परीक्षण -साध्यासोप्या सखोल कथा

103

>>श्रद्धा गुजराथी-शहा

‘माणसं मरायची रांग’ हा कथासंग्रह आताच वाचून पूर्ण केला. वाचून खूप आनंद वाटला. कारण या कथा मला एकदम आतून भिडल्या, भावल्या.  या कथासंग्रहाच्या निमित्ताने मला विविध परिस्थितीतील अनेक वृत्ती-प्रवृत्तीची माणसं वाचायला मिळाली. ज्या गोष्टी आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यात किती खोल अर्थ दडलेला असू शकतो याचा मनाला साक्षात्कार झाला.

जीवनात अनेक बारीक सारीक गोष्टी आपण आजूबाजूला पाहात असतो. किंबहुना अशा गोष्टी आपल्या जीवनात किंवा आपल्या आसपासच्या लोकांमध्येच दडलेल्या असतात. त्या गोष्टी आपण बारकाईने आतून पाहात नाहीत, अशा अनेक गोष्टी डॉ. सुधीर देवरे लिखित ‘माणसं मरायची रांग’ या कथासंग्रहात वाचायला मिळाल्या. प्रत्येक कथानक वाचताना ‘अरे हो… असं होऊ शकतं…’’ असं मनाला आत वाटून गेलं…

या कथासंग्रहाचं नाव बरंच काही सांगून जातं… ‘माणसं मरायची रांग’. खरंच आजच्या काळात माणूस फक्त मरण्यासाठीच जगत असतो. कायम आपल्या कुटुंबासाठी खस्ता खाता खाता अखेर मरतो आणि मग मागे जिवंत राहिलेले लोक म्हणतात, चांगला जगला माणूस… जगण्यासाठी इतरांचं करत- नाते सांभाळत लोक आपलं आयुष्य खर्ची घालतात… या अनुभूतीचं अगदी साध्या व सोप्या भाषेत लेखकाने कथांमधून आयुष्याचं भान आणून दिलं…

वास्तविक जीवनात लोक व्यक्तिरेखा वा पात्रे म्हणूनच वावरतात असं या कथासंग्रहातल्या एकूण सर्व कथांमध्ये लेखक दृष्टांत मार्गाने दाखवून देतात.

‘इतक्या मोठय़ा देशाचा अपमान’ या कथेत थोडय़ाशा मानवी चुकीमुळे गावातले-समाजातले लोक कसं एखाद्याला वेठीस धरतात हे दाखवलं आहे तर ‘बोंबीलचा वास’ ही कथा उच्चभ्रू लोक आणि गरीब यांचं चित्रण आहे (कथेत महिला). श्रीमंत लोक गरीबाला तोंडावर चांगलं म्हणतात, पण जिथं त्यांना आपल्या सरळसोट जीवनाशी तडजोड करावी लागते, थोडासा त्रास होऊ लागतो तेव्हा हे लोक तो सहन करू शकत नाहीत. असे लोक उघडपणे कितीही देव देव करीत असले तरी त्यांची द्वेषमूलक मूळ वृत्ती प्रसंगी आपोआप बाहेर आल्याशिवाय राहात नाही.

‘चिकटलेली पाठ’, ‘समझदारीचा फेस’, ‘अगम्य’, ‘सर्कस’ या कथांना तोड नाही. या कथांत आपल्याला व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या अनेक वल्ली भेटतात. हे हवं ते हवं, म्हणून स्वतः हव्यास करत आपणच आपलं नुकसान करून घेतो. पण एक मिळालं की पुन्हा दुसरं मिळावं, यासाठी धडपडतो. ‘अगम्य’ या कथेत ‘कृष्णाची नीती’ कशी वापरली जाते हेसुद्धा नव्यानेच समजून येतं. कारण आपण आपल्या न कळत कुठंतरी ही नीती कायम वापरत असतो. अशा नीतीचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला नितळपणे, पारदर्शकपणे जगता येत नाही.

‘साक्षी’ ही कथा मनाला भयंकर हादरा देणारी आहे. खरंच असं घडू शकतं का? असा मनाला प्रश्न पडतो. ‘वंश’ ही जरा वेगळी कथा आहे. कथेतील नायिका इतकं होऊनही बलात्कारातून आलेल्या गर्भाला ‘वंश’ का म्हणते, हा प्रश्न मनात सतावत राहतो.

‘डास मारायची बॅट आणि आबा’, ‘राजूसटल आणि संडास’, ‘पिवळी धम्मक खिचडी’, ‘भावी पती’, ‘कुबडी’ या कथा म्हणजे माणूस मनात काय काय साठवून विचार करू शकतो व त्यावर आपलं स्वतःचं मत कसं मनातच मांडत राहतो, याचं खूपच सुंदर वर्णन मुळातून वाचायला हवं.

‘जोड कावळा’ हे कथानक पारंपरिक अंधश्रद्धेमुळे नायकाच्या मनात काय घालमेल होते आणि प्रत्यक्षातही त्याला अचानक कराव्या लागणाऱया प्रवासात किती विघ्नं येतात याचं वर्णन अफलातून आलं आहे.

‘आवाज किती छान आहे’, ‘भोकांड’, ‘चार हीरोंची सुखद गोष्ट’ या कथा शोक आणि सुखद धक्के देत मनाला भुरळ पाडतात. ‘सौदा’ या कथेप्रमाणे आजच्या हुंडाबळी मुलींनी सुलोचनासारखं पेटून उठायला हवं… तरच समाजात मुलींना मानाचे स्थान मिळेल आणि वधूपिताही स्थळ शोधताना वा विवाह मंडपात अपमानित होणार नाही.

‘सर्टिफिकेट’, ‘युवक पंच्चायशी’, ‘डुकरं स्वाध्याय करतात’, ‘साप’, ‘जीवदान’ या कथा खूपच भावनिक, तात्त्विक आणि सुंदर जमून आल्यात. एकंदरीत हा कथासंग्रह वास्तव जीवनाचं ढळढळीत प्रतिबिंब म्हणावा लागेल. अंतर्मनावर ओरखडे मारत खोल परिणाम करणाऱया या कथा आहेत. सहज, सोप्या आणि कमी शब्दांत या कथांत खूप काही सांगितलं गेलं. एकदम मस्त, दिलखुलास कथा वाचल्याचा आनंद या कथांतून मिळत राहतो. या कथासंग्रहासाठी एकच शब्द सुचतो तो म्हणजे ‘अप्रतिम’…

डॉ. सुधीर देवरे सरांचे यामुळेच खूप आभार मानते. लेखकाचे पुढील लिखाण लवकर वाचायला मिळेल अशी आशा बाळगते. कथासंग्रहाला असलेले संतुक गोलेगावकर यांचं मुखपृष्ठही तितकंच अप्रतिम.

माणसं मरायची रांग

लेखक – डॉ. सुधीर रा. देवरे

प्रकाशन – विजय प्रकाशन, नागपूर

पृष्ठ – 130, मूल्य – 200 रुपये

 

 

आपली प्रतिक्रिया द्या