
>> आरती देवगावकर
बघता बघता दिवाळी आठवडय़ावर येऊन ठेपली. घरोघरी तिच्या तयारीला वेग चढला असेल, आणि का न चढावा? ती तर सणांची साम्राज्ञी आहे. सगळेच सण उत्साह, मांगल्य घेऊन येतात. या दिवाळीच्या निमित्ताने मनातील काजळी झाडून काढून हृदयातील दिवे उजळता येतात का पाहू या? ज्यांच्याकडे अंधार आहे त्यांच्यासाठी दोन दिवे लावू या? बघा, खऱया अर्थाने दिवाळी साजरी होईल.
परवा एका सोशल मीडियाच्या समूहावर एका मैत्रिणीची पोस्ट आली होती. तिला विशिष्ट प्रकारच्या चकलीची रेसिपी हवी होती. काही जणांच्या मदतीने दुसऱया दिवशी हव्या तशा चकल्या झाल्याचे तिने कळवले. त्यावेळी अचानक दिवाळी जवळ आल्याची लख्ख जाणीव झाली. तसेही बाकी रोजच्या कामाच्या व्यापात आणि दिवाळी अंकाच्या जास्तीच्या गडबडीत असल्याने घरच्या दिवाळीची आठवण जरा उशिराच होते म्हणा!
बघता बघता दिवाळी आठवडय़ावर येऊन ठेपली. घरोघरी तिच्या तयारीला वेग चढला असेल, आणि का न चढावा? असा तसा सण थोडाच आहे? ती तर सणांची साम्राज्ञी आहे. सगळेच सण उत्साह, मांगल्य घेऊन येतात. नुकतेच पार पडलेले नवरात्र म्हणजे स्त्री शक्ती-स्वरूपाची आराधना करण्याचा, नवसर्जनाचा काळ. त्यानंतर आलेल्या नवान्न पौर्णिमेच्या मुहूर्तावर शेतातील नव्या धान्याची पूजा केली जाते. नवे धान्य घरी येते. संपलेली सुगी शेतकऱयाच्या मुखावर आनंद देऊन गेलेली असते. अशा उत्साहाच्या, आनंदाच्या वातावरणात येणारा दिवाळीचा सण अधिकच खुमासदार होतो. आपल्या कृषीप्रधान देशात तिला विशेष महत्त्व असे, अजूनही आहे.
मला आठवतेय, पितृ पंधरवडय़ात घराची साफसफाई झालेली असली तरी दिवाळी आली म्हणून पुन्हा एकदा जोमाने ती केली जाई. आम्हाला उत्साह असायचा तो फराळात आणि नव्या कपडय़ात, तर भावाला फटाक्यात आणि किल्ला करणे हा तर आमचा सर्वांचा लाडका प्रकार होता. घरात असतील त्या सगळ्या मुलींना एका ताग्यातून कापड आणून एकसारख्या डिझाइनचे फ्रॉक शिवणे ही पूर्वी सर्वसामान्य बाब होती. कालांतराने शिंगे फुटल्यावर त्याला विरोध केला तेव्हा डिझाइन एकच, फक्त रंग वेगळे अशी तडजोड मुली आणि पालक यांच्यात झाली. ठरलेल्या बजेटमध्ये बसतील तेवढे फटाके घरी येत. त्या काळात मोठी पिशवीभर फटाके खूप होत. आम्ही बहिणी फुलबाज्या, भुईचक्र, अनार आणि लवंगीचे सर लावत असू, तर सगळे भाऊ बॉम्ब उडवून आम्हाला घाबरवण्यात पटाईत! आमची आईसुद्धा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा झाल्यावर आठवणीने लक्ष्मी बॉम्ब उडवत असे. किल्ला करणे हा तर एक सोहळाच असायचा. मुले कितीही मातीत खेळली तरी पालकांनी मुलांना न रागावण्याच्या काळात आम्ही लहानाचे मोठे झालो हे आता फार छान वाटते. हल्ली मुलांच्या अंगालाच काय, पायालाही माती लागू न देणारे पालक पाहिले की, आपण भाग्यवान असे वाटून गेल्याशिवाय राहत नाही. सहामाही परीक्षेचा अभ्यास करता करता कुठला किल्ला करायचा यावर खल होई. पेपर सुरू असताना ते देऊन आल्यावर रोज दुपारी न चुकता झोपणारे आम्ही शेवटचा पेपर देऊन आलो की, त्या दिवसापासून झोप गायबच व्हायची. आजूबाजूला हिंडून दगडधोंडे, माती जमा करून आणत असू. हिरिरीने वाद घालत अखेरीस आमचा किल्ला तयार व्हायचा आणि मग त्यावर पेरायला आईकडून धणे, हळीव वगैरे घेऊन शेतही उगवायचे.
नेहमीच्या किराणात या वेळी भरपूर जिनसांची जास्तीची हजेरी असायची. केशर, वेलदोडे, पूर्वी सहसा रोजच्या खाण्यात नसलेला सुका मेवा, चिवडय़ासाठी डाळवे, आवडीप्रमाणे पातळ-नायलॉन-भाजके पोहे आणि असेच काहीबाही. या सगळ्यात बहुतेक घरच्या यादीत तीन वस्तू असतच, त्या म्हणजे सुवासिक तेल, उटणे आणि मोती साबण. मोती साबणाशिवाय दिवाळी ही कल्पनाही करवत नसे. या काळात घराघरातून भाजणीचे, रवा, खोबरे भाजल्याचे खमंग वास येऊ लागलेले असायचे. त्या वासांनी पुढे तयार होणारे पदार्थ आठवूनही तोंडाला पाणी सुटायचे. खोबरे किसून त्याचे सुके सारण, रवा भाजून ठेवणे, गिरणीवाल्याला चार-चारवेळा सांगून शेवेसाठी अगदी बारीक आणि लाडवासाठी जाड बेसन दळून आणले जाई.
कच्ची तयारी झाली की, घरोघरच्या गृहिणींचे फराळाचे दिवस ठरत. आमच्या घरी आई ओले खोबरे घातलेले रव्याचे लाडू पहिल्यांदा करून वसुबारसेला फराळाला सुरुवात करायची. त्या दिवशीच्या नैवेद्याला ते लाडू, तर धनत्रयोदशीला ओल्या नारळाच्या करंज्या.. बाकी याच दोन दिवसांत चकल्या, कडबोळी, बेसनाचे लाडू, चिवडा, चिरोटे, अनारसे, शंकरपाळे असे सगळे बनत असे. कोणताही पदार्थ झाल्या झाल्या लहानशा वाटीत देवापुढे ठेवून लगेच आमच्या समोर ताटलीत येई. ती गरम गरम चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. नरकचतुर्दशीला सारे पदार्थ आधी चाखून झालेले असल्याने नैवेद्याला मिरची लावलेले दही-पोहे असत. तेलकट पदार्थ बाधू नयेत म्हणूनही त्याचा उपयोग होत असे.
नरकचतुर्दशीला भल्या पहाटे खरोखरच्या गुलाबी थंडीत उठून आवरणे, अंगणात रांगोळी काढणे, अंगाला तेल-उटणे लावून कढत पाण्याने अंघोळ करणे आणि नवीन कपडे घालून देवापाठोपाठ मोठय़ांना नमस्कार करून बाहेर फटाके उडवायला जाणे यात और मजा होती. सोसायटीत पहिला फटाका कोण उडवतो यासाठी चढाओढ असे. त्यानंतर फराळ खाऊन, कपडे बदलून गुडूप झोपण्यात फार निरागस सुख होते.
आता वर्षाचे 12 महिने फराळाचे पदार्थ तयार मिळतात, मनात येईल तेव्हा कपडे खरेदी करता येतात. त्यामुळे दिवाळीचे अप्रूप संपले आहे, खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे. मातीच उरली नसल्याने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे किल्ले आणि मावळे आणून दिले की, पालक मोकळे होतात, आकाशकंदील लावण्यात उत्साहापेक्षा तो भारी कुणाचा ही ईर्ष्या जास्त दिसते की काय, अशी शंका कधीतरी मनाला चाटून जाते. ‘सुट्टीच्या दिवशी तरी झोपू उशिरापर्यंत,’ असे म्हणणारी पिढी आता दिसते आहे. कोणाची यात काही चूक आहे, असे मला अजिबात म्हणायचे नाही हा कालमहिमा आहे, पण थोडे आत पाहू या? दिवाळीच्या निमित्ताने मनातील काजळी झाडून काढून हृदयातील दिवे उजळता येतात का पाहू या? ज्यांच्याकडे अंधार आहे त्यांच्यासाठी दोन दिवे लावू या? बघा, खऱया अर्थाने दिवाळी साजरी होईल.
येत्या प्रकाशपर्वासाठी आणि पुढील वर्षासाठी तुम्हा सर्व वाचकांना मनापासून शुभेच्छा!
(लेखिका अनुवादक व समतोल या द्वैमासिकाच्या संपादक आहेत.)


























































