पुढील घटनांचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीनिवास औंधकर

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झालेले धुळीचे वादळ व सहारा वाळवंटात झालेली बर्फवृष्टी या दोन घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांनी पुढील घटनांचे संकेत दिले आहेत. जागतिक तापमानात होणारा बदल लक्षात घ्यावा लागेल. पृथ्वीवरील तापमानात होणारी घट हे यामागील एक प्रमुख कारण आहे. सूर्यावरील होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीच्या वातावरणातील तपांबरात घट दिसून येत आहे. एकूणच गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीची छोट्या हिमयुगाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही.

पाकिस्तानच्या दिशेतून येणारे धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे गेल्या आठवड्यात राज्यात पोहोचले. धुळे, नंदुरबार, पुणे, मुंबईसह उत्तर कोकणात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह धुळीच्या वादळाचे सावट गडद झाले व दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे धुळीचे वादळ पोहोचले. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. अनेक ठिकाणी दृश्यमानता एक किलोमीटरपेक्षा कमी झाल्याचे दृश्य होते. या काळात राज्यातील सर्वच शहरांवर दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान होते. धुळीच्या वादळाच्या प्रभावामुळे हवेतील धुलीकणांमध्येही वाढ झाली. त्यामुळे सूर्याकडून येणारी उष्णता कमी आल्याने कमाल व किमान या दोन्ही तापमानांत घट नोंदवली गेली. त्यातच वाऱ्यांच्या प्रवाहामुळे याचा परिणाम महाराष्ट्रात दिवसा गारठा जाणवत होता. यापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यात सन 2015 आणि 2012 मध्ये अशा प्रकारचे धुळीचे वादळ आले होते. महाराष्ट्रासाठी धुळीचे वादळ नवे नसले तरी हवामानाची ही घटना दुर्मिळ मानली जाते.

अनेक ठिकाणी धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता कमी तसेच 20 ते 25 किलोमीटर ताशी इतक्या वेगाने वारे वाहत होते. वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे होती तसेच अतिसूक्ष्म धुलीकण (पीएम 2.5) आणि सूक्ष्म धुलीकणाचे (पीएम 10) प्रमाण साधारण 100 प्रति घनमीटर इतके असे निर्माण झली होती. पाकिस्तान किंवा हिंदुस्थानातील राजस्थान येथील वाळवंटी परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास या ठिकाणची धूळ उंचावर उडते आणि ही धूळ पश्चिमेकडून वाहणाऱ्या अति थंड वाऱ्यांमध्ये मिसळते. त्यामुळे वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर धूळ कित्येक किलोमीटरचा प्रवास करते आणि धुळीचे वादळ निर्माण होते. साधारणपणे अशी वादळे हिंदुस्थानातील उत्तरेकडील काही राज्यांपर्यंतचा प्रवास करतात, मात्र महाराष्ट्रात धुळीच्या वादळांचे प्रमाण कमी असते. आता या वादळानंतर लगेचच पुढील पाच-सहा दिवसांत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कडाक्याची थंडी पडली. मुंबईकरांना या वर्षी तर स्वेटर घालावे लागले.

वाळवंटातही बर्फवृष्टी

याचदरम्यान जगातील सर्वात मोठे वाळवंट असलेल्या उत्तर आफ्रिकेतील ‘सहारा’ वाळवंटात बर्फवृष्टी झाली. या दुर्मिळ घटनेची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली आहेत. सहारा वाळवंटात तापमान गोठवण्यापेक्षा खाली गेले, ज्यामुळे वाळूवर बर्फ स्थिर झाला आणि बर्फाने वाळूचे ढिगारे झाकले गेले .जगातील सर्वात मोठ्या असलेल्या या सहारा वाळवंटात 136.4 अंश फॅरेनहाइट किंवा 58 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झालेली आहे. तरीही या ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. उत्तर आफ्रिकेच्या वायव्य अल्जेरियातील नामा प्रांतात वसलेले ऐन-सेफ्रा हे शहर ‘सहाराचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 3,000 फूट आहे आणि ऍटलस पर्वतांनी वेढलेले आहे. याच ऐन-सेफ्रामध्ये रात्रभरात तापमान -2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आणि परिणामी बर्फवृष्टी झाली. तथापि, जगातील सर्वात मोठ्या वाळवंटात बर्फ पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. सहारा वाळवंटात 42 वर्षांत पाचव्यांदा बर्फवृष्टी झाली आहे. यापूर्वी 1979, 2016, 2018 आणि 2021 मध्येही या वाळवंटात बर्फवृष्टी झाली होती.

काय बोध घ्यावा? 

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल झालेले धुळीचे वादळ व सहारा वाळवंटात झालेली बर्फवृष्टी या दोन घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी जागतिक तापमानात होणारा बदल लक्षात घ्यावा लागेल. पृथ्वीवरील तापमानात होणारी घट हे यामागील एक प्रमुख कारण आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील गेल्या काही महिन्यांचे तापमान हे सरासरी तापमानापेक्षा कमी नोंदवले जात आहे. अर्थात याला ‘ला नीना’ असे म्हटले जाते. यामुळे उत्तर गोलार्धात या वर्षी मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी व बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अतिशय थंड असलेले उत्तर ध्रुवीय वारे अनेक ठिकाणी दक्षिण दिशेला सरकत विषुववृत्ताकडील प्रदेशावरून वाहत होते असे दिसून आले. याचा परिणाम वरील दोन्ही घटनांवर दिसून आलेला आहे.

या वर्षी उन्हाळा नाही

जुलै 2019 पासून प्रशांत महासागराच्या विषुववृत्तावरील तापमान न्युट्रल – ला नीना – न्युट्रल व सध्या ला नीना या परिस्थितीत असल्याने जागतिक तापमानात मोठ्या प्रमाणात उलथापालथ दिसून येत आहे. जानेवारी 2022 या महिन्यातली नीना परिस्थिती जवळपास 100 टक्क्यांवर होती तर फेब्रुवारी 95 तर मार्चमध्ये 82 टक्के अशी असणार आहे. ती एप्रिल 2022 पर्यंत कमी होत जाऊन 68 टक्क्यावर जाईल असा अंदाज आहे. एकूणच काय, तर या वर्षी आपल्याकडील तापमानात मोठी वाढ अपेक्षित नाही. म्हणजे, या वर्षी हिवाळा मार्चपर्यत म्हणजे जास्त काळ असण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये 68 टक्क्यांवरील ‘ला नीना’ कमी होऊन परत न्यूट्रल परिस्थिती निर्माण होणार असल्याने या वर्षी उन्हाळ्याचे दिवस कमी तसेच उन्हाळादेखील कमी तीव्रतेचा असणार आहे. व पावसाळाही लवकरच सुरू होणार आहे. कदाचित एप्रिल, मे महिन्यात गारपीट व पाऊसही अपेक्षित आहे. सूर्यावरील होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीच्या वातावरणातील तपांबरात (थर्मोस्पीअर) घट दिसून येत आहे. एकूणच गेल्या काही वर्षांपासून पृथ्वीची छोट्या हिमयुगाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. माझे गेल्या चौदा वर्षांपासूनचे भाकीत खरे ठरत आहे.

(लेखक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, संभाजीनगरचे संचालक आहेत.)