
नवनाथ दांडेकर, मुंबई
रशियातील यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेने एका लढवय्या फुटबॉलपटूची ओळख अवघ्या क्रीडा जगताला झालीय. वयाच्या १२व्या वर्षांपासून त्याला मधुमेहासारख्या क्लेशदायक व्याधीने घेरले होते. पण या जिगरबाज खेळाडूला कोणत्याही परिस्थितीत फुटबॉलमध्ये आपले करिअर करण्याच्या ध्येयाने झपाटले होते. त्याने मग मधुमेहालाच आपला मित्र बनवले आणि शिस्तबद्ध, नियंत्रित जीवन जगत आपले ध्येय साकारले. रिअल माद्रिद या अग्रगण्य फुटबॉल क्लबचे यशस्वी प्रतिनिधित्व करणाऱ्या या जिद्दी स्पॅनिश फुटबॉलपटूचे नाव आहे, जोसे इग्नेशिअस फर्नांडेज इग्लेसियस. २८ वर्षीय जोसेला जगातील फुटबॉलशौकीन “नाचो”या टोपण नावाने ओळखतात. रिअल माद्रिदला ११ वेळा चॅम्पिअन्स लीगचे जेतेपद मिळाले आहे. त्यातील ४ वेळच्या अजिंक्यपदात जोसेचा सिंहाचा वाटा आहे. माजी विजेत्या स्पेन संघाचा नामवंत बचावपटू मानला जाणारा जोसे जेथे जातो तेथे स्वतःसोबत इन्सुलिन किट घेऊन जातो. डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी फुटबॉल लढतीच्या वेळेसही त्याला इन्सुलिनचा डोस घेऊन मैदानात उतरावे लागते. डॉक्टरांनी फुटबालपासून दूर राहा, कधीतरी जीवावर बेतेल असे बजावूनही फुटबॉलच्या असीम प्रेमाखातर नाचो गेली १६ वर्षे जागतिक फुटबॉल क्षेत्रात आपल्या खेळाचा जलवा पेश करतोय. त्याच्या जिद्दीला सलाम करावा तितका थोडाच आहे.
शुक्रवारी जोसेला यंदाच्या फिफा विश्वचषकातील संघाच्या सलामीच्या लढतीत खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.या लढतीत त्याच्याविरुद्ध उभा ठाकला होता रिअल माद्रिदचा सुपरस्टार पोर्तुगाली ख्रिस्तिआनो रोनाल्डो. नाचो आणि रोनाल्डो दोघे एकाच स्टार क्लबचे खेळाडू. पण इथे मात्र ते विरोधक म्हणून मैदानात उतरले होते. सामन्याच्या ४थ्या मिनिटालाच जोसेने पोर्तुगाली कर्णधार रोनाल्डोला स्पॅनिश गोलक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने अडवले आणि पोर्तुगालला फ्री किक मिळाली. या संधीचा लाभ उठवत रोनाल्डोनो आपल्या संघाला १-० असे आघाडीवर नेले. या अपयशाचे खापर स्पॅनिश समर्थक जोसेवर फोडत होते. त्यांच्या नजरेत तो खलनायक ठरला होता. पण आयुष्यात संकटांशी सामना करण्यात धन्यता मानणाऱ्या जोसेने हार मानली नाही. आपल्या चुकीची भरपाई करीत जोसेने लढतीच्या उत्तरार्धात एक अफलातून गोल नोंदवत स्पेनला ३-२ असे आघाडीवर नेले. झाले.. एवढा वेळ खलनायक वाटणारा जोसे उर्फ नाचो आता स्पॅनिश फुटबॉलशौकिनांसाठी हिरो ठरला होता. ही लढत सुरू होण्याआधी २८ वर्षीय जोसेचा अंतिम संघातील समावेश निश्चित नव्हता. पण त्याचा सहकारी दानी कारवाजल जखमी झाला आणि जोसेला खेळण्याची संधी मिळाली. ही संधी त्याच्या लढवय्या वृत्तीला मिळालेली अनोखी दादच ठरली. भलेही लढत सुपरस्टार रोनाल्डोच्या ५१व्या हॅटट्रिकने संस्मरणीय ठरली. पण जिगरबाज नाचोही लढतीचा दुसरा हिरो ठरला. त्याच्या गोलमुळेच माजी विजेता स्पेन संघ बलाढ्य पोर्तुगालला ३-३ असे बरोबरीत रोखू शकला. लढतीच्या अखेरीस रोनाल्डोनेही आपला क्लब सहकारी जोसेची मुक्तकंठाने स्तुती केली. कारण रिअल माद्रिदच्या या बचावपटूच्या झुंजार वृत्तीचा रोनाल्डोही प्रशंसक बनला आहे. भले आपला संघ विजयापासून वंचित राहिला. पण आपल्या क्लबसहकाऱ्याला या सामन्यात यश लाभले याचा आनंद सुपरस्टार रोनाल्डोला होता.
मधुमेहाने मला शिस्तबद्ध आयुष्य जगायला शिकवले- जोसे
जोसे फर्नांडेजला स्वतःच्या शारीरिक व्याधीचे भय मुळीच वाटत नाहीय. तो म्हणतो, शालेय जीवनातच मला मधुमेह झाला. पण या व्याधीला घाबरून फुटबॉल सोडायचा नाही हा माझा निर्धार होता .मग मी या व्याधीलाच आपला मित्र बनवला. डायबेटिसने मला नियंत्रित आहार आणि आराम घेण्याची सवय लावली. त्याचाच लाभ मला आयुष्यात शिस्तबद्ध जीवनप्रणाली अंगिकारण्यात झाला. आज भले इन्सुलिन किट घेऊन मी स्पर्धेसाठी जातो. पण त्याचे दुःख मात्र मला नाहीय. कारण माझ्या कारकिर्दीतील यशाआड मधुमेह कधीच आलेला नाही. त्याचे कारण म्हणजे माझा शिस्तबद्ध दिनक्रम. खाणेपिणे आणि राहणीमानात शिस्त आल्याने मी खेळात यशाच्या पायऱ्या समर्थपणे चढतोय. आयुष्यात संकटाला घाबरू नका, त्याच्याशी दोस्ती करून यशाचा मार्ग शोधा. विजय तुमच्यापाठी धावून येईल असा मैत्रीचा सल्लाही जोसेने युवा क्रीडापटूंना दिलाय.

























































