
>> आकाश दीपक महालपुरे
‘मराठी सारस्वताच्या गळय़ातलं मंगळसूत्र म्हणजे ज्ञानेश्वरी होय!’ वारकरी संप्रदायाला लाभलेल्या थोर रत्नांपैकी एक गुरुवर्य चैतन्य महाराजांच्या प्रासादिक वाणीतून निघालेलं हे वाक्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवतगीतेचे ज्ञान सामान्य वाचकाला ज्ञानेश्वरीद्वारे मराठी भाषेत उपलब्ध करून दिले, गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ एक स्वयंपूर्ण आहे. गीतेच्या एका एका श्लोकावर ज्ञानदेवांनी लोकांना अर्थ सहज पद्धतीने समजण्याकरिता किती तरी ओव्या, दृष्टान्तादाखल साध्या- सोप्या मराठी भाषेत लिहिल्या आहेत.
ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. तो संवाद असा आहे की, ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वर आपल्या अगदी निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत, असे आपल्याला सतत वाटत राहते.
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर नेहमी म्हणायचे, ‘अमृतातेही पैजा जिंके श्रवणीची होते जीभा’ ही प्रतिज्ञाच ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून खरी करून दाखविली आहे. खरं तर माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने कर्म हे केलेच पाहिजे, पण ते केवळ कर्म न होता ते ज्ञानकर्म झाले पाहिजे आणि हे ज्ञानकर्म मी करतो, असा अंतःकरणात भाव असला पाहिजे. हे शाश्वत समजून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीत निसर्गातील अनेक उदाहरणे दिली आहेत. श्रीभगवद्गीता जशी तत्त्वमती तशीच ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाङ्मयमूर्ती आहे. भक्ती हा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग होय, हा सिद्धान्तदेखील ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत मांडला आहे. साधक भक्तिमार्गाची वाट चालत असताना त्याच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात. हेच अष्ट सात्त्विक भाव होत. त्यांचे मनोज्ञ चित्रण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केले आहे. आनंद आणि शांती या विरोधी भावना आत्मसाक्षात्कारात कशा एकत्व पावतात हेही त्यांनी उत्तम प्रकारे दाखविले आहे. देव आणि भक्त यांच्या अंतिम ऐक्याचा विचार ज्ञानेश्वरांनी विविध प्रकारे मांडला आहे, पण हे ऐक्य संपूर्ण होत नाही. साधक ईश्वराच्या अधिकाधिक निकट जात असला तरी देव आणि साधक यांच्या ऐक्यात काही उणेपणा राहतो. जसे चतुर्दशीचे चंद्रबिंब पौर्णिमेच्या चंद्राहून किंचित उणे असते. असे होण्याचे कारण देह, मन आदी बंधने आहेत. ती असेपर्यंत देव तो देव आणि भक्त तो भक्त असेच हे नाते राहणार. प्रवासास निघाल्याबरोबर कोणी इष्ट स्थळी पोचत नाही. चांगल्या संगतीने इष्ट स्थळी आनंदाने पोचता येते. तरी प्रवास संपण्यासाठी काही वेळ लागतोच. साधकाच्या अंतिम विजयाचे ज्ञानेश्वरांनी जे रूपकात्मक वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे, ते खरोखर अतुलनीय असेच आहे.
ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्टय़ होय. प्रत्येक माणसाला स्वतःचे काम नीट समजून सांगण्याचे काम ज्ञानेश्वरी करते. थोडक्यात, ते काम कसे करावे, त्यात किती सावधानता असावी, त्याची सुरुवात नेमकी कशी करावी, याचे सर्व सखोल मार्गदर्शन ज्ञानेश्वरीत मिळते. जगातील असा कोणताच प्रश्न नाही किंवा जगातील असे कोणतेच उत्तर नाही ज्याचे संपूर्ण विश्लेषण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत केले नाही. थोडक्यात ज्ञानेश्वरीचा अलंकार घेऊन गीताच शोभिवंत झाली आहे. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार यांचेदेखील अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन ज्ञानेश्वरीत केले आहे. थोडक्यात, ज्ञानेश्वरांचे सृष्टीनिरीक्षण किती सखोल व सूक्ष्म होते हेही त्यातून दिसून येते. सर्व विश्वाचे आदिकारण, त्याचा कर्ता आणि नियामक ईश्वर मानला पाहिजे हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून उत्कृष्ट रीतीने मांडले आहे. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला म्हणजेच श्रीविश्वेश्वराला पसायदान देण्याची विनवणी केलेली आहे. थोडक्यात, ज्ञानेश्वरीतील पसायदान ही एक अत्युत्कट प्रार्थना आहे. या पसायदानात ज्ञानेश्वरांनी व्यक्तिशः स्वतःसाठी म्हणून काहीच मागितलेले नाही आहे. त्यांची प्रार्थना ही सर्व प्राणिजातांसाठी आहे. जे खलप्रवृत्तीचे असतील त्यांना सत्कर्मांत रस निर्माण व्हावा, सर्वांमध्ये जिवाभावाची मैत्री निर्माण व्हावी, जो जे वांछिल ते त्याला मिळावे. जे चंद्रासारखे आहेत, पण ज्यांच्यावर चंद्रावर असतो तसा कलंक नाही जे सूर्य आहेत, पण ज्यांचा ताप जगाला होत नाही, त्यांच्याशी सर्वांचे नाते जडावे, अशी विनवणी त्यांनी केली आहे. ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे.
शेवटी एवढेच, आज राज्यात सर्वत्र जे वैचारिक मता-मतांचे अमानुष द्वंद्व घडत आहे ते जर मुळासकट मिटवायचे असेल तर त्यासाठी आधार म्हणून ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानच उपयोगी पडेल. जसे घास भरवताना आई एका घासाचे चार घास करत आपल्या चिमुकल्याला संजीवन करते अगदी तसेच ज्ञान माऊलींनी ज्ञानेश्वरीतून देत जगाला संजीवन केले आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जगाला संजीवन करणारी ज्ञानेश्वरी!