ठसा – पांढरं वादळ @ 76

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अश्विन बापट

पांढरा शर्ट, पांढरी पॅण्ट, काखेत घडी केलेली पिशवी, त्यामध्ये डायरी आणि एखादं पुस्तक. ही ओळख आहे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंची. अर्थात मुळ्येकाका म्हणून अवघ्या कलाविश्वाला परिचित असलेल्या अवलियाची. गेल्या वर्षीच त्यांनी वयाची पंच्याहत्तरी पार केली, तर यावर्षी 20 ऑक्टोबरला त्यांनी 77 व्या वर्षात पदार्पण केले.

नाटय़ विश्वात, अगदी मराठी चित्रपट, मालिका विश्वातही अशोक मुळ्ये या नावाला प्रचंड रिस्पेक्ट आहे. तितकीच या नावाची प्रेमळ दहशतदेखील आहे. अगदी प्रशांत दामलेंपासून ते आताच्या तेजश्री प्रधान, ऋतुजा बागवेपर्यंत साऱया कलाकारांशी त्यांचा असलेला स्नेह, प्रेम हे त्यांच्यासोबत अनेकदा वावरल्याने मी प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय. मुळ्येकाका म्हणजे हटके कार्यक्रमांची संकल्पना हे समीकरणच जणू. ज्याला सामाजिक आशय हा असतोच. मग बेडरिडन मुलांच्या आईवडिलांसाठीचं संमेलन असो, विस्मृतीत गेलेल्या, पण एक काळ गाजविलेल्या कलाकारांचं संमेलन असो नाहीतर दिवाळी अंकात लिहिणाऱया लेखकांचं संमेलन, त्यांचा मराठी भाषा दिनही अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. ज्यामध्ये इंग्रजी माध्यमांची किंवा अमराठी घरातली मुलं आपली कला सादर करतात. कधी ते दुर्दैवी अपघातात हात गमावणाऱया मोनिका मोरेच्या भेटीला पोहोचतात, तेही सुपरस्टार भरत जाधवला घेऊन. तेव्हा मोनिकाच्या चेहऱयावरचा आनंद काय होता हे सांगताना मुळ्येकाकांच्या चेहऱयावरचं समाधान हे त्याहीपेक्षा असीम असतं. कधी कॅन्सरग्रस्त सृष्टी कुलकर्णीची पॉझिटिव्हिटी सांगत असतानाच ते हळवे होतात, तर कधी तिच्या सकारात्मकतेला सलाम करतात. अनेकांच्या कार्यक्रमांसाठी तहानभूक विसरून बॅक स्टेजला चोख व्यवस्था सांभाळणारे मुळ्येकाका मी अनेक कार्यक्रमांच्या वेळी पाहिलेत.

‘माझा पुरस्कार’ नावाने ते स्वतः पुरस्कार देत असतात. त्याही कार्यक्रमात सब पुछ मुळ्येकाका असंच असतं. म्हणजे कार्यक्रमाची आखणी, खर्चाचं नियोजन, पुरस्कार विजेते कोण हे ठरवणं तसंच या कार्यक्रमात परफॉर्म करणाऱया कलाकारांचा मेळ जुळवून त्यांना कार्यक्रमाला बोलावणं इथपासून ते पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित आखून झाल्यानंतर त्या कार्यक्रमाचे विनामूल्य पासेस वितरणाला स्वतः बसणारा हा माझ्या पाहण्यातला एकमेव आयोजक आहे. एखादा कार्यक्रम मनात घेतला की, ते झपाटल्यागत वावरत असतात. म्हणजे कार्यक्रम प्लॅन केल्यापासून तो प्रत्यक्षात होईपर्यंत त्यांना नीट जेवणही जात नाही. ते सतत त्या कार्यक्रमाचा ध्यास घेतल्यागत वावरत असतात. त्यांना स्टेजवरील नेपथ्याचाही अफलातून सेन्स आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या संकल्पनेनुसार त्याचं नेपथ्य आहे की नाही याचीही दक्षता ते घेत असतात. अर्थात त्यांच्यावर प्रेम करणारे डेकोरेटर्स, केटरर्सही त्यांच्या या कार्यक्रमाला कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता आपल्या परीने सहाय्य करत असतात. या कार्यक्रमांसाठी लागणारी आर्थिक तरतूद ही साहजिकच मुळ्येकाकांच्या प्रेमापोटी आपोआप होत असते.
अगदी कॉर्पोरेट्सचे मोठे अधिकारी, काही बडी राजकीय नेते मंडळीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे फॅन आहेत, तर काही पोलीस मंडळीही त्यांच्या या निःस्वार्थी अन् सडेतोड वृत्तीमुळे त्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा प्लस पॉइंट म्हणजे त्यांचं तुफान वाचन. त्यांच्या हातात असलेल्या पिशवीत तुम्हाला नेहमीच एखादं पुस्तक नक्की सापडतं. साहजिकच त्यामुळे त्यांची भाषेवर जबरदस्त पकड आहे. त्यांना उत्स्फूर्ततेचंही वरदान आहे. म्हणजे अनेक नाटकांच्या, कार्यक्रमांच्या जाहिरातींच्या पॅचलाइन्स या मुळ्येकाकांच्या असतात. ऋतुजा बागवेच्या अलीकडेच आलेल्या ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकासाठीही काकांनी अशाच पॅचलाइन्स जाहिरातीत दिल्या होत्या.

त्यांच्या एका जाहिरातीबद्दल त्यांनी सांगितलेला किस्सा मला चांगलाच लक्षात आहे. मागे एकदा क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होता, त्यावेळी भरत जाधव यांचं ‘सही रे सही’ नाटक जोशात होतं. सामन्याच्या दिवशी प्रयोग लावण्यात आला होता, तेव्हा मुळ्येकाकांनी जाहिरातीत दिलेली पॅचलाइन होती, आज कोण जिंकणार भरत की भारत? प्रयोग हाऊसफुल्ल झाला आणि हिंदुस्थान तो सामनाही जिंकला. काकांनी दुसऱया दिवशी पॅचलाइन दिली, ‘भरतही जिंकला आणि भारतही!’

काकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांचा स्पष्टवत्तेपणा. खरं तर तीच त्यांची खरी ओळख आहे. म्हणजे एखादी गोष्ट पटत नसेल किंवा खटकत असेल तर ती तोंडावर सांगण्याचा स्पष्टवत्तेपणा, खरेपणा ते नेहमी दाखवतात. अशी रोखठोक तोंडावर बोलणारी माणसं नेहमीच आढळत नाहीत. तोच मुळ्येकाकांचा वेगळेपणा आहे. अगदी ‘माझा पुरस्कार’ कार्यक्रमातही जेव्हा ते बोलायला उभं राहतात, तेव्हाही शाब्दिक कोटय़ा, मध्येच वात्रटपणा, पुणाला चिमटे काढ, पुठे राजकीय कोपरखळी मार, पुठे प्रेक्षकांना शालजोडीतला देऊन पुढे जा अशी त्यांची बॅटिंग सुरू असते. याबाबतीत ते सचिन, सेहवाग, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कॉम्बिनेशन असतात. तुफान हास्यविनोद. समोर कोणतंही स्क्रिप्ट नाही तरीही भाषणात एक ऱिहदम असतो. त्यांचे पंचेस एखाद्या कसलेल्या कलाकाराच्या नाटकातील संवादाप्रमाणे लाफ्टर आणि टाळ्या घेतात.

ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर एका लेखात काकांबद्दल म्हणाले होते, त्यांच्या जिभेच्या पट्टय़ावर वीज निर्मिती केली तर अख्ख्या शहराला प्रकाश मिळेल. मी पुढे जाऊन त्यात म्हणेन की, हा प्रकाश अनेकांची आयुष्य उजळून टाकेल. तो स्वच्छ, निखळ असेल काकांच्या पांढऱयाशुभ्र कपडय़ांसारखा. त्यांच्याबद्दल लिहिताना मलाही ‘पांढरं वादळ’ हेच शीर्षक सुचलं. कारण मुळ्येकाका म्हणजे एक वादळच आहेत, चालतं बोलतं. त्या वादळात अडकायला, त्याचे फटकारे झेलायला त्यांना ओळखणारे लोक नेहमीच तयार असतात. कारण हे पांढरं वादळ नुकसान करणारं नाही, तुम्हा आम्हाला काहीतरी देऊन जाणारं आहे. होरपळलेल्या मनांना फुंकर घालणारं आहे, जीवघेण्या स्पर्धेत थकलेल्यांचं रंजन करणारं आणि त्याच वेळी सामाजिक बांधिलकीची वीण घट्ट करणारं आहे.