हिंदी चित्रपटसृष्टीवरील मराठी ठसा

>>प्रिया भोसले

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार नुकताच दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना जाहीर झाला.त्या निमित्ताने त्यांच्या सिनेकारकिर्दीचा घेतलेला आढावा.

15 फेब्रुवारी 1964 रोजी कोल्हापूर मध्ये जन्मलेल्या आशुतोष गोवारीकरांचा सिनेसृष्टीत करीयर करायचा तसा अजिबात मानस नव्हता.काॅलेजमध्ये असताना नाटकात,नृत्यात त्यांची वर्णी लागत होती,तितकाच काय तो कलेशी संबध.अशात आमिर खानच्या होली चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला.फारसं लक्ष जावं अशी ती भूमिका नव्हती.पण त्यानंतर 1987 ला दूरदर्शनवर आलेल्या आणि प्रचंड लोकप्रिय झालेल्या अमोल पालेकरांच्या कच्ची धूपमधली भूमिका त्यांची खरी ओळख निर्माण करणारी ठरली.सणसणीत उंची,चेहरयावर गोडवा असलेला हा तरुण भाग्यश्रीचा नायक म्हणून लोकांना खुप भावला आणि तेव्हाच्या कित्येक तरुणींचा क्रश हि होता.

नाम, गूंज, गवाही, सलीम लंगडे पे मत रो, इंद्रजीत, जनम,चमत्कार, कभी हा कभी ना हे हिंदी चित्रपट, तर वजीर, सरकारनामा, एक रात्र मंतरलेली सारखे मराठी चित्रपट आणि भारत एक खोज,सर्कस, वोह ,सीआयडी सारखी मालिका करत असताना दिग्दर्शक व्हावं अशा विचाराला काही गोष्टी निमीत्त ठरल्या.एका मुलाखतीत ते म्हणतात,सुरुवातीच्या काळात शुटींग दरम्यान एखादी बाब खटकली किंवा चुकीची वाटली कि त्याबद्दल ते दिग्दर्शकाला सांगत पण निवेदित कलाकाराकडून आलेल्या अशा सूचनांकडे फारसं लक्ष दिलं जात नसे.अशावेळी…मी दिग्दर्शक झालो तर माझ्याकडून ह्या चूका होणार नाहीत,असे विचार मनात यायचे.ह्याच विचारातूनच भविष्यात दिग्दर्शक होण्याची बीजे रोवली गेली.

मित्रांच्या प्रोत्साहानामुळे त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला ..तो होता पेहला नशा! चित्रपट फार चालला नाही.दुसरा आमिर खानसोबतच्या बाजी चित्रपटाला हि फारसं यश मिळालं नाही परंतु आमिरच्या भुमिकेसोबत गोवारीकरांच्या दिग्दर्शनाचं तेव्हा कौतुक झालं.ह्या दोन चित्रपटानंतर मालिका आणि चित्रपटात अभिनय करत असताना तिसरया चित्रपटाच्या कथेचे विचार मनात घोळत होते.विरुद्ध विचारसरणीचे माणसं एकत्र येऊन काही दैदीप्यमान घडवू पाहतात,साधारण अशी कथा असलेल्या पिक्चरचा ध्यास सुरु झाला.पण पुढे जाऊन आपण सिनेसृष्टीत इतिहास रचणारा सिनेमा दिग्दर्शित करणार आहोत ह्याची त्यांना तरी कल्पना होती?गोष्टी जुळत गेल्या.

आणि…2001 साली लगान प्रदर्शित झाला!

काही चित्रपट चांगले असतात काही चित्रपट खास असतात तर काही चित्रपट इतिहास रचणारे असतात…लगान तिसरया यादीत येतो.असे चित्रपट सिनेमाची प्रत्येक बाजू किती उत्कृष्ठ आहे हे विस्तृतपणे सांगतात.स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आणि क्रिकेटसारख्या खेळाची सांगड घालून गोवारीकर यांनी रूपेरी पडद्यावर नेत्रदीपक खेळ खेळून दाखवला.लगानसारखा चित्रपट शतकात एकदाच येतो.जो आधीच्या पराभवाची उट्टं काढतो आणि आगामी चित्रपटांबाबतीत अपेक्षा वाढवतो.लोकं मग दिग्दर्शकाच्या नावाने पुढचा चित्रपट बघायला जातात.असं भाग्य फार कमी दिग्दर्शकांना मिळतं,आशुतोष गोवारीकर हि त्याबाबतीत सुदैवी ठरले.त्यांच्या नावाभोवती इतकं वलय निर्माण झालं कि स्वदेस सुरुवातीला हाऊसफुल्ल ठरला, इतका कि चित्रपट बघायला गेलेल्या त्यांच्या वडीलांनाही स्वत:च्या मुलाचा चित्रपट बघायला तिकीट मिळालं नाही. पण स्वदेसबाबतीत लोकांच्या अपेक्षा लगानसदृष्य होत्या. आधीचा मैलाचा दगड ठरलेला चित्रपट मनात ठेऊन लोकांनी स्वदेस पाहीला आणि स्वदेसला तितकं व्यावसायिक यश मिळालं नाही.स्वदेस गोवारीकरांचा सर्वोत्कृष्ठ सिनेमा होता फक्त लोकांनी त्याची तुलना लगानसोबत केली.जी गत सिप्पींच्या शोलेमुळे शानची झाली तेच प्राक्तन स्वदेसच्या नशिबी आलं.
लगानला तब्बल 56 पुरस्कार मिळाले तर स्वदेसला 18 मिळाले.

स्वदेसनंतर गोवारीकरांनी ऐतिहासिक अव्यक्त प्रेमकहाणी पडद्यावर आणली…जोधा अकबर!सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनासोबत चित्रपटाची प्रत्येक फ्रेम देखणी करणारे ऋतिक-ऐश्वर्या सारखे कलाकार आणि ऐतिहासिक चित्रपटाचा भव्यदिव्य कॅनव्हास..38 पुरस्कारप्राप्त जोधा अकबर सुपरहिट झाला आणि पुन्हा एकदा आशुतोष गोवारीकर नाव सुपरहिट झालं.

दिग्दर्शनासोबत राजेश मापुस्कर यांच्या व्हेंटिलेटर ह्या मराठी चित्रपटात राजा कामेरकरची भूमिका करुन त्यांनी मराठी प्रेक्षकांना खुष केलं.व्हेंटिलेटर उत्तम सिनेमा होता, तो तसाही सुपरहिट झाला असताच परंतु आशुतोष गोवारीकर ह्यांच्या भूमिकेमुळे चित्रपटाला चार चाँद लागले हे मात्र नक्की.ह्या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे दोन पुरस्कार मिळाले.

चित्रपटांने लोकांचं फक्त मनोरंजन करु नये तर प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करायलं हवं अशा मताच्या आशुतोष गोवारीकरांचे सगळेच चित्रपट त्यांच्या ह्या विचारसरणीला साजेसे आहेत.आजवरच्या सिनेमातून त्यांचा ऐतिहासिक विषयाकडचा ओढा दिसून येतो.पण म्हणून मनाला वाट्टेल ते बदल न करता, इतिहासात कोणतीही छेडछाड न करता इतिहासाचं मूळ स्वरूप आपल्या दिग्दर्शनाने झळाळून टाकण्याचं गोवारीकरांचं कौशल्य वादातीत आहे.

मोहेंजोदारो,पानीपत आणि खेले हम जी जान से चित्रपटांना यश मिळालं नसलं तरी दोन चार चित्रपटाच्या अपयशाने झाकोळून जाणारं आशुतोष गोवारीकर हे नाव नाही.चित्रपटाच्या इतिहासात मानाचं स्थान पटकावणारा एक लगानच नाही तर,पुन्हा एकदा इतिहास रचणारा चित्रपट ते घेऊन येतील ह्यात काही शंका नाही.कारण पुनरावृत्ती इतिहासाचीच केली जाते. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारया आशुतोष गोवारीकरांचा 15 फेब्रुवारी जन्मदिवस. मराठी माणसाच्या मनात अभिमानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या आशुतोष गोवारीकर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!