अनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य

>> डॉ. विजया देव

‘मेघदूत’ समजून घ्यायचं तर कधी कालिदासाच्या, तर कधी यक्षाच्या नजरेतून मेघच झालं पाहिजे. अनादी काळापासून चाललेला मेघाचा प्रवास मेघासोबतच करण्यात मजा आहे. कालिदास मेघाबरोबर यक्षाच्या मिषाने या सृष्टीशी मनसोक्त खेळलेला आहे. त्यानं- कालिदासानं तिला डोळे भरून पाहिलं, अनुभवलं आणि आपल्याला ते रूप दाखवलं. मानवी जीवनातल्या कोमल भावनांचे विभ्रमदेखील मेघाच्या नजरेतून साकार केले. पाचव्या शतकातील कवीला ही आजच्या दिवशी मानवंदना. हिंदुस्थानी जीवन, इथली संस्कृती, परंपरा, श्रद्धा, सण-उत्सव, निसर्गाचं फुलणं-फळणं हे मग हजारो वर्षांपासून या आकाशमार्गे जाणाऱया नवमेघपंक्ती पाहत आलेल्या आहेत. नव्हे, त्याच ते घडवत आलेल्या आहेत.

‘मेघदूत’ म्हणजे आपल्या कांतेपासून दुरावलेल्या एका विरही यक्षानं मेघाला केलेली प्रेमव्याकुळ विनवणी तर खरीच; पण, प्रिय पत्नीला संदेश पाठवण्यासाठी यक्षानं मेघाला दूत बनवणं, त्याच्यावर विश्वासानं ही कामगिरी सोपवणं ही महाकवी कालिदासाची बहारदार क््प्ती आहे. मेघाला त्यानं दूत व्हायची विनंती करणं यात खरं म्हणजे नवल ते काय? यक्षाच्या दृष्टीनं मेघापेक्षा योग्य कवी दूत म्हणून असू शकतो का? मेघाचा मार्ग यक्षालाच तर समजू शकतो! यक्ष आकाशसंचारी आणि मेघही गगनगामी.

यक्ष म्हणजे कुबेराचा सेवक. यक्ष, गंधर्व, किन्नर हे मनुष्ययोनीच्या वरच्या श्रेणीतील आणि देवांपेक्षा कनिष्ठ स्तरावरील होत. यक्ष आकाशमार्गे संचार करू शकत असत, पण कुबेराच्या शापामुळे त्याचा हा महिमा आता लोप पावलेला आहे (शापेनास्तंगमित महिमा…), नाहीतर तो आपल्या प्रियेजवळ क्षणार्धात पोहोचू शकला असता. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ वियोगानंतर, आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघाला पाहिल्याबरोबर मेघाबद्दल यक्षाला बंधुभाव दाटून आला. हे किती स्वाभाविक झालं! जो आकाशमार्ग यक्षाला परिचित होता, त्याच मार्गानं मेघही जाणार होता. उत्तरेला. तो आपल्या प्रेयसीला आपला संदेश नाही पोचवू शकणार?

यक्षाच्या दृष्टीने मेघ हा अत्यंत स्वाभाविक दूत आहे. कारण पृथ्वी आणि आकाश यांच्या मीलनाचा तोच तर दुवा आहे. आकाशाला पृथ्वीचा आठ महिन्यांचा विरह झालेला आहे, म्हणून तर आता धरेला भेटायला हा वर्षामेघ आलेला आहे. आकाशातून स्वर्गधरेचा संगम या मेघामार्फत होणार आहे. तर त्याच्या विशाल हृदयाला आपल्या विनंतीमुळे पाझर फुटेल आणि तो कैलासापलीकडे असलेल्या आपल्या प्रिय पत्नीला आपली विरहव्यथा सांगेल असा विश्वास यक्षाला वाटावा, यात नवल ते काय!

कालिदासाने या काव्यात यक्षाला अनाम ठेवलेले आहे. त्याला नाव दिलेले नाही आणि यक्षपत्नीलाही नाही. मुख्य व्यक्तिरेखाच अनाम ठेवणे ही या भावकाव्यातली आधुनिकताच म्हटली पाहिजे.

हा मेघ आता इथून माझ्या निवासाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे हे यक्षाच्या लक्षात आले, पण मेघाबरोबर संदेश? तो तर अचेतन. पण विरहव्याकूळ व्यक्ती अशा गोष्टींचा कुठे विचार करते? यक्षाला / कालिदासाला ही संदेशाची कल्पना कशी सुचली असेल? सीतेचे अपहरण झाल्यावर रामाची जी सैरभैर, व्याकूळ मनःस्थिती झाली ती कालिदासाच्या परिचयाची आहे. त्यातूनच हा यक्ष रामाच्या या भावनेशी जोडला जातो. हनुमान रामाची मुद्रिका घेऊन सीतेकडे संदेश घेऊन जातो हे सर्वश्रुत आहे. कदाचित तेच या काव्याचे कालिदासाचे प्रेरणास्थान असेल.

यक्षाची संपूर्णपणे अपार्थिव व्यक्तिरेखा घेतल्यामुळे कालिदासाच्या प्रतिभेला मुक्त संचार करायला या काव्यात वाव मिळाला. त्याच्या कल्पनाविलासाला बहर आला. तो कोणत्याही आधीच्या उदात्त व्यक्तींच्या दैवतीकरणाशी बांधील राहिला नाही. उलट मेघाचा आकाशमार्गे होणारा प्रवास सांगताना कालिदासाला देशाची एकात्मता दाखवता आली. त्यासाठी यक्ष व यक्षपत्नी यांची ताटातूट हे केवळ निमित्त. मेघाला कैलासापर्यंतचा मार्ग सांगताना त्याला खाली कोणकोणते भूप्रदेश, नद्या, पर्वत, नगरे दिसतील यांचे सुरस वर्णन करता आले. हे करताना कालिदासाने अक्षरशः स्वर्गधरेचा संगम घडवून आणला आहे. आपली काव्यप्रतिभा आणि देशाचं भौगोलिक, नैसर्गिक, सांस्कृतिक चित्र, इथल्या परंपरा, श्रद्धास्थानं, समाजजीवन यांची अपूर्व सांगड घातली आहे आणि आपला देश मेघानं एकवटलेला आहे हे सूचित केलं आहे.

‘मेघदूता’ला ‘पूर्वमेघ’ हा पूर्णपणे वास्तव. प्राणी, पक्षी, वनस्पती, समाज, मानवी जीवन ज्यावर अवलंबून त्या त्या सर्व गोष्टी कालिदास मेघाच्या रूपाने-निमित्ताने रसिक वाचकांसमोर उलगडून दाखवत आहे आणि मग मेघाला जायचं आहे. कैलासाच्या पायथ्याशी असलेल्या अलकानगरीत. यक्षाच्या प्रिय पत्नीकडे. ‘उत्तरमेघा’त या अलकेचं वर्णन आहे. ते मानवाच्या सर्व मर्यादा- बंधनातून पूर्ण मुक्त, अनिर्बंध, सर्वकाळ सर्व सुखं हजर असणारं, जे कदाचित प्रत्येकाचंच स्वप्न असतं!

यक्षाच्या वर्षभराच्या हद्दपारीतले पहिले आठ महिने निघून गेले आहेत आणि चार शिल्लक आहेत. एवढा काळ कसाबसा कंठल्यावर पावसाळी ढगाच्या पहिल्यावहिल्या दर्शनाने मात्र यक्षपत्नीच्या आठवणीने बेचैन झाला आहे. पुढचे चार महिने असे विरहात काढण्याची शिक्षा त्याला असहय़ झालेली आहे. मग तोपर्यंत मेघाबरोबर निरोप पाठवावा आणि प्रियेला आश्वस्त करावे असे त्याला वाटावे यात नवल ते काय!

यक्षाचे आपल्या पत्नीशी पुनर्मीलन होणार आहे, चार महिन्यांनी, म्हणजे प्रबोधिनी एकादशीला (शरद् ऋतूत कार्तिकी एकादशीला). त्या दिवशी विष्णू योगनिदेतून उठणार आहे (आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. तेव्हा विष्णू शेषशायी होऊन योगनिदेत जातो).

यक्ष म्हणतो,
शापान्तो मे भुजंगशयनादुत्थिते शारङ्गपाणी
शेषान्मासान्गमय चतुरो लोचने मीलथित्वा
पश्चादावां विरह गुणितं तं तमात्माभिलाषं
निर्वेक्ष्यावः परिणतशरच्चन्द्रिकासु
क्षपासु ।।5।। उत्तरमेघ

(शापाचा काळ संपायला फक्त चार महिने उरले आहेत. मग आपण शरदातल्या चांदण्या रात्री वियोगातले मनोरथ पूर्ण करू)

यक्ष मेघामार्फत आपल्या पत्नीला असा आश्वस्त करत आहे. तिचं क्षेमकुशलही मला परत येऊन सांग, अशी मेघाला विनंती करत आहे (परतीच्या मान्सूनचं ज्ञान कालिदासाला होतं) आणि यक्ष मेघाला हेही सांगतो,

‘तुझा तुझ्या प्रियतमा विद्युल्लतेपासून क्षणभरही वियोग न होवो’.
इथेच आपणही मेघाला निरोप देऊया… त्याच्या पुढच्या प्रवासासाठी.

कालिदासाच्या मेघदूतआधीच्या रचनांमध्ये नाटके आणि महाकाव्यांमध्ये पौराणिक महाकाव्यातील राजांचे, प्रसंगांचे आधार आहेत. महाभारत, रामायण यातील व्यक्तिरेखा आणि शिवपार्वती ही दैवते यांच्यावरून या साहित्यकृती स्फुरलेल्या आणि विकसित झालेल्या आहेत. किंबहुना, त्या काळातल्या संस्कृत काव्याचा तो संकेतच होता आणि त्या विषयातच एक थोरवी, महत्ता अनुस्यूत होती, पण ‘मेघदूत’ त्याला अपवाद आहे. ही एक प्रतिभेतून स्फुरलेली संपूर्ण, पण स्वतंत्र कृती आहे. या काव्याचा नायक ‘यक्ष’ हादेखील मनुष्य किंवा देवकोटीतील नव्हे, तर या दोन कोटींच्या मधला. कुबेराच्या शापामुळे अलकानगरीतून हद्दपार होऊन रामगिरीवर आयुष्य कंठणारा आणि ‘रामगिरी’ कसा, तर राम-जानकीच्या वास्तव्याने पावन झालेला. तेथील आश्रमांमध्ये या यक्षाने हा हद्दपारीचा काळ कंठलेला आहे. त्याला आषाढातल्या या जलभाराने लवलेल्या मेघाबरोबर पत्नीला संदेश पाठवावा असं का बरं वाटलं असेल? अशा हवेत, वातावरणात सुखी माणसालासुद्धा जिथे हुरहुर लागते (अन्यथावृत्तिचेतः) तिथे विरही यक्षाची काय कथा!

– [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या