साहित्यजगत- अभ्यासकाचे जाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

कल्याणचे इतिहास संशोधक श्रीराम साठे यांचे 25 सप्टेंबर 2023 रोजी 78व्या वर्षी निधन झाले. श्रीराम साठे ठसठशीतपणे लक्षात आले ते त्यांच्या ‘पेशवे’ या ग्रंथामुळे. आठशे पानांचा मोठय़ा आकाराचा हा ग्रंथ प्रफुल्लता प्रकाशनने प्रकाशित केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल 2004 मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर समग्र पेशवाईच्या अभ्यासाची एक निश्चित दिशा ठरवून पुस्तकाचा आराखडा व त्यातील लेख मनात योजून पुस्तकाचा प्रकल्प हाती घेतला. सात वर्षे वाचन व अभ्यास केल्यावर पुस्तक आकारास आले, पण हा अभ्यास इतका सांगोपांग आहे की, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी ‘रमा-माधव’ चित्रपट करताना बाबासाहेब पुरंदरे यांच्या सांगण्यावरून या पुस्तकाचे मार्गदर्शन घेतले.

?‘रमा-माधव’ चित्रपटाच्या श्रेय नामावलीत श्रीराम साठे आणि त्यांच्या ‘पेशवे’ पुस्तकाला ते श्रेय देण्यात आलेले आहे. मृणाल कुलकर्णी यांनी त्या वेळी आपल्या युनिटमधल्या प्रत्येकाला स्वत पुस्तक विकत घेऊन दिले आणि ते वाचायलाही लावले. ही दाद श्रीराम साठे यांच्या लेखनाला होती. साठे यांचे हे पहिलेच दणदणीत पुस्तक. बाबासाहेब पुरंदरे आणि रणजित देसाई यांच्या साहित्याच्या प्रेरणेने त्यांना ऐतिहासिक वाचनाचा नाद लागला. त्यातदेखील मराठय़ांच्या देदीप्यमान इतिहासाची गोडी लागली आणि पेशव्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाच्या इतिहासाने ते भारावून गेले. त्यातूनच पेशव्यांच्या कथा, रेडिओवरच्या श्रुतिका, ललित लेख असे लिहिता लिहिता त्यांनी नंतर चक्क ‘रमा-माधव’ हे तीन अंकी नाटक लिहिले. या नाटकात साठे यांनी माधवरावांची भूमिकादेखील केलेली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचे महान कार्य 104 वर्षे सातत्याने पेशव्यांनी केले ही बाब नजरेआड करून चालणार नाही. असे असूनही पेशवे आणि त्यांची पेशवाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा पद्धतशीर उद्योग मधल्या काळात झालेला दिसतो. हे पाहूनच साठे यांनी पेशव्यांच्या जीवनातील अनेक बारीक सारीक घटनाच्या नोंदी व बारकावे अभ्यासून समग्र पेशवाई यथासांग मांडायचे ठरवले. ते लिहिताना इतिहासाचा एक अभ्यासक, संग्राहक व संकलक या जाणिवेचे भान ठेवून ऐतिहासिक व्यक्तीची जातपात, रीतिरिवाज, धर्मपंथ, याबद्दल कोणताही पूर्वग्रह दूषित न ठेवता पेशवाईतील धुरिणांचे राज्य कार्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, राग, लोभ, हेवेदावे याचे सम्यक दर्शन घडवलेले आहे. त्याबाबत त्यांनी खुलासादेखील केला आहे की, प्रस्तुत पुस्तकात सामाजिक पेशवे ही मुख्य संकल्पना मनी ठेवून साकारलेले असल्याने लढायांची वर्णने, ऐतिहासिक उतारे, पत्रे आदी गोष्टींचा समावेश न करता पेशव्यांच्या कारकीर्दीतील तपशील प्रामुख्याने लिहिले आहेत. पेशव्यांच्या माहेरवाशिणी, पेशव्यांच्या सासुरवाशिणी, पेशव्यांचे गुलाबी जीवन, कर्ज पात अडकलेली पेशव्यांची अर्थव्यवस्था आणि सर्वात महत्त्वाचे प्रकरण म्हणजे पेशव्यांची कीर्ती-अपकीर्ती या प्रकरणांत पेशव्यांचे नेमके मूल्यमापन केलेले दिसते. या ग्रंथाला जी सात परिशिष्टे आहेत त्यावरून साठे यांनी किती कष्टपूर्वक माहिती गोळा केलेली आहे हे दिसते. थोडक्यात पेशव्यांबद्दल बरेच काही या ग्रंथात सापडू शकते, जे दुर्मिळही आहे.

अशा या आगळय़ावेगळय़ा ग्रंथाला साहजिकच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था यांचा पुरस्कार मिळाला. सार्वजनिक वाचनालय कल्याणतर्फे ठाणे ग्रंथोत्सव 2022 या कार्पामात श्रीराम साठे यांचा सत्कार करण्यात आला. या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपताच प्रफुल्लता प्रकाशनने लगेच दुसरी आवृत्ती काढली. हा एक विषय संपताच साठे यांनी लगेच ‘मुगल सम्राट’ या नव्या विषयाला हात घातला. त्याचीदेखील घसघशीत आठशे-नऊशे पाने आहेत. यावरून त्याची व्याप्ती कळावी. प्रफुल्लता प्रकाशनातर्फे येत्या दोनेक महिन्यांत तो प्रकाशित होईल, पण दुःख एवढेच ते पाहायला आता श्रीराम साठे नाहीत.