्त्री, काय म्हणताय?’’ ही पृच्छा होत असे. आम्हाला ‘शास्त्री’ हे संबोधन का वापरता, असे विचारल्यावर, ‘‘तुमचे वडील लंडनला आले होते तेव्हा त्यांना शास्त्री म्हणत होतो म्हणून तुम्हालाही म्हणतो.’’ असे मासलेवाईक उत्तर मिळाले.

स्वित्झर्लंडच्या महाराष्ट्र मंडळात त्यांची भारतीय सैन्य पराक्रम व इतिहास या विषयावर ऑनलाइन व्याख्याने सध्या सुरू होती. तत्पूर्वी गतवर्षी त्याच मंडळात क्रांतिकारकांवर ऑनलाइन व्याख्याने दिली होती. त्याचे पुस्तक तयार झाले व त्याचे येत्या 10 डिसेंबरला पुण्यात आमच्याच हस्ते प्रकाशन होणार होते. सदर पुस्तकाला आमची प्रस्तावनाही आहे. कार्यक्रम निश्चित झाला. प्रतिवर्षानुसार गत महिन्यात त्यांनी पुण्याला येत असल्याचे कळवले. सहा महिन्यांपूर्वीच पुनश्च दिनांक निश्चितीही केली. एक संध्याकाळ निव्वळ गप्पा मारण्यासाठी आणि जेवणासाठी राखून ठेवायला सांगितली. प्रकाशन कार्यक्रमाच्या मध्यातून आम्हाला अंदमान दौऱयासाठी निघावे लागेल हे त्यांना सांगूनही झाले.

वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्सला बँकॉकसाठी निघण्यापूर्वीही त्यांचा फोन येऊन गेला. परतल्यावर पह्न करतो, हे सांगणारा त्यांचा फोन हा अखेरचा असेल याची कल्पना तरी कशी येणार? बँकॉकला त्यांचे अचानक निधन झाल्याचे वृत्त येऊन धडकले. काय आणि कसे व्यक्त व्हावे तेच समजेना. सतत माणसे जोडत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.