
>> वैश्विक, [email protected]
आपण सामान्यपणे ज्याला ‘दुर्बीण’ म्हणतो ती ‘द्विनेत्री’ असते. द्विनेत्री म्हणजे बायनॉक्युलर्स. हा शब्द कात्रीला ‘सिझर्स’ म्हणतात तसा अनेकवचनी वापरला जातो. दुर्बीण म्हणजे टेलिस्फोप. ती अवकाशाचा वेध घेण्यासाठी वापरली जाते आणि ती आकाराने मोठी असते. दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ गॅलिली यांनी लावला असं समजलं जातं. गॅलिलिओ यांनी 1609 मध्ये इटलीमधून अवकाशाचा धांडोळा प्रथमच घेतला हे खरंच. त्यासाठी त्यांनी भिंगाची छोटी (3 इंची) दुर्बीण वापरली होती. त्यातूनही त्यांना चंद्रावरची विवरं, गुरूचे चंद्र, शनीची कडी आणि बरंच काही जाणून घेता आलं. खगोलशास्त्राच्या अभ्यासात एखाद्या उपकरणाचा उदय तेव्हापासून झाला.
मात्र त्यापूर्वी खगोलीय निरीक्षणं नुसत्या डोळय़ांनी होत नव्हती का? तर निश्चितपणे होत होती. आपल्याकडच्या अभ्यासकांनीही अवकाशवेध घेऊन ग्रहस्थिती आणि ग्रहगणित जाणून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. आज ज्याला आपण ‘एफिमेरिस’ असं म्हणतो त्याचा हिंदुस्थानी पूर्वज म्हणजे पंचांग. स्थिती, वार, नक्षत्र, करण आणि योग हे त्याचे पाच भाग. म्हणून ते पंचांग. आपलं पंचांग सूर्य-चंद्र…दोन्हीचा विचार करून तयार व्हायचं. ‘योग’ हा त्यातील शेवटचा भाग. फलज्योतिषाशी निगडित. एरवी ज्योतिषी म्हणजे ‘ज्योतिःशास्त्र’ किंवा अवकाशातील तेजस्वी (ज्योतींसारख्या) वस्तूंचा वेध घेण्याचं, त्यांचं तंतोतंत गणित मांडण्याचं शास्त्र.
आपल्या महाराष्ट्रातील भास्कराचार्यांना बाराव्या शतकातच पृथ्वी अंतराळात अधांतरी फिरते, पृथ्वीचा परीघ किती आणि ग्रहणांचं गणित ठाऊक होतं. त्यांचा ‘सिद्धांतशिरोमणी’ ग्रंथ आजही उपलब्ध आहे. त्यात अंकगणित, बीजगणित, खगोलशास्त्र (गोलाध्याय) असे अनेक विषय स्पष्ट केले आहेत. 1993 मध्ये आम्ही ‘खगोल मंडळा’तर्फे चाळीसगावजवळच्या पाटण येथील भास्कराचार्यांच्या प्राचीन अवकाश निरीक्षणाच्या ठिकाणी जाऊन एक छोटी फिल्म (माहितीपट) तयार केली. ते वर्ष भास्कराचार्यांच्या निर्वाणाचं आठशेवं वर्ष होतं. विख्यात खगोल अभ्यासक प्रा. मोहन आपटे यांनी त्यानिमित्ताने मुंबईत पार्ले येथे एक विशेष खगोल संमेलन आयोजित केलं होतं. प्राचीन हिंदुस्थानी खगोलशास्त्र तसंच आज प्रचलित असलेला पाश्चात्त्य आधुनिक खगोल अभ्यास या सर्व गोष्टींची उत्तम चर्चा त्या वेळी झाली. कोणत्याही वृथा अभिनिवेशाविना विज्ञानाचा निखळ अभ्यास कसा असावा अशा गोष्टी विविध खगोल संमेलनांतून आम्ही नंतरच्या काळात अनेकदा अनुभवल्या. सर्व सजीवांसह एकूणच वैश्विक सृष्टीचा विश्वहितकारी अभ्यास हे खगोल अभ्यासाचं सूत्र असावं असं आम्ही सांगत आलो. कारण ‘पृथ्वी’ नावाचा ग्रह केवळ माणसाची मालमत्ता नाही, तर त्यावर सर्व सजीव सृष्टीचा अधिकार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा आपला विचार असायला हवा. पृथ्वी अबाधित राहिली तरच चंद्र, मंगळावर जाण्याची स्वप्नं आपण पाहू शकतो. विज्ञान प्रगती करतच राहील, परंतु त्याचा वापर विवेकाने झाला नाही, तर ते विनाशाकडे नेईल असं विनोबांनी त्यांच्या ‘आत्मज्ञान आणि विज्ञान’ या पुस्तकात 1945 मध्येच म्हटलं आहे ते खरं आहे.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धापासून अवकाश निरीक्षणाला विलक्षण वेग आला. गॅलिलिओकालीन भिंगाची दुर्बीण आता क्वचितच अवकाश निरीक्षणासाठी वापरली जाते. 1608 मध्ये हॅन्स लिपर्शे (किंवा लिपर्हे) या चष्मे बनवणाऱ्याला भिंगाच्या दुर्बिणीचा शोध योगायोगाने लागला. ती साध्या भिंगाची केवळ तिप्पट वर्धनक्षमता (मॅग्निफिकेशन) असलेली दुर्बीण होती. अशा दुर्बिणीला रिफ्रॅक्टर (अपवर्ती) दुर्बीण म्हणतात. त्यात एक मोठे बहिर्गेल (कॉन्व्हेक्स) आणि तसेच लहान भिंग वापरतात. मोठं भिंग म्हणजे पदार्थीय भिंग (ऑब्जेक्टिव्ह लेन्स) आणि लहान भिंग म्हणजे नेत्रिका (आयपीस). त्यात निर्माण होणारे रंगदोष (क्रोमॅटिक अब्रेशन) घालवण्यासाठी विशिष्ट काचेपासून बनवलेली अंतर्वक्र-बर्हिवक्र जोडभिंग पदार्थीय भिंगाच्या मागे बसवतात.
त्यानंतर 1663 मध्ये जे. ग्रेगरी यांनी अंतर्वक्र आरशाची परावर्ती (रिफ्लेक्टर) दुर्बिणीची संकल्पना मांडली. त्यात मुख्य भिंगाऐवजी अंतर्वक्र आरसा वापरतात. तसंच आणखी एक छोटा अंतर्वक्र आरसाही वापरला जातो. ताऱ्यांचा प्रकाश परावर्तित होऊन ते किरण पदार्थीय आरशामुळे एकत्र केले जातात. 1672 मध्ये कॅसेग्रेन यांनी दुसऱ्या अंतर्वक्र आरशाऐवजी बहिर्वक्र आरसा वापरला. त्यामुळे पदार्थीय आरशाचे परिणामकारी नाभीय अंतर (इफेक्टिव्ह फोकल लेंग्थ) वाढले आणि दुर्बिणीच्या नळीची लांबी कमी करता आली. अशा आणखी अत्याधुनिक दुर्बिणी आम्ही आजही वापरतो. मात्र त्या थोडय़ा महाग असतात. 1668 मध्ये न्यूटन यांनी आरशाच्या दुर्बिणीचा दुसरा आरसा, सपाट आणि 45 अंशाच्या कोनात बसवून दुर्बिणीत क्रांती केली. अशा दुर्बिणी आता सर्रास वापरल्या जातात. मात्र आरशाच्या व्यासानुसार त्याची नळी लांब होते. आमच्या एका सभासदाकडे अशी 18 इंच व्यासाच्या आरशाची महाकाय दुर्बीण आहे. त्यातून काही अशनी (महापाषाण किंवा ऍस्टेरॉइड) स्पष्ट दिसतात. दुर्बिणी लहानमोठय़ा…सर्व प्रकारच्या मिळतात. मात्र त्या भिंगाच्या असोत वा आरशाच्या, त्यावर बुरशी (फंगस) लागली तर निरीक्षण नीट होणार नाही. आरशावर अनेकदा ऍल्युमिनियम कोटिंग (मुलामा) द्यावा लागतो. निरीक्षणापूर्वी दुर्बिणी स्वच्छ करून तयार ठेवल्या तर अवकाशही स्वच्छ, सुंदर दिसेल. ती वेळ आता आली आहे.


























































