छोटीशी गोष्ट – सूर्याचा दिवस

>> स्नेहल महाबळ

आज मी संध्याकाळपासूनच खूप आनंदात आहे. आज मी माझ्या मित्राशी बोलणार आहे ना, म्हणून! हा माझ्या शाळेत, वर्गात आणि रिक्षातही होता. त्यानंतर तो त्याच्या आईबाबांबरोबर बंगलोरला गेला. तो जाण्याआधी दोघांनी बंगलोर नकाशात शोधलंही होतं. माझ्याकडे आहे ना पृथ्वीचा गोल, पण यात आम्हाला एक मस्त गोष्ट समजलीये, व्हिडीओ कॉलची. त्याच्याकडे पण आता माझ्यासारखा पृथ्वीचा गोल आहे. वेगवेगळी ठिकाणं शोधतो आम्ही दोघे आता एकत्र. त्यावरच तर काही महिन्यांपूर्वी लंडन शोधलं. काका-काकू आणि तो आता बंगलोरवरून तिकडे गेले ना, म्हणून शोधून ठेवलं. परवा गंमतच झाली. रात्री झोपायच्या आधी कॉल केला होता काकूला, तेव्हा आई good evening म्हणाली. चुकलंच आईचं. तिला सांगितलं मी तसं, तर म्हणाली ‘‘नाही, आपली रात्र असते ना, तेव्हा तिकडे संध्याकाळ असते.’’ मी पुढे काही विचारणार होतो, पण पह्न मला मिळालाच नाही या दोघींच्या गप्पांत. मीही झोपलो मग पंटाळून. म्हणून आज ठरवून दोघंच बोलणार आहोत. झालीच वेळ. करतोच कॉल.

तोः हॅलो हॅलो… ऐकू येत नाहीये नीट.
मीः येतंय आता ऐकू?
तोः हो, तूही नीट दिसतोयस आता.
मीः छान, काय करतोयस?
तोः आत्ताच आलो शाळेतून.
मीः ए, असं कसं? इतक्या उशिरा कसा काय आलास शाळेतून? मी तर कधीच आलो. खेळून झाल आणि जेवणहीं.
तोः अरे हो, गमतीशीरच आहे हे लंडन. पुण्याच्या पश्चिमेला आहे ना, म्हणून पृथ्वी फिरताना तू आधी सूर्यासमोर जातोस आणि मी नंतर…म्हणून
मीः अच्छा…म्हणजे इथे रात्र तेव्हा तिथे संध्याकाळ. मग इथे सकाळ तेव्हा….
तोः इथे रात्र…असंच… तू उद्या उठशील तेव्हा मी गाढ झोपेत असेन मध्यरात्री.
मीः अरे…असं कसं! वेगळंच वाटतंय. एकीकडे दुपार, एकीकडे रात्र… मग काय, कुठेतरी सकाळही असेल का?
तोः हो, अरे असते. बाबा जर ऑफिसच्या कॉलमध्ये अमेरिकेतल्या लोकांशी बोलत असेल तर आताही good morning म्हणतो.
मीः हो…आठवलं. अमेरिका म्हणजे आपल्या पृथ्वीच्या गोलावर आशिया खंडाच्या मागचा खंड…अजून पश्चिमेला.
तोः हो…बरोबर…तोच. तिथली अजून उशिरा पोहोचतात सूर्यासमोर. म्हणून तिथे आत्ता सकाळ असं होतं अरे…
मीः व्वा… मजेशीर आहे हे. खरंच वाटत नाही पटकन. दाखव बरं खिडकी उघडून संध्याकाळ आहे ते.
त्याने खिडकी उघडली आणि मी बघतच राहिला. किती सुंदर रंग होते आकाशात. केशरी, निळा, करडा…आणि मध्ये सूर्य. पुस्तकातल्या कवितेतला खरोखरचा सोन्याचा गोळा.
मीः किती सुंदर दिसतोय ना सूर्य…!
तोः हो ना. मी रोज त्याला इथे बसून टाटा करतो.
लगेच अंधार पडलेला जाणवला मलाही.
मीः आता तिथून निघून उद्या माझ्याकडे येईल ना.
तोः खरं तर तू त्याच्या पुढे जाशील…सकाळी.
मीः हो की… तसं तर तसं. तू त्याला मोठ्ठा टाटा कर आणि मी मोठ्ठं वेलकम करेन.
तोः तसं तर पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्याला अशी वेगवेगळ्या वेळी टाटा आणि वेलकम करत राहतील.
मीः हो रे… या सूर्याचा दिवस कसला मजेशीर असेल ना?
तोः सूर्याचा दिवस! सूर्यामुळेच तर दिवस असतो ना…!
आई आलीच तेवढय़ात बोलवायला. मग पह्न ठेवला. आता झोपतो. उद्या उठायचंय ना…सूर्याला वेलकम करायला!

[email protected]