रंगभूमीपासून चित्रपटाच्या पडद्यापर्यंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सामना टीम

तब्बल शंभर वर्षांपूर्वी जन्मलेला, अठरा वर्षांपूर्वी कालवश झालेला, मात्र दरम्यान तब्बल सहा दशकांचा काळ मराठी मनाला मनसोक्त रिझवणारा ’पु. ल.’ नावाचा अष्टपैलू प्रतिभावान असंख्य मराठी मनांचा एक कप्पा कायमचा व्यापून बसला आहे! पुलंचं असणं… पुलंचं नसणं… ह्याचं ज्यांना अगत्य आहे, त्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी पुलंना शोभेशा शैलीत पुलंच्या जीवनाचा, त्यांच्या काळाचा, काळावर त्यांनी उमटवलेल्या अमिट नाममुद्रेचा घेतलेला वेध म्हणजे राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेलं चरित्र – ’पु. ल. चांदणे स्मरणाचे’. 8 नोव्हेंबर 2018 या दिवशी पुलंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त या चरित्रातील काही निवडक भाग सोबत प्रसिद्ध करीत आहोत.

पुष्कळ वेळा पुलंचं पहिलं पुस्तक ‘तुका म्हणे आता…’ हे मानलं जातं. त्याचा पहिला प्रयोग 8 नोव्हेंबर 1948 रोजी केला गेला आणि अनेक कारणांमुळे ते नाटक पडलं, हे खरं आहे. पण वस्तुतः हे पुलंचं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘संगीत बिचारे सौभद्र’ हे तीन अंकी नाटक लिहिलं होतं, तेव्हा ते छापलं गेलं नाही. पण 18 सप्टेंबर 1948 रोजी त्याचा पहिला आणि शेवटचा प्रयोग माटुंग्याच्या ‘आर. ए. पोतदार’ कॉलेजच्या रंगमंचावर झाला, तो ग्रँट मेडिकल कॉलेजच्या चौदाव्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं. त्या वेळी प्रेक्षक मनमुराद हसत होते, असं संबंधितांचं स्मरण आहे. मात्र त्याची संपूर्ण संहिता आता उपलब्ध नाही.

झालं असं होतं की, पुलंचे मेहुणे डॉ. श्रद्धानंद ठाकूर हे ग्रँट मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळाचे मानद सचिव होते. कॉलेजमधले विद्यार्थी दरवर्षी एक नाटक सादर करीत असत, अत्रे-वरेरकर यांची नाटकं पूर्वी करून झालेली होती. म्हणून 1948मध्ये ह्या मंडळींचा नव्या, पण विनोदी नाटकाचा शोध सुरू झाला. ठाकूर हे सल्ला मागायला पुलंकडे पुण्याला आले. त्यांनी सोबत साहाय्यक सचिव डॉ. चिमण गवाणकरांनाही नेलं होतं. पुलंनी नुकतंच एक नवं नाटक लिहिलं होतं. ते ह्या पाहुण्यांना वाचून दाखवलं. त्यांना ते आवडलं. पुलंचं सांस्कृतिक दैवत म्हणजे बालगंधर्व ह्यांनी उतारवयात सुभद्रा, रुक्मिणी अशी कामं करणं त्यांना पटत नव्हतं. तीन जुने नटवर्य आपल्या जुन्या नाटकांचा संयुक्त प्रयोग करण्याचं ठरवतात. पण तालीम बाजूला राहून त्यांचे वृद्धापकाळातले आजार, त्यावरची नाना औषधं-‘पॅथी’ वगैरेंबाबतच जास्त बोलतात आणि खरा नाटय़प्रेमी ‘सौभद्रावरचे हे अत्याचार थांबवा’ असं आवाहन करतो, असा काहीसा भाग त्यात होता. पुढे 2010मध्ये ह्या नाटकाची संहिता मिळवण्याचा, तेव्हाच्या कलाकारांच्या स्मरणातून गोळा करण्याचा खूप प्रयत्न झाला. त्यातून जी काही संयुक्त संहिता तयार झाली, तिचा एकपात्री प्रयोग 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या वास्तूमध्ये बेळगावचे डॉ. अशोक साठे ह्यांनी केला. हा पुढचा भाग झाला. पण पुलंच्या पहिल्या स्वतंत्र नाटकानं त्यांना यशाची चव चाखू दिली नाही हेच खरं. ज्याची संहिता नाना जोग-प्रा. मं. वि. राजाध्यक्ष वगैरेंनी वाखाणली होती, ज्याच्या दिग्दर्शनासंबंधी प्रत्यक्ष चिंतामणरावांनी काही सूचना केल्या होत्या, ज्याची नांदी आणि गीतं माडगूळकरांनी लिहिली होती; त्या नाटकाला व्यावसायिक यशानं हुलकावणी दिली. रंगभूमीची ल्हज्rाdग्म्taंग्त्ग्tब्, यशाची अनिश्चितता तेव्हा त्यांना नक्कीच भिडली असेल. पण स्वभावानुसार कटुता मागे टाकून ते पुढे गेले. 1948 मध्येच त्यांचा ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट आला. 10 मार्च रोजी भारत चित्रदर्शन संस्थेतर्फे तो पडद्यावर झळकला. त्याला बरा प्रतिसाद आला. असा आशानिराशेचा खेळ सुरूच होता.

1948च्या अखेरीस ते राहत असलेल्या ‘सुदर्शन’ ह्या घरासमोरच्या ‘आश्रम’ ह्या घरात पुलंना तीन खोल्यांचं आणि ‘फुल्ली फर्निश्ड’ घर मिळण्याची शक्यता अचानक निर्माण झाली. तिथे राहणारं भागवत कुटुंब काही काळासाठी आफ्रिकेला चाललं होतं. त्यांची देशपांडे मंडळींशी चांगली जानपहचान होती. सुदर्शनमध्ये सुनीताबाईंना खालून पाणी भरण्याचं काम पडतंय, हे भागवतांना दिसत होतं. म्हणून त्यांनीच हा प्रस्ताव मांडला. आपल्याला आपलं स्वतंत्र स्वयंपाकघर मिळतंय, ह्या कल्पनेनं सुनीताबाई हरखल्या. 1949 आणि 1950 ह्या दोन वर्षांत पुल व सुनीताबाई आनंदानं ‘आश्रम’मध्ये राहिले. आश्रममध्ये राहत असताना एकदा पुलंकडे मर्ढेकर जेवायला आले होते आणि सुनीताबाईंनी त्यांना तिथे भाजीभाकरीचं जेवण पाटावर बसून घ्यायला लावलं होतं, अशी आठवण त्या सांगत असत. ह्याच आश्रममधल्या वास्तव्यात पुलंचा संसार (ज्यात साहित्यिक व सांगीतिक संसार अपरिहार्यच होता) खऱया अर्थानं बहरू लागलेला दिसतो.

‘आश्रम’मधल्या काही रम्य आठवणी सुनीताबाईंनी अशा लिहिल्या आहेतः राम गबाले, वसंत सबनीस या मित्रांची त्या वेळी लग्ने झाली नव्हती. आमचे ते घर हे त्यांच्यासारख्या, खानावळीत जेवणाऱया सडय़ाफटिंग मित्रमंडळींना त्या काळी स्वतःच्या घरासारखेच होते. ते दोघे, कॉलेजच्या वसतिगृहात राहणारा माझा भाऊ मोहन वगैरे मित्रमंडळींचा मुक्काम बरेचदा या घरात असे. मग गप्पा-गोष्टी, चेष्टा-मस्करी आणि माझी खोड काढून मला चिडवणे आणि गंमत पाहणे हा भाईच्या जोडीने या मंडळींचा कार्यक्रम असे. तरुण वयातल्या असल्या ताज्या आनंदाचे आठवणीतदेखील निर्माल्य होत नाही. त्या ताजेपणाचा दरवळ चिरंजीव असतो खरा.

‘पुढचं पाऊल’, ‘मोठी माणसं’, ‘मानाचं पान’ वगैरे बोलपट याच घरात असताना झाले. तिथल्या दिवाखणान्यातच भाईने संगीत दिलेल्या त्या काळच्या सिनेमातल्या गाण्यांच्या तालमी चालत, पण आजही आठवणीत ताज्या आहेत त्या त्याच दिवाणखान्यातल्या लागोपाठ दोन शनिवारी रात्री झालेल्या गाण्यांच्या दोन अविस्मरणीय मैफिली. आदल्या शनिवारी भीमसेन फार सुंदर गाऊन गेला होता आणि दुसऱया शनिवारी वसंता गाणार होता. शाहू मोडकांना वसंताचे गाणे ऐकायचे होते म्हणून भाईने त्यांनाही आमंत्रण दिले होते. त्यांना फार वेळ नव्हता; तेव्हा तासाभराने आपण उठून जाऊ, गैरसमज होणार नसेल तर आपल्याला यायला आवडेल, असे ते म्हणाले आणि ‘हरकत नाही, या’ असे भाईने त्यांना सांगितले. प्रत्यक्षात मात्र ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत, पाच-सहा तास चाललेल्या वसंताच्या अप्रतिम गाण्याला तर थांबलेच; पण पुढे तास-दीड तास रंगलेल्या मुख्यतः संगीतविषयक गप्पांतही त्यांनी भाग घेतला होता. पहाटे पहाटे शाहूराव, भीमसेन, मधू गोळवलकर, वसंता आणि इतर मित्रमंडळी आपापल्या घरी गेली आणि वाद्ये जराशी बाजूला सरकवून आम्ही तिथेच पडलो. सकाळी दाराची घंटी वाजली, तेव्हा दूधवाला असेल म्हणून उठले; तर भीमेसन पुन्हा परत आला होता. रात्रीच्या वसंताच्या गाण्याने तो फार अस्वस्थ झाला होता.

खरे तर वसंता, भीमसेन, मधू गोळवलकर, भाई ही सगळी मित्रमंडळी. एकमेकांबद्दल पोटात अमाप माया. एकेकांच्या गुणांबद्दल अभिमान आणि आदर. पण वयाने सगळेच पंचविशीच्या घरातले. चार-दोन वर्षे इकडेतिकडे, इतकेच. त्यामुळे गद्धेपंचविशीतल्या सळसळणाऱया रक्ताला अधूनमधून खुमखुमी येई आणि आपापसात आक्रमक पवित्रे घेण्याचीही हुक्की येई. वसंताने आदल्या रात्री गाण्याला सुरुवातच मुळी त्या मूडमध्ये केली होती. मध्यांतरापर्यंतचे त्याचे सगळे गाणे, मागच्या शनिवारी भीमसेन गायला होता ते आपणही गाऊ शकतो हे सिद्ध करणारे होते; आणि त्यानंतर, ‘आता हे माझे ऐका!’ असे, त्याहून वेगळे. दोन्ही तितकीच सुंदर, चक्रावून टाकणारी. त्यामुळे एकूण मैफील अगदी मस्त जमली, तरीही त्यात भीमसेनवर बाजी मारण्याचा हा हूडपणा सगळ्यांना जाणवला होता. त्यातून भीमसेनमधला कलावंत साहजिकच दुखावला गेला होता. मित्र म्हणून वसंताला सगळे क्षम्य होते. त्यामुळे त्याच्या त्या गाण्याला इतर सगळ्या श्रोत्यांप्रमाणेच भीमसेननेही दाद दिली होती. पण मैफील संपवून घरी परतल्यावर भीमसेनला चैन पडेना. तो तसाच पुन्हा आमच्याकडे आला होता.

बैठक तशीच होती. वाद्येही तिथेच पडली होती. भीमसेन तंबोरे लावू लागला, मी चहापाण्याचे पाहायला गेले आणि भाई सायकलवरून तबलजीला आणि जवळपासच्या मित्रांना निरोप द्यायला गेला. साडेसात-आठला पुन्हा त्याच बैठकीवर भीमसेनचे गाणे सुरू झाले ते अकरा-साडेअकरापर्यंत. त्याने आणखीनच वेगळा रंग भरला. दोन मोठय़ा कलावंत मित्रांतल्या, अभावितपणे झालेल्या, त्या दुर्मीळ स्पर्धेतून मधल्यामध्ये आम्हांला मात्र अप्रतिम गाण्यांच्या मेजवान्यांमागून मेजवान्या झाल्या.

1946पासून पुलंचं ललितलेखन वाढू लागलं होतं. धक्का (अभिरुची, 1946), गाढवाची गोष्ट (अभिरुची, मे 1947), बोलट (मौज दिवाळी, 1948) ह्यांसारखे लेख जाणकारांचं लक्ष वेधून घेत होते. पुलंची मार्मिक विनोदबुद्धी लोकांना आवडायला लागली होती. सिनेमा माध्यमातही नाना प्रकारे स्वतःला आजमावणं सुरू होतं. मानाचं पान, मोठी माणसं, जागा भाडय़ाने देणे आहे, देव पावला, नवरा बायको, पुढचं पाऊल, वर पाहिजे, जरा जपून, गोकुळचा राजा असे अनेक मराठी चित्रपट 1950पर्यंत प्रदर्शित झाले होते; ज्यांच्याशी पुलंचा काही ना काही संबंध होता. कुठे कथाकार, कुठे पटकथाकार, कुठे गीत-संगीत-कार अशा बिरुदासह त्यांचं नाव येत होतं. मंगल पिक्चर्सच्या ‘देव पावला’चं पुलंचं संगीत विशेष वाखाणलं गेलं होतं. ‘कबिराचे विणतो शेले’, ‘जा मुली शकुंतले सासरी’, ‘कुणी म्हणेल वेडी मला’ ही त्यातली गाणी अक्षरशः घराघरांत पोचली होती. ‘पुढचं पाऊल’ ह्या चित्रपटात पुलंनी कृष्णा ढोलकीवाल्याची भूमिका केली होती. तीही लोकांना फार आवडली होती. हंसा वाडकर ह्या त्यातल्या नायिकेचंही मोठं वलय होतं. ह्या अर्थानं चित्रपट कारकीर्द हाती काही ना काही लागू देत होती. पण एका ठिकाणी फार काळ रमण्याचा पुलंचाच स्वभाव नव्हता, त्याला लोक काय करणार?