सप्तसागरातला देवमासा : पद्मश्री तारानाथ शेणॉय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण कारखानीस

जन्मतः मुका, बहिरा आणि अंशतः अंध असूनही ज्याने सप्तसागरात पोहण्याचे अनेक जागतिक विक्रम करून दिगंत कीर्ती मिळवली, तो तारानाथ शेणॉय 10 जून 2019 रोजी आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण करत आहे. त्याच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्ताने त्याच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा घेतलेला हा वेध…

24मार्च 1990. दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनाच्या अशोक हॉलमध्ये पद्मपुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत होता. वातावरण उत्साहाचं होतं. त्यातही, ज्यांना तो जाहीर झालेला होता, त्यांच्यातल्या तरुणाईच्या डोळ्यांत कुतूहल आणि औत्सुक्य तरळत होतं, तर बुजुर्ग मान्यवरांच्या डोळ्यांत एक प्रकारचा कृतार्थ भाव दाटून आला होता. हिंदुस्थानच्या इतिहासात आज प्रथमच एका बहिऱया, मुक्या आणि अंशतः अंध असलेल्या साहसी जलतरणपटूला त्याची अद्वितीय अशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी तसंच त्याचं अचाट धैर्य आणि त्याची प्रबळ इच्छाशक्ती लक्षात घेऊन पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येत होतं. ती व्यक्ती म्हणजे तारानाथ शेणॉय.

तारानाथ हा जन्मजात मुंबईकर. तारानाथ हे नारायण शेणॉय आणि राजिवी आक्का या दांपत्याचं सहावं अपत्य. तारानाथ हा दिसायला तेजस, लोभस आणि गोंडस असला तरी तो आपल्या एका बहिणीप्रमाणे कर्णबधिर आणि त्यामुळे मुका आहे हे त्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांतच कळून चुकलं. त्यातच डोळ्यांची दृष्टीही अधू असल्याचं लक्षात आलं. वयाच्या तिसऱया वर्षापासून मुक्या आणि कर्णबधिर मुलांच्या शाळेत जाऊ लागला. त्या शाळेत त्याला हाताच्या बोटांनी व्यक्त होण्याची कला आणि त्याच्या जोडीनं ओष्ठलिपी अर्थात इतरांच्या ओठांच्या हालचालींवरून त्यांचं म्हणणं समजून घेण्याची कला शिकवली. यानंतर नियमित शालेय शिक्षण घेत तारानाथने दादर चौपाटीलगतच्या महात्मा गांधी तरण तलावात पोहण्याचा भरपूर सराव केला.
स्थानिक पातळीवरच्या स्पर्धा जिंकत जिंकत त्यानं जिल्हास्तरावरच्या, राज्यस्तरावरच्या आणि पुढे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा एकापाठोपाठ एक जिंकण्याचा सपाटाच लावला आणि अक्षरशः कपाटभर ट्रॉफी आणि पोतंभर पदकं घरी आणली. विशेष म्हणजे कानानं बहिरा असल्यानं स्टार्टर शिट्टीचा अथवा पिस्तुलाचा आवाज त्याला ऐकू येत नसे. इतर स्पर्धकांनी पाण्यात उडी मारलेली पाहून त्यानंतर तो पाण्यात सूर मारत असे आणि वेगानं पोहत इतर स्पर्धकांना मागे टाकत असे. तारानाथनं लांब अंतराच्या आणि खुल्या समुद्रातल्या स्पर्धांमध्ये पोहून आपलं नशीब आजमावण्याचं मनाशी ठरवून टाकलं.
सर्वप्रथम त्यानं धरमतरची खाडी विक्रमी वेळात पोहून कुठलीशी एक स्पर्धा जिंकली आणि खुल्या समुद्रात दीर्घ अंतर पोहून जाण्याबाबतचा त्याचा आत्मविश्वास अधिकच बळावला. 1981 साली तो श्रीलंकेला गेला. श्रीलंकेच्या तलाईमन्नार बंदरापासून हिंदी महासागरात पाल्कची सामुद्रधुनी आहे. 53 किलोमीटर लांबीच्या या सामुद्रधुनीतून पोहणाऱयाला शार्क मासे डंख करण्याचा धोका असतो. तारानाथने हा धोका पत्करत पाल्कची सामुद्रधुनी पार केल्यानं तसे करणारा तो जगातला पहिलाच बहिरा आणि मुका जलतरणपटू अशी त्याच्या विक्रमाची नोंद करण्यात आली. महत्त्वाकांक्षी तारानाथला आता इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचे वेध लागले. पहिल्या प्रयत्नात अपयश येऊनही पुढल्याच वर्षी, 1983 साली पुन्हा तो फ्रान्स ते इंग्लंड असं पोहून इंग्लिश खाडी पार करायला अधिक जोमानं पाण्यात उतरला. 21 मैल अर्थात 33. 7 कि. मी. अंतराची इंग्लिश खाडी त्यानं 10 तास 54 मिनिटांत पोहून पार केली. तारानाथ नारायण शेणॉय इंग्लिश खाडी पोहून जाणारी जगातली पहिलीच मुका-बहिरा आणि अधू दृष्टीची व्यक्ती ठरली. जगभरातल्या वृत्तपत्रांनी या गोष्टीची दखल घेत मोठमोठय़ा मथळ्यांनी हे वृत्त प्रसारित केलं आणि तारानाथची कीर्ती दिगंत पसरली. तारानाथनं इंग्लिश खाडी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर तीनदा, तीही सलग तीन वर्षांत पोहून पार केली.

1986 साली त्यानं आफ्रिका खंडाच्या पूर्व भागातून, विशेषतः इजिप्त देशातून दुथडी भरून वाहणाऱया नाईल नदीत 25 किलोमीटर अंतर अतिवेगानं पोहत एक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा लीलया जिंकली. त्याच वेळी जलतरणपटू तारानाथ शेणॉयआणि फुटबॉलपटू दियागो मॅरेडोना हे एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात मैत्रीसंबंध निर्माण झाले, जे आजही तितकेच घनिष्ट आहेत. तारानाथनं त्याच वर्षी म्हणजे 1986 साली इजिप्तच्या उत्तर सीमेवर लाल समुद्रातल्या सुवेझ कालव्यात पोहण्याचा आगळावेगळा अनुभव घेतला. इटलीलगतच्या नेपल्स समुद्रातलं काप्री बेट आणि नापोली बंदर यांच्यादरम्यान झालेल्या सुमारे 25 सागरी मैलांच्या जलतरण स्पर्धेतही तो चमकला. 1987 साली त्यानं पोहत पोहत मॅनहटन बेटाला संपूर्ण वळसा घातला. अमेरिकेच्या पूर्वेकडील अटलांटिक महासागराच्या पाण्यातल्या या पराक्रमानंतर तो अमेरिकेच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या पाण्यात उतरण्यासाठी कॅटेलिना चॅनल स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाला. ती स्पर्धा पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागरात सांता कॅटेलिना बेट ते दक्षिण कॅलिफोर्नियाचा किनारा अशी झाली. त्यावेळी 42. 4 कि.मी. अंतर पार करायला तारानाथला 10 तास 15 मिनिटं लागली.

त्याच वर्षापासून स्वित्झर्लंडमध्ये सुरू झालेल्या 27 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन झुरिक लेक स्पर्धेत पोहताना तारानाथनं केवळ 9 तास 6 मिनिटांत ते अंतर एकाच दमात पार केलं. तो दिवस होता 19 सप्टेंबर 1986. तारानाथच्या यशाची कमान वर्षागणिक चढतीच होत होती. तारानाथ आता अधीर झाला होता ते जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून जाण्यासाठी. या धोकादायक सामुद्रधुनीत कोणतेही बचावात्मक साधन न वापरता 4 ऑगस्ट 1988 रोजी त्यानं आपल्या जिद्दीच्या जोरावर स्पेन ते मोरोक्को असं 14.4 कि.मी. अंतर 5 तास 45 मिनिटांत पोहून आणखी एक विक्रम नोंदवला. त्यापाठोपाठ तुर्कस्तानची डार्डानेले सामुद्रधुनी पोहून पार करत तारानाथनं आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवून घेतला.

त्याशिवाय इटलीच्या दक्षिण किनारपट्टीवरच्या जिनोआ बंदरापासून दक्षिण दिशेला असलेल्या कोर्सिका बेटापर्यंत उत्तर-दक्षिण पसरलेल्या निळ्याशार लिगुरियन समुद्रातली दीर्घ अंतर पोहण्याची एक स्पर्धादेखील सहजपणे जिंकली.

1989 साली अमेरिकेच्या अटलांटा शहरात झालेल्या वैश्विक शर्यतीत भाग घेत असताना तारानाथला अनेक जाचक अडचणींना तोंड द्यावं लागलं तरी त्याही स्पर्धेत तो सहभागी झाला. तिथून परतण्यापूर्वी त्यानं मॅनहटन बेटाला पुन्हा एकदा पोहत वळसा घालण्याचा आगळा आनंद अनुभवला.

1989 सालीच तो विवाहबद्ध झाला. सरोजिनी ही त्याची पत्नी. ती स्वतः सफाईदार मराठी-इंग्रजी बोलणारी आणि अव्यंग असूनही तारानाथला जीवनभर साथ देण्याचा तिचा निर्णय एक प्रकारे धाडसाचा आणि म्हणूनच कौतुकास्पद होता. सरोजिनी ही तारानाथच्या विवाहोत्तर जीवनात तारक आणि प्रेरक ठरली. तारानाथच्या पुढल्या सगळ्याच खुल्या सागरी स्पर्धांमध्ये तिनं तारानाथचं मनोबल उंचावलं, त्याला साथसोबत दिली, आधार दिला. आजही ती आपली स्वतःची हौसमौज बाजूला सारून पतीचा छंद आणि पुत्राचं उच्च शिक्षण यांना प्राधान्य देत आपल्या व्यवहारचातुर्यानं आणि काटकसरीपणानं नेटका संसार करत आहे.