रंगभूमी – कुमार सोहोनी @ 50

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी

एखाद्या रंगकर्मीला रंगदेवता प्रसन्न झाली की, ती त्यास भरभरून देते. असा एक रंगकर्मी म्हणजे ‘कुमार सोहोनी’. नुकतेच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

पारितोषिकं, मानसन्मान हे जेव्हा एखाद्या कलाकाराला मिळतात तेव्हा तो तेजाळून उठतो. त्याला ते एक टॉनिक वाटतं. व्हिटॅमिन मिळाल्यामुळे तो अधिक जोमाने काम करू लागतो. असं करता करता किती वर्षं त्याने आपलं योगदान रंगभूमीला दिलं याची गोळाबेरीज तो करीत बसत नाही. नाटक – चित्रपट आणि मालिका करता करता तो स्वतला त्यात झोकून देतो. कळत नकळतपणे तो दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि तंत्रज्ञ घडवीत असतो याचं भान त्याला नसतं. तो आपल्या कामात इतका मग्न झालेला असतो की, आजूबाजूला काय चाललंय याची तमा न बाळगता नि:स्वार्थीपोटी त्याचं कार्य सुरू असतं. टीकाकारांनी त्याच्या कार्याची नोंद घ्यावी याकडे गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो. त्यांनी केलेल्या नाटक-चित्रपटावर जेव्हा समीक्षक समीक्षणातून टीका करतात तेव्हा तो वाद घालत कधीही बसलेला नाही. असा एक रंगकर्मी म्हणजे ‘कुमार सोहोनी’.

त्याला त्याचे मित्रवर्य ’कुसो’ या टोपणनावानं संबोधतात. त्याची नाटय़-चित्रपट कारकीर्द वाखाणण्यासारखी. त्याचा आलेख नेहमी चढताच राहिलेला आहे. त्याच्या कारकीर्दीतील प्रत्येक वर्ष हे त्याच्यासाठी शिखर गाठल्यासारखं होतं. त्याची आणि माझी पहिली भेट ही कधी झाली हे आठवताना त्याने दिग्दर्शित केलेलं ‘अथ मनुस जगन’ आणि ’मा सावरीन’ ही दोन नाटकं डोळ्यांपुढून जात नव्हती. त्या नाटकांचं सादरीकरण आणि फॉर्म आजही तरुण पिढी करू शकेल इतका बेफाट आहे. तरुण पिढीच्या दिग्दर्शकाने ती नाटकं करून बघायला हवीत. ‘कुसो’बद्दल का लिहितोय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? त्यात गैर ते काहीच नाही. 4 मे 2023 या दिवशी त्याच्या दिग्दर्शन कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली. 4 मे 1973 दिवशी त्याने ठाण्याला ‘कलासरगम’ या हौशी संस्थेची स्थापना केली. त्या संस्थेचा सुवर्ण महोत्सव ठाण्यातल्या रंगकर्मींबरोबर 4 ते 6 मे या कालावधीत दिमाखात साजरा झाला. कुमार सोहोनी यांनी 4 मे 1973 साली ‘कलासरगम’ या संस्थेचा पाया रचला. पन्नास वर्षांत त्या संस्थेचा ठाण्यात अनेक नाटकांचा, उपामांचा उत्तुंग असा टॉवर झाला. घोडबंदरला जाताना ब्रिजवरून ठाण्यातील उत्तुंग टॉवर दिसतात. त्यात कलासरगम संस्थेचा टॉवर हा काल्पनिक का होईना, प्रामुख्याने दिसतो. कारण आज व्यावसायिक नाटय़सृष्टी-चित्रपटसृष्टीतले कलाकार त्या संस्थेने घडवलेत. कलासरगम टॉवरची प्रत्येक वीट म्हणजे ते कलाकार आहेत. त्यांचा नाटय़ बिल्डर हा कुमार सोहोनी.

राज्य नाटय़ स्पर्धेच्या 80च्या दशकात कलासरगम संस्थेचा दबदबा होता. अंतिम फेरी त्यावेळी रवींद्र नाटय़ मंदिरात होत असे. त्यात त्याचं नाटक हमखास असायचं. मुंबईतील संस्थांबरोबर त्याची स्पर्धा असल्यामुळे रवींद्र ओव्हरपॅक असायचं. रवींद्र नाटय़गृहाच्या गँगवेतसुद्धा रंगकर्मी दाटीवाटीने बसत असत. तो वेगळाच माहौल असायचा. जुन्या मंडळींना त्याची याद आल्याशिवाय राहणार नाही. ‘अंधारयात्रा’ या नाटकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कुमार जेव्हा एनएसडीमध्ये नाटय़ शिक्षण घेण्यास गेला तेव्हा विजय जोशीने कलासरगमच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. त्यांनी त्या संस्थेचा झेंडा हौशी वर्तुळात फडकवला.

कुमार नाटय़ शिक्षण घेऊन आल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. प्र. ल. मयेकर या नाटककाराबरोबर त्याची नाटय़वीण रोवली गेली आणि व्यावसायिक रंगभूमीवर नवनवीन विषय त्यायोगे येऊ लागले. ‘रातराणी’ – ‘अग्निपंख’ या यशस्वी नाटकांचा उल्लेख करावाच लागेल. मयेकरांची पटकथा आणि संवाद असलेले त्याचे चित्रपटसुद्धा गाजले. कुमार नाटकं करताना नाटककार अभिराम भडकमकर याच्या बरोबरीची नाटय़युती अभेद्य राहिली. अभिरामने नाटक लिहायचं आणि कुसोने त्याचं दिग्दर्शन करायचं हे समीकरण झालं. अजूनही ते समीकरण पुसलं गेलेलं नाही. ‘देहभान’, ‘याच दिवशी याच वेळी’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’ ही नाटकं यशस्वी झाली. त्या नाटकांप्रमाणे स्वामी (रणजित देसाई), डॉ. हुद्दार (श्री. ना. पेडसे), वासूची सासू (प्रदीप दळवी), मी रेवती देशपांडे (शेखर पाटील) इत्यादी त्याच्या लोकप्रिय नाटकांचा उल्लेख हा करावाच लागेल. देशाच्या राष्ट्रपतींच्या कारकीर्दीवर आधारित ‘राष्ट्रपती भवन’ हा आजी-माजी राष्ट्रपतींच्या समोर झालेल्या हिंदी नाटकाच्या प्रयोगाची दखल ही लोकसभेच्या इतिहासात घ्यावीच लागेल.

एखाद्या रंगकर्मीला रंगदेवता प्रसन्न झाली की, ती त्यास भरभरून देते. कुमार सोहोनी त्याबाबतीत लकीच म्हणावा लागेल. कारण कधीही ‘हांजी हांजी’ न करणाऱया कुसोच्या पदरात पारितोषिकं चालत आली. अनेक पारितोषिकांचा वर्षाव त्याच्यावर झाला. 23 फेब्रुवारी 2023 या दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन त्याला गौरविण्यात आले. हा त्याच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्याचा गौरवसुद्धा केला.

असा हा आमचा कुसो. नाटकांबरोबर त्याने अनेक चित्रपट केले आहेत. त्याची गणती करायला गेलो तर एक पान पुरायचं नाही. या सर्व यशामागे त्याची पत्नी श्रद्धा सोहोनी पूर्वाश्रमीची उज्ज्वला टकले हिची मिळालेली अभेद्य साथ तो विसरणार नाही. तो गप्पांच्या ओघात त्याच्या प्रेमाच्या गमती जमती सांगतो. त्या ऐकण्यातच मजा आहे. तर आमच्या या कुसोला त्याच्या आणि कलासरगम संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षास हार्दिक शुभेच्छा! कुमार सोहोनीच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीची बुलेट ट्रेन वेगाने धावतेय. प्रत्यक्षात बुलेट ट्रेन येवो न येवो, व्यावसायिक रंगभूमीवर मात्र त्याची बुलेट ट्रेन धावतच राहावी. त्यामुळे ‘कुसो’, आता नवीन नाटक हवंच. तोही म्हणतोय, ‘ठरलं तर मग!’