जैव संकेत – जलतत्त्वाचे आरोग्यभान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. श्री. दे. नाईक

मागच्या लेखात आपण शरीरातील पाण्याचं कार्य कसं असतं त्याविषयी माहिती घेतली. आता शरीरातील जलतत्त्वाच्या कामगिरीविषयी आणखी थोडी रंजक माहिती घेऊ.

पाऊस पडला नाही तर ‘तोंडचं पाणी पळेल’ किंवा ‘डोळ्यांत पाणी येईल’ हे विदारक वस्तुस्थितीचं वर्णन करणारे वाप्रचार वैद्यकीयदृष्टय़ा तोंडचं पाणी म्हणजे तहान भागवण्यासाठी लागणारं पाणी तर आहेच, पण तोंडात लाळेच्या रूपाने सतत वावरणारं पाणीही आहे. वाचून आश्चर्य वाटेल, पण दिवसभरात आपल्या तोंडात एक ते दीड लिटर एवढी लाळ तयार होत असते. ती तीन लाळोत्पादक ग्रंथींमधून निर्माण होते. लाळेचं पृथःकरण केलं तर त्यात 99.5 टक्के पाणी आणि अगदी कमी म्हणजे 0.5 टक्के क्षार, अमायलेज, टायटलिन, लायपेज, लायस्पेझाइम अशी एन्झाइम (विकरे) आढळतात. त्यांचाच आपण घेत असलेल्या अन्नाचं पचन करण्यात म्हत्त्वाचा वाटा असतो. यामुळे गिळलेलं अन्न चांगल्या प्रकारे पचतं हे वैज्ञानिक कारण आहे.

याशिवाय शरीरातील सर्वात नाजूक अवयवाचं, म्हणजे डोळ्याचं रक्षण त्यातील द्रवपदार्थ (वंगण) करत असतो. भावना अनावर झाल्या की, डोळ्यात आनंदाश्रू किंवा दुःखाश्रू उमटतात. हे खारे अश्रू डोळ्यातील वरच्या बाजूला असलेल्या अश्रुपिंडांमध्ये तयार होतात. डोळ्यांच्या वरच्या बाजूला पापण्यांच्या आतील भागात या अश्रुग्रंथी दडलेल्या असतात. त्याचप्रमाणे डोळ्यामधल्या मेबोनियम नावाच्या ग्रंथींमधून एक तैलद्रव पाझरतो. अश्रू आणि त्याचं मिश्रण डोळ्याला शुष्कपणापासून अबाधित ठेवतं. डोळ्याच्या दर्शनी भागात ओलसरपणा टिकून राहतो.

आता कानाच्या बाबतीत सांगायचं तर अंतःकर्णात किंवा कानाच्या आतच्या बाजूला गोगलगाईच्या पाठीवरील शंखासारखा (शंक्वाकृती) अवयव असतो. त्याला पोला सेमी सर्क्युलर कॅनल म्हणतात. या अवयवात भरलेल्या द्रवपदार्थावर आपल्या शरीराचा तोल अवलंबून असतो. या द्रवाचा दाब ठरावीक, संतुलित असेपर्यंत आपण नैसर्गिकरीत्या तोल सावरून चालतो. मात्र या द्रवाचा दाब कमी-जास्त झाला की, लगेच ‘चक्कर’ येते. सभोवताल गोल गोल फिरल्यासारखं वाटतं. यावेळी उलटीसुद्धा होऊ शकते. कानाप्रमाणे नाकातही जलतत्त्वाचा प्रभाव असतोच. नाकाच्या आतल्या बाजूला असलेल्या श्लेष्मल त्वचेतील (म्युकस मेम्ब्रेन) द्रवपदार्थ श्वासातून येणारे धूलिकण तसेच सूक्ष्म जंतू यांना अटकाव करतो. त्यामुळे फुप्फुसांकडे केवळ शुद्ध हवाच जावी अशी शरीररचना असते. एखादा तीक्र गंध, परागकण किंवा अन्य कारणांनी शिंक येण्याचं कारण म्हणजे तो नकोसा पदार्थ त्वरीत बाहेर टाकण्यासाठी नाकात अतिरिक्त द्रव तयार होत़ो या शिंकेचा वेग प्रचंड म्हणजे सुपरसॉनिक (स्वनातीत) असतो! हे सगळं आपल्या लक्षातही येत नाही.

आपण दिवसभर कार्यरत असतो. कोणी बैठं काम करतो तर कोणी शारीरिक कष्टाचं. शारीरिक परिश्रमाचं काम करणाऱ्यांना साहजिकच अधिक घाम येतो. कारण त्या काळात शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं गरजेचं असतं. त्यासाठी त्वचेखाली असलेल्या स्वेदग्रंथी वेगाने कार्यरत होतात. घामातून क्षार आणि इतर अनावश्यक पदार्थ बाहेर टाकले जातात. केवळ कामासाठीच्या श्रमातूनच नव्हे, तर व्यायाम केल्याने, धावण्याने किंवा एखादी धक्कादायक गोष्ट अचानक समजण्याने अथवा भीतीनेही घाम येतो. या सर्व गोष्टी घडतात तेव्हा असंतुलित होणारं शरीराचं तापमान संतुलित करण्यासाठी मेंदू त्वचेखालील धर्मग्रंथींना सूचना करतो आणि दरदरून घाम फुटतो.

शारीरिक जलतत्त्वाचे हे आविष्कार आपल्याला जाणवत नसल्याने त्याचा विचारही कधी केला जात नाही, पण अचानक घाम फुटला किंवा नाक वाहू लागलं, भावनांचा उद्रेक होऊन डोळ्यात अश्रू उमटले किंवा एखादा आवडीचा पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटलं की, शारीरिक जलतत्त्वाच्या दुर्लक्षित गोष्टींचा साक्षात्कार घडतो. म्हणूनच पाण्याचा थेंब न् थेंब महत्त्वाचा!

[email protected]