‘फाईव्ह-जी’वर संशयकल्लोळाची विमाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> बालेंदू शर्मा दधीच

एटी अँड टी आणि व्हेरिझोन या अमेरिकी दूरसंचार कंपन्यांनी 80 अब्ज डॉलर मोजून फाईव्ह-जी स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. इतक्या मोठ्या कंपन्या संशोधनावरही काही पैसे निश्चितच खर्च करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाही या कामी पुढाकार घेऊ शकतात. वर्षानुवर्षे व्यक्त केल्या जात असलेल्या चिंता लक्षात घेता सरकारने दूरसंचार कंपन्यांवर संशोधन आणि चाचण्या घेण्यासाठी दबाव आणला पाहिजे.

फाईव्ह-जी नेटवर्कच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीशी संबंधित असणाऱ्या चिंतेमुळे अमेरिकेला जाणाऱ्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान वाहतूक उद्योगाला काही गंभीर चिंता सतावत आहेत, परंतु त्या फाईव्ह-जीच्या तंत्रज्ञानाशी संबंधित नाहीत तर फ्रिक्वेन्सीच्या एका स्तराबाबत आहेत. कमी, मध्यम आणि उच्च अशा तीन बँडवर फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि त्या तीनही बँडच्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळ्या आहेत. फ्रिक्वेन्सी म्हणजे एक विद्युत चुंबकीय रेंज असते आणि मेगाहर्टझ्, गीगाहर्टझ अशा परिमाणांमध्ये ती मोजली जाते. कमी बँडमध्ये फ्रिक्वेन्सी एक गीगाहर्टझपेक्षा कमी असते. मध्यम बँडमध्ये ती एक ते सहा गीगाहर्टझ् असते आणि उच्च बँडमध्ये ती सहा गीगाहर्टझ्पेक्षा अधिक असते. कमी बँडच्या फ्रिक्वेन्सीचा विमान उद्योगाला कोणताही अडथळा नाही. मात्र मध्यम बँडबद्दल या उद्योगाचा आक्षेप आहे.

अमेरिकेत पुरविल्या जात असलेल्या फाईव्ह-जी सेवेमध्ये मध्यम बँड वापरला जात आहे. हा बँड विद्युत चुंबकीय लहरींमुळे शक्तिशाली आहे. त्याचे रेडिएशन अत्यंत गतिमान असे आहे. अमेरिकेच्या टेलिकॉम क्षेत्रात व्हेरिझॉन, एटी अँड टी आणि टी-मोबाईल अशा तीन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना जलद इंटरनेट सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्यामुळे मध्यम बँडचा पर्याय त्यांनी वापरला आहे. तीनपैकी दोन कंपन्यांनी ही सेवा सुरू केली आहे. विमान वाहतूक उद्योगाची समस्या अशी आहे की, विमानांमध्ये अशी काही उपकरणे वापरली जातात, जी मध्यम बँडच्या फ्रिक्वेन्सीवर काम करतात. मोबाईल कंपन्यांच्या फ्रिक्वेन्सीचा परिणाम त्यांच्या उपकरणावर होऊ शकतो, अशी भीती विमान कंपन्यांना वाटते. अशा उपकरणांपैकी महत्त्वाचे उपकरण आहे अल्टिमीटर. या उपकरणामुळे विमान समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे हे समजते. उंची समजण्यासाठी विमानात काही पर्यायी यंत्रणा असल्या तरी धावपट्टीवर विमान उतरविताना अल्टिमीटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

दिवसा हवामान स्वच्छ असताना जर वैमानिकांनी डोळ्याने पाहिले तरी त्यांना कल्पना येते; परंतु खराब हवामान, धुके, पाऊस आणि रात्रीच्या वेळी अल्टिमीटर व्यवस्थित कार्यरत असणे गरजेचे बनते. जर विमानतळांवर फाईव्ह-जी टॉवर बसविण्यात आले आणि त्याची फ्रिक्वेन्सी मध्यम बँडची असेल तर त्रास होऊ शकतो आणि प्रसंगी अपघातही होऊ शकतो, अशी भीती विमान कंपन्यांना वाटते. फाईव्ह-जी टॉवरच्या फ्रिक्वेन्सीमुळे अल्टिमीटरचे रीडिंग बदलण्याचीही शक्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच विमान वाहतूक उद्योगाने फाईव्ह-जीला विरोध केला असून उड्डाणे रद्द करण्यापर्यंत ही समस्या पोहोचली आहे. उड्डाणांवर परिणाम होऊ नये यासाठी दूरसंचार कंपन्यांनी कमी बँडवर काम करावे, असे विमान वाहतूक उद्योगाचे म्हणणे आहे. सध्या तेथील कंपन्या साडेतीन ते चार गीगाहटर्झची फ्रिक्वेन्सी वापरत आहेत. जेव्हा टेलिकॉम कंपन्यांनी फ्रिक्वेन्सी कमी करण्यास सहमती दर्शविली नाही, तेव्हा विमान वाहतूक पंपन्यांनी विमानांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला आणि अशा परिस्थितीत काय करता येईल, अशी विचारणा केली.

विमान निर्मिती कंपन्यांनी आपल्या बाजूने तपासणी केल्यावर एक यादी तयार केली आहे. या यादीत अशा विमानांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्यावर फाईव्ह-जीच्या फ्रिक्वेन्सीचा परिणाम होणार नाही, परंतु त्यामुळे बोइंग 777 सारख्या काही विमानांच्या प्रणालीमध्ये बँड डिस्टर्बन्स होऊ शकतो, असेही सांगण्यात आले आहे. ही विमाने एअर इंडियासह इतर देशांमधील अनेक कंपन्या उपयोगात आणतात. या कारणास्तव त्यांनी अमेरिकेकडे जाणारी उड्डाणेच रद्द करण्याचा निर्णय घेतला असून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक संभाव्य उपाय असा आहे की, अमेरिकेतील विमानतळ आणि आसपासच्या भागात लोअर बँड फ्रिक्वेन्सीचा वापर करणे. असे केल्यास उड्डाणांमध्ये अडथळा येणार नाही. इतरत्र कंपन्या मिडल बँड फ्रिक्वेन्सी वापरू शकतात आणि त्या क्षमतेचे टॉवर उभारू शकतात. दुसरा उपाय असा की, फ्रिक्वेन्सीचा परिणाम उड्डाणांवर होणार नाही, अशा प्रकारे विमानतळ आणि आसपासच्या ठिकाणी टॉवर उभारणे. ज्या देशांमध्ये फाईव्ह-जी सेवा सुरू झाली आहे, अशा अनेक देशांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली आहे.

2015 पासून फाईव्ह-जी तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. तरीसुद्धा आजही आपल्याकडे या नेटवर्कच्या तांत्रिक किंवा आरोग्यविषयक परिणामांबद्दल व्यवस्थित माहिती नाही. याचा एक परिणाम असा झाला आहे की, लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची भीती बसली आहे. दूरसंचार कंपन्यांकडे भरपूर पैसा असूनसुद्धा त्या याबाबत संशोधन का करत नाहीत? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. एटी अँड टी आणि व्हेरिझोन या अमेरिकी दूरसंचार पंपन्यांनी 80 अब्ज डॉलर मोजून फाईव्ह-जी स्पेक्ट्रम विकत घेतला आहे. इतक्या मोठ्या कंपन्या संशोधनावरही काही पैसे निश्चितच खर्च करू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थाही या कामी पुढाकार घेऊ शकतात. वर्षानुवर्षे व्यक्त केल्या जात असलेल्या चिंता लक्षात घेता सरकारने दूरसंचार पंपन्यांवर संशोधन आणि चाचण्या घेण्यासाठी दबाव आणला पाहिजे. गरज भासल्यास त्यासाठी नियमावलीही करता येईल. या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित माहिती आपल्याकडे असेल तर उड्डाणेही अशा प्रकारे रद्द करावी लागणार नाहीत आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातही कोणत्याच प्रकारची भीती उरणार नाही. सात वर्षे मुळातच उलटून गेली आहेत. आता अधिक उशीर करता कामा नये. कारण तंत्रज्ञान विकसित होतच आहे.

फाईव्ह-जी नेटवर्क असताना उड्डाण करण्याची समस्या ही तंत्रज्ञानाशी संबंधित असून मानवाच्या किंवा प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित नाही हेदेखील या पार्श्वभूमीवर समजून घेतले पाहिजे, परंतु यापूर्वी आरोग्यविषयक जे प्रश्न उपस्थित झाले होते, ते उड्डाणे रद्द करण्याच्या घटनेमुळे पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. फाईव्ह-जी नेटवर्कच्या कमी क्षमतेच्या बँडची फ्रिक्वेन्सी काय परिणाम घडवून आणेल याची चिंता किंवा भीती बाळगण्याचे कारण नाही. ही फ्रिक्वेन्सी आणि फोर-जी नेटवर्क यामध्ये फारसा फरक नाही. या बँडशी आपण अनुकूलन केले आहे, परंतु विशेषतः लहान पक्ष्यांवर होणाऱ्या परिणामांची चिंता अजूनही आहे. या सर्व शंका कोणत्याही वैज्ञानिक संशोधनावर किंवा अभ्यासावर आधारित नाहीत. जर फाईव्ह-जी नेटवर्कवरच्या बँडच्या फ्रिक्वेन्सीवर आधारित असेल तर ते आपल्या शरीरावर परिणाम करू शकते असे मानले जाते. काही वर्षांपूर्वी अनेक देशांमधील शास्त्रज्ञांच्या एका गटाने असे निवेदन जारी केले होते की, फाईव्ह-जी नेटवर्क हे आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि कर्करोगासारखे आजार यामुळे होऊ शकतात, परंतु सर्वांत महत्त्वाची बाब अशी की, फाईव्ह-जी नेटवर्कच्या परिणामांविषयी जे संशोधन झाले आहे, त्यापैकी काहींचे ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत किंवा विविध संशोधनांचे निष्कर्ष विरोधाभासी आहेत.

(लेखक प्रख्यात तंत्रज्ञान तज्ञ आहेत.)