
>> रविप्रकाश कुलकर्णी
जन्ममरणाचा खेळ अनादी काळापासून अनंत काळापर्यंत चालूच राहणार आहे, पण माणूस गेल्यानंतर तो कुठे जातो याचा पत्ता आजतागायत कोणाला लागलेला नाही. ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’ असं म्हटलं गेलेलं आहे ते खरंच. पण या अस्वस्थतेतून माणूस गेल्यानंतरच तो माणसांच्या मनात जाऊन बसतो असं ज्या कोणाला पहिल्यांदा सुचलं असेल त्याच्या कल्पनाशक्तीची स्तुती करावी तेवढी कमीच. हे सगळं पुन्हा एकदा आठवायला कारणही तसंच घडलं. ते म्हणजे पुण्यात झालेला ‘सुहास शिरवळकर 75’ हा कार्पाम. त्यावेळी एका तरुण वाचकाने विचारलं की, सुहास शिरवळकर यांची पंचाहत्तरी आहे का?
अर्थात हा वाचक सुहास शिरवळकर यांचा फॅन आहे हे उघडच होतं. मात्र सुहास शिरवळकर आता या जगात नाहीत याचा त्याला पत्ताच नव्हता. झाला प्रकार काय असावा हे सांगतो. सध्या तरुण मंडळी काय वाचतात त्याचा कानोसा घेतला तर लक्षात येतं ही मंडळी सुहास शिरवळकर यांच्या रहस्यकथांबरोबरच त्यांच्या सामाजिक कादंबऱयादेखील उत्साहाने वाचताना दिसतात. त्यांच्या कादंबऱयांवर चित्रपट आणि वेब सीरिज आल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेला उधाण आलं. त्यातदेखील विशेष सांगायचं झालं तर वेब सीरिज आणि चित्रपट यांच्यामुळे त्यांच्या कादंबऱयांना अधिक मागणी आली. साहजिकच शिरवळकर यांच्या जास्तीत जास्त कादंबऱया प्रकाशित करणारे दिलीपराज प्रकाशन यांना सातत्याने या कादंबऱया पुनर्मुद्रित करायला लागत आहेत. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकांची ऑर्डर नाही असा दिवस नाही असं प्रकाशकांनी म्हटलं आहे, त्यातच सगळं आलं.
या सगळ्याला दुःखाची एक किनार आहे ती म्हणजे हे मोठे यश पाहायला लेखक सुहास शिरवळकर या जगात नाहीत. 11 जुलै 2003 रोजी त्यांचा मृत्यू झाला. जेमतेम 55 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं (जन्म 15 नोव्हेंबर 1948). अशा वेळी शिरवळकरांच्या लेखनाची 50 वर्षे आणि वयाची 75 वर्षे ध्यानात घेऊन त्यांचा मुलगा सम्राट शिरवळकर यांनी एक विशेष कार्पाम केला. शिरवळकरांच्या आठवणींना उजाळा दिला. यानिमित्ताने सुहास शिरवळकरांचे सुरुवातीपासूनचे प्रकाशक दिलीपराज प्रकाशनने त्यांच्या ‘दिलीपराज वृत्त’ अंकाचा सुहास शिरवळकर विशेषांक प्रकाशित केला. त्यामध्ये हर्षदा खानविलकर, कांचन नायक, डॉ. नागेश कांबळे, रवींद्र भयवाल, योगेश दशरथ, सुधांशू अंबिये आणि अजिंक्य विश्वास यांचे सुहास शिरवळकर यांच्या संबंधात लेख आहेत. त्यातली सुधांशू अंबिये यांची सुहास शिरवळकरांच्या लेखनाबाबत केलेली निरीक्षणं वेधक आहेत. उदाहरणार्थ ते म्हणतात, सुशिंच्या मानसपुत्रांची ाढमवारी करायची झाल्यास फिरोज, दारा, अमर आणि मंदार अशी उतरत्या ाढमाने लागेल. तसंच शिरवळकरांचा ‘बॅरिस्टर अमर विश्वास’ हा अर्ल स्टॅनले गार्डनरच्या ‘पेरिमेसन’वरून बेतलेला असला तरी तो कसा वेगळा आहे हे ते दाखवून देतात. ते मनोरंजक ठरावं.
शिरवळकर यांच्या रहस्यकथांत लोकप्रियतेच्या बाबतीत फिरोजचं स्थान फार वरचं आहे यात शंकाच नाही. त्याबाबत सुधांशू अंबिये आपले मत नोंदवतात, साधा स्टंट असलेला फिरोज अचानक एका भयंकर प्रसंगात ओढला जातो आणि तेथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते. अनेक वेळा त्याला तरुणी दगा देतात, फायदा घेतात. तरी पुन्हा नव्या उमेदीने तो प्रत्येक तरुणीच्या प्रेमात पडतो. स्त्राr जात विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही यावर ठाम असणारा फिरोजचं असं दरवेळी नव्याने प्रेमात पडणं हा विरोधाभास सुशि परिणामकारकरीत्या दाखवून देतात.
‘अश्वत्थाम्याला कपाळावर एकच डोळा. आपल्याला नुसते डोळेच. इतर शरीर उरलंच कुठे? भळाभळा वाहा रे डोळ्यांनो! सगळं आयुष्य झिरपवून टाका तिच्यायला! आयुष्यातल्या दोन वर्षांचे अर्ध्य… राजकुमारीला एक अर्ध्य… रेहानाला एक… पांचालीला उरलेले… अॅना… वगैरे वगैरे खाली उरले, गळणारे डोळे फक्त!’ नायक फिरोज वाचकांच्या गळ्यातला ताईत झाला तो असा.
‘सुशिं’ची कादंबरी ‘अस्तित्व’ ‘लोकप्रभा’च्या अंकात 1992मध्ये प्रकाशित झाली, पण कशी काय कोण जाणे, ती पुस्तक रूपाने आलीच नाही. आता ती ‘स्टोरी टेल’तर्फे ऑडिओ बुकमध्ये येत आहे. एकूण सुहास शिरवळकर आज नाहीत, पण त्यांचं हे वेगळेपण असं अधोरेखित होत आहे.


























































