
>> मिलिंद देखणे
एकेकाळी हायब्रिडचा जमाना होता, मात्र आता त्याच्या साईड इफेक्टस्ने लोकांना पुन्हा नैसर्गिक शेती आणि बियाणांकडे वळविले आहे. राहीबाई पोपेरे या नगर जिल्हय़ातील छोटय़ा खेडय़ातील एका निरक्षर आदिवासी स्त्रीचे बियाणा संबंधीचे कार्य, त्यांची ‘बियाणे बँक’, देशी वाणांचा त्या करीत असलेला प्रचार आणि प्रसार म्हणूनच मोलाचा ठरतो.
यंदाचे वर्ष जागतिक ‘ स्त्री हक्क वर्ष’ म्हणून साजरे केले गेले. अशा वर्षात महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळण या छोटय़ा खेडय़ातील एका आदिवासी स्त्र्ााrच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते ही निश्चितच गौरवास्पद बाब म्हणावी लागेल. राहीबाई पोपेरे या एका निरक्षर महिलेने ही कमाल केली आहे. नगरची ‘नवदुर्गा’ अशी नवी ओळख मिळालेल्या राहीबाई यांनी जगाच्या नकाशावर ‘मदर ऑफ सीड’ असा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. राहीबाई यांनी शेतीचे कुठलेही रीतसर शिक्षण घेतले नाही किंवा संशोधन शाळेत त्या गेलेल्या नाहीत. वडिलांनी दिलेली ‘जुने ते सोने’ ही खूणगाठ त्यांनी मनाशी पक्की बांधली आणि बियाणासंदर्भातील वेगवेगळे प्रयोग केले. घरच्या घरी घरगुती पद्धतीचे गावरान वाण तयार केले. बियाणे जमविण्याच्या छंदाचे रूपांतर त्यांनी ‘बियाणे बँके’त केले. आज हीच त्यांची ओळख आणि कर्तृत्व बनले आहे. पारंपरिक पद्धतीने त्या बियाणे गोळा करीत असत आणि शेतात त्याचा वापर करीत असत. पुढे ‘बायफ’ या संस्थेचे त्यांना मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्या बियाणे गोळा करायच्या छंदाला एक निश्चित आणि खरी दिशा मिळाली. त्यातून गावरान बियाणांची बँक अस्तित्वात आली. अतिशय सुंदर पद्धतीने राहीबाईंनी ही बँक आपल्या घराजवळच तयार केली आहे. त्याची निगा आणि देखरेख त्यांचे कुटुंब करीत असते. वनरई, नाचणी, वायू, भाताची रोपे, तर भाज्यांमध्ये गोड वाल, कडू वाल, हिरवा-लाल घेवडा, वाटाणा, काळय़ा शिऱयाचा घेवडा अशा विविध प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पादन त्या घेत असतात. विशेष म्हणजे ही चारशे ते पाचशे झाडे त्यांनी घराबाहेर लावली आहेत. त्याची माहिती समोरच्याला व्हावी म्हणून झाडाच्या नावाचे फलकही लावले आहेत. बियाणे गोळा करणे हा छंद असला तरी राहीबाईंना त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागले. पारंपरिक वाण गोळा करताना त्यांना प्रचंड परिश्रम करावे लागले. राहीबाई म्हणतात, ‘मी अंगठेबहाद्दर निरक्षर बाई, पण मी हरले नाही. नवनवीन मार्ग शोधत पारंपरिक बियाणे मिळवत राहिले. आज त्यातून एक हजार बियाणांची बँक तयार झाली आहे. सुरुवातीला त्यांच्या या कल्पनेला नेहमीप्रमाणे घरच्यांचा, नातेवाईकांचा विरोधच होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत घराच्या एका छोटय़ा पडवीत त्यांनी त्यांचे काम सुरू ठेवले. नंतर मात्र कुटुंबाने साथ दिली. त्यातूनच बियाणे बँक अस्तित्वात आली. बीबीसीसारख्या जागतिक अव्वल वृत्तवाहिनीने राहीबाई पोपेरे यांचा शंभर प्रेरणादायी महिलांच्या जागतिक यादीत समावेश केला. एक चालते बोलते विनाअनुदानित कृषी विद्यापीठ असेच राहीबाईंबद्दल म्हणता येईल. ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीच पुण्यातील एका कार्यक्रमात राहीबाईंचा गौरव ‘मदर ऑफ सीड’ म्हणून केला. त्यांचा हा गौरव अत्यंत यथार्थच म्हणावा लागेल. किंबहुना आज त्यांची तीच ओळख बनली आहे. राहीबाईंची अकोले तालुक्याच्या एका खेडय़ातील ही बियाणे बँक बघण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशविदेशांतून लोक येतात. त्यात अनेक संशोधक असतात. कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थीही असतात. राहीबाईंनी विकसित केलेल्या वाणांचा उपयोग आणखी कशा पद्धतीने होईल याचे संशोधन कृषी विद्यापीठांमध्ये सुरू झाले आहे. हायब्रिड बियाणांचे दुष्परिणाम आणि दुप्रभाव जसे जमिनीच्या पोतावर होतात तसेच ते मानवी आरोग्यावरही होत असतात. एकेकाळी हायब्रिडचा जमाना होता, मात्र आता त्याच्या साईड इफेक्टस्ने लोकांना पुन्हा नैसर्गिक शेती आणि बियाणांकडे वळविले आहे. राहीबाईंचे बियाणांचे हे कार्य म्हणूनच मोलाचे ठरते. त्यांची देशी बियाणांची ही बँक त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. राहीबाई एवढय़ावरच थांबलेल्या नाहीत. देशी वाणांचा प्रचार आणि प्रबोधन करण्यासाठी त्या ठिकठिकाणी व्याख्याने देतात. अशा बियाणांचा वापर झाला तर जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच मानवी शरीरालाही त्रास होणार नाही याची जाणीव त्या करून देत असतात. राहीबाईंच्या या उपक्रमामुळे परिसरातील आदिवासींनाही फायदा झाला आहे. या भागातील लुप्त होत चाललेले डांगी जनावर, काळभात आदींना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न तेथील शेतकऱयांनी सुरू केले आहेत. शिवाय स्थानिक आदिवासींनाही दररोज शुद्ध सात्त्विक आणि पौष्टिक अन्न मिळत आहे. ही सर्व राहीबाईंच्या बियाणे बँकेची आणि देशी वाणांच्या प्रचाराची देणगी आहे. राहीबाईंकडे सुमारे 54 पिकांचे विविध 116 वाण आहेत. या प्रत्येक बियाणाची माहिती त्यांना मुखोद्गत आहे. हे बियाणे औषधी आहे का, त्याचा फायदा काय याचा तपशील त्या सहज सांगतात. नगरची ही ‘मदर ऑफ सीड’ देशातील सर्व महिलांसाठी प्रेरणा ठरेल हे निश्चित!



























































