
>> डॉ. सीमंतिनी चाफळकर
आत्मगौरवाच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने या प्रत्येक प्रकारच्या वारशाला महत्त्व आहे. आपली अस्मिता तर त्याच्याशी जोडलेली आहेच. आपला ‘आज’ या भूतकाळाच्या भक्कम पायावर उभा आहे. जागतिकीकरणाच्या वावटळीत भरकटायचे नसेल तर इतिहासाचा हात घट्ट धरला पाहिजे. तो केवळ स्मरणरंजनासाठी नव्हे, तर डोळस अभ्यासासाठी, ऐतिहासिक वारशाच्या सहवासाने समृद्ध होण्यासाठी आणि इतिहासाकडून धडे घेण्यासाठी.
18 ते 25 नोव्हेंबर हा काळ दरवर्षी जागतिक वारसा सप्ताह म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने वारसा म्हणजे काय आणि त्यासंबंधाने आपली जबाबदारी काय हे जाणून घेणे उचितच नाही तर आवश्यकही आहे. हिंदुस्थानी संस्कृतीच्या प्राचीन तसेच समृद्ध ठेव्याबद्दल लिहावे तेवढे कमीच, पण विशेष म्हणजे हा ठेवा ग्रंथ, वस्तुसंग्रहालये, संरक्षित स्मारके यात जेवढा आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपल्या गावागावातून, शहराच्या जुन्या गल्लीबोळातून, सणसमारंभातून, रूढीपरंपरांतून, वागण्याबोलण्यातून, गाण्याखाण्यातून जिवंत आहे. आपण हिंदुस्थानचे नागरिक या ठेव्याचे वारसदार तर आहोतच, पण वाहक, संरक्षक आणि विश्वस्त आहोत. वारसा सप्ताहाच्या निमित्ताने त्याबद्दल अभिमान, गौरव या भावनांसह जबाबदारी आणि कर्तव्येही समजून घ्यायला हवीत.
नैसर्गिक सृष्टी, वस्तू व वास्तू, कला आणि संस्कृती हे वारशाचे प्रकार मानले जातात. शिवाय कौटुंबिक वारसा, स्थानिक वारसा, प्रादेशिक वारसा, राष्ट्रीय आणि अखिल मानवजातीचा वारसा असे स्तरही त्यात असतात. प्रत्येक प्रकारच्या वारशाचे स्वतंत्र महत्त्व असते. कुटुंबाच्या वारशात आपली भावनिक गुंतवणूक असते. ती आपली वैयक्तिक ओळख असते, तर स्थानिक वारशाशी आपली नाळ जोडलेली असते. एखाद्या गावात काही वर्षे घालवल्यावर तिथले हवापाणी, झाडेझुडुपे, रस्ते, गल्ल्या, इमारती आणि मैदाने- बागा, शेजारीपाजारी अन् गावकरी आपले आत्मीय होतात. तिथला इतिहास आपल्या ओळखीचा होतो आणि संस्कृती आपल्या स्व- प्रतिमेचा भाग होते. म्हणूनच पुणेकर विद्वान, पण बेरकी असतात. मुंबईकर चतूर, पण दिलदार असतात. कोल्हापूरकर रांगडे, पण कलाप्रेमी असतात आणि सोलापूरकर वरकरणी खडूस, पण आतून प्रेमळ असतात. आता या गावातला प्रत्येक माणूस तसा नसतो, पण या सर्वसामान्य ओळखीचा आपणही एक भाग आहोत असे त्या गावातल्या प्रत्येकाला वाटते खरे.
मराठी बोलणाऱ्या प्रत्येकाला आपले शिवाजी महाराज, त्यांचे गडकिल्ले, सह्याद्री- सातपुडा, कृष्णा- भीमा-गोदा- तापी- पूर्णा, विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर- तुकाराम, अजंठा-वेरूळ-घारापुरी, ओवी-अभंग अन् लावणी-पोवाडा, पगड्या-जोडे अन् पैठण्या- फेटे, पुरणपोळ्या अन् श्रीखंड, टिळक- फुले अन् शाहू महाराज यांचे कौतुक अन् अभिमान असतोच असतो. मग तो जगात कुठेही राहत असो. आता प्रादेशिक सांस्कृतिक वारशाची ही यादी हवी तेवढी वाढवता येईल. यातूनच काही गोष्टी थेट राष्ट्रीय व जागतिक दृष्टीनेही महत्त्वाच्या ठरतात. जसे लता आणि सचिन मुंबईकर अन् मराठी न राहता साऱ्या हिंदुस्थानचे नव्हे, तर साऱ्या जगाचे होतात तसेच अजंठय़ाची गुंफाचित्रे, पश्चिम घाटातली निसर्गसंपदा, येवल्याची पैठणी, मुंबईच्या वसाहतकालीन इमारती, देवगडचा हापूस अन् पंढरीची वारी आंतरराष्ट्रीय वारसा ठरतात.
आत्मगौरवाच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने या प्रत्येक प्रकारच्या वारशाला महत्त्व आहे. आपली अस्मिता तर त्याच्याशी जोडलेली आहेच. आपण आपला ‘आज’ या भूतकाळाच्या भक्कम पायावर उभा आहे. जागतिकीकरणाच्या वावटळीत भरकटायचे नसेल तर इतिहासाचा हात घट्ट धरला पाहिजे. तो केवळ स्मरणरंजनासाठी नव्हे, तर डोळस अभ्यासासाठी. वस्तू, वास्तू, निसर्ग यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी, कला- हस्तकला परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, ऐतिहासिक वारशाच्या सहवासाने समृद्ध होण्यासाठी आणि इतिहासाकडून धडे घेण्यासाठी. पूर्वजांचे कला कौशल्य, वास्तुकला कर्तृत्व यातून पर्यावरणस्नेही जीवनशैलीचे शिकता येतेच. वैशिष्टय़पूर्ण अशा हिंदुस्थानी चित्र-शिल्पकलेचा, सौंदर्यशास्त्राचा, नृत्य-संगीताचा आनंदही घेता येतो. आपले जीवन समृद्ध करतानाच पुढील पिढीच्या हाती सोपवण्यासाठी आपण हा वारसा अभ्यासपूर्वक सांभाळला पाहिजे. त्यासाठी वैयक्तिक व सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, सरकारी प्रयत्नांना बळ दिले पाहिजे. नोंदी, दस्तावेजीकरण, संशोधन, अभ्यास, छायाचित्रे व चलतचित्रीकरण, तज्ज्ञांशी चर्चा- व्याख्यानातून ज्ञानाची देवाणघेवाण, प्रत्यक्ष जतन- पुनरुज्जीवन- संवर्धनासाठी प्रयत्न, आर्थिक मदत, देखभाल- दुरुस्ती, विद्रूपीकरणाला व विध्वंसाला विरोध या सर्व प्रकारे आपल्याला सहभाग देता येईल. जागल्याची भूमिका करता येईल. फक्त हा आपला वारसा आहे म्हणून ही आपली जबाबदारी आहे हे आपण मानले पाहिजे इतकेच.
(लेखिका स्थानिक व नागरी इतिहास संशोधक, वास्तुविशारद आहेत)
























































