
>> रविंद्र तांबोळी
नवीन वर्षाची चाहूल लागली की सगळ्यात आधी विचार येतो तो या वर्षात आपण कोणते संकल्प करायचे याचा. असे हे रचलेले संकल्प नवीन वर्षाच्या सुरूवातीच्या आठवडय़ातच बारगळतात परंतु ते ठरवण्याची मुभा मात्र असतेच की… तर मराठवाडी बाण्याप्रमाणे त्यांचे संकल्पही निराळे असणार. अशा या निराळ्या संकल्पांच्या निराळ्या मराठवाडी तर्हा…
मराठवाडय़ातील नांदेड शहराचे आम्ही रहिवासी असून आमच्या गावात डॉक्टर-इंजिनीअर घडवणाऱया अनेक कोचिंग क्लासेसच्या फॅक्टऱया आहेत. या साऱया फॅक्टऱयांमध्ये मात्र परगावची मुले येऊन शिकतात आणि मार्काप्रमाणे मिळालेल्या इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये निघून जातात.
शहरातील व जिह्यातील मुले मात्र इथे परमनंट बेकार म्हणून फिरत राहतात. या पर्मनंट बेकार मुलांना आवडणारा भाग्यनगर एरिया असून त्या परिसरातच आमचे वास्तव्य असते. आमच्या परिसरातील भाग्यनगर रोड म्हणजे मोस्ट हॅपनिंग स्ट्रीट असून तिथे अनेक छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. अशा हॉटेल्सपैकी ‘पवार टी हाऊस’ हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल असून तिथे सारे आबालवृद्ध चहापानासाठी जमत असतात. चहापानाच्या निमित्ताने गप्पाष्टके रंगवत असतात.
आम्ही तिथे दिवसातून तीन वेळेस जात असतो. पहाटेचा पहिला चहा आम्ही तिथेच घेतो, तर संध्याकाळचा फेरफटका मारून घरी येताना तिसरा चहासुद्धा तिथेच घेतो. ही आमची दैनंदिनी असून कालही आमचे तसेच चालू होते.
सकाळचा पहिला चहा घ्यावा म्हणून आम्ही ‘पवार टी हाऊस’मध्ये बसलो असताना शेजारच्या टेबलावर बसलेल्या दोन बेकार पोरांचा संवाद आम्हाला ऐकू आला. आमच्या बाजूला बसलेला बेकार युवक दुसऱया बेकार मित्राला म्हणत होता, “आता एक जानेवारी जवळ आली बघ. या वर्षी मी काय करू लागलो ते तुला सांगतो. कालच मी डिजिटल मार्केटिंगच्या ट्रेनिंगचे पैसे भरले. नंबर एकमध्ये ते ट्रेनिंग घेतो आणि कंटेंट क्रिएटर म्हणून मस्त पब्लिसिटी कमावतो. उगा डोक्याला ताप देऊन मेहनत करून पैसे कमावण्यापेक्षा हे बरं हाय! एक तारखेला यूटय़ूब चॅनेल सुरू करू. फेसबुकवर रोज एक रील बनवून टाकतो आणि पहिल्या हप्त्यातच पाचशे सबक्राईबर चट म्हणून बनवून टाकतो.”
त्याचा हा संकल्प ऐकणारा त्याचा दुसरा मित्र त्या वेळेस त्याला म्हणाला की, “ही मगजमारी कर, पण अजून एक करू. आपण शेअर मार्केटचे ऑनलाइन ट्रेनिंग घेऊ. नाहीतरी या वेळी कापसाला भाव नीट भेटला नाही, यंदा पाऊसपाणी बरोबर नाही अन् उसाचं काही खरं नाही, पण मी तर पेपरात वाचले की, हे सुरू होणारं वर्ष तेजीचं हाय म्हणे! या तेजीचा फायदा घेऊ. बँकेत जाऊन काहीतरी कोलॅटरल देऊन कॅश घेऊन नंबर एक इन्व्हेस्टमेंट करू. दाबून पैसे कमवणे सुरू करू.” आपापले संकल्प बोलून ते दोघे निघून गेले. आमचे टवकारलेले कान मात्र अजूनच बाजारगप्पा ऐकायला सज्ज होते.
त्याच वेळी तोंडओळख असलेल्या दोन बेकार युवकांची हॉटेलमध्ये एन्ट्री झाली. सुदैवाने ते आमच्या बाजूला बसले. त्यांनी ‘वन बाय टू’ चहाची ऑर्डर दिली आणि त्यांचा संवाद सुरू झाला. त्यातील एक मित्र म्हणत होता की, “मायला, हे सुरक्षित बेकाराचं लाईफ वाईट आहे. हाताला विरंगुळा आहे. मात्र प्रत्येक गोष्टीचा फार कंटाळा आहे. नोकरी लागलेला आपला कोणता तरी मित्र आपल्याला पाजवतो काय याच्यासाठी? सगळ्यांना मोबाइल लावावा लागतो. रोज रात्री कोणी ना कोणी म्हणते म्हणा की, ठीक आहे! तू ये पार्टीला, पण घरी गेलं की, तिकडे वाट बघत असलेले बाबा जागे असतात. फुल शिव्या घालतात. एवशिकून हेच करायलास की ! म्हणून सकाळी आई डोकं खाऊन टाकते. आता या वर्षी काय करू लागलो की, जेवकमावते दोस्त आहेत त्यांच्या प्रत्येक पार्टीची अरेंजमेंट मी करणार आणि पैसे ते देतात, पण ते जेव्हा पितील तेव्हा मी न पिता सर्वांना घरी सोडल्यावर जे उरले ते गुपचूप माझ्या घरी आणणार आणि सकाळी सकाळी घेणार! सकाळी घेतलं तर काय घडल की मायबापाला ते लक्षात येणार नाही. सकाळी सकाळी माल मारला आणि एखादा बाहेर भेटला, लाल डोळे बघून त्याला थोडा वास आला तर तो समजून जाईल की, याने रात्री जास्त घेतली असेल. जर कोणी असा विचार नाही केला तर तसा तो म्हणू शकेल की, याने रात्री फार काम केलं असेल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असेल, सगळीकडे फॉर्म भरला असेल. त्याच्यामुळे याचे डोळे लाल दिसू लागलेत!
हे असे फायदे होतील, पण सर्वात मोठा फायदा काय होणार आहे की, एकदा सकाळी जर मी पिऊ लागलो तर ती थोडी थोडी प्यायची सवय लागेल आणि परत दिवसभर गावभर फिरून रात्रीची सोय करायची संधी मिळेल. हे फायदे लक्षात आलेत म्हणूनच पुच्या वर्षी मी सावध बेवडा म्हणूनच फिरणार आहे बघ.”
त्या दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तरीही आम्ही तिथून उठलो आणि बाहेर पडलो. आमच्या शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या या ‘पवार टी हाऊस’समोर एक महाभारतकालीन खड्डा असल्याने त्याला टाळत आम्ही आमच्या कॉलनीकडे निघालो असताना आमचे सेवानिवृत्त मित्र बालाजीराव हातात पूजासामग्री घेऊन हनुमान मंदिराकडे जाताना आआम्ही त्यांना नमस्कार केला आणि म्हटले की, ‘आज इतक्या लवकर देवाला का त्रास देताय?’
आमच्या या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘ते हनुमानाच्या साक्षीने या वर्षी शंकराला दर सोमवारी वर्षभर जलाभिषेक घालणार असून त्यात रस्त्यावर खड्डे निर्माण होण्यासाठी जी जी मंडळी कारणीभूत आहेत त्यांना धडा दे! असा नवस ते बोलणार आहेत.’
बालाजीरावांचा अभिनव संकल्प ऐकून आमचे कर्णचक्षू तृप्त होऊन गेले आणि आम्ही सावध पावलांनी घरी पोहोचलो. बैठकीत प्रवेश करताना आम्हाला तिथे सिंधुताई आया. सिंधुताई आमच्या बाजूच्या बंगल्याच्या मालकीण असून त्या आमच्या सौभाग्यवतीच्या सख्ख्या शेजारीण आहेत. त्या आमच्या पत्नीमहोदयांना म्हणत होत्या की, त्यांना आता मराठवाडय़ात करमत नसून या वर्षी त्या लवकरच पुण्याला स्थलांतर करणार आहेत. लग्नाला आलेल्या त्यांच्या मुलाला स्थळं सांगून यावीत म्हणून पुण्याला स्वमालकीचा फ्लॅट आहे हे त्यातून सिद्ध होणार आहे. आमच्या कॉलनीतला बंगला विकून त्या पुण्यामध्ये प्रशस्त असा तीन बेडरूमचा फ्लॅट घेणार आहेत. त्यांचा हा अप्रत्यक्ष संकल्प ऐकून सरते वर्ष आम्हालाही सावध करून गेले.
घराघरात वापुण्याविषयीचे प्रेम आम्ही गेली काही दशके अनुभवत आहोतच. मराठवाडय़ाला निवांतपणा जसा लाभला आहे तसाच आता गावोगावच्या घरांच्या रिकामपणालाही अनुभवावे लागणार आहे ही जाणीव आम्हाला त्या क्षणी झाली आणि आम्हीही येणाऱया वर्षासाठीचा संकल्प सोडला. त्यात आम्ही असे ठरवले की, इथून जो कोणी घर विकून जाणार आहे, त्याला योग्य गिऱहाईक आणून देण्याची जबाबदारी घेणे हे आपले कर्तव्य समजू या. त्यातूनच कुठे आपल्याला दोन टक्के दलाली मिळवू या. ओसाडपणामधली हिरवळ ती हीच ठरवणारा हा संकल्प आम्हाला सुचला आणि तेव्हापासून आम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची वाट पाहणे सुरू केले आहे.
n [email protected]


























































