
>> डॉ. विजय ढवळे, ओटावा-कॅनडा
“”जब देश में थी दिवाली, वहाँ खेल रहे थे होली – जब हम बैठे थे घरोंमे, वो झेल रहे थे गोली’’ कवी प्रदीप यांचे प्रभावी शब्द, सी. रामचंद्रची अप्रतिम संगीतरचना आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा काळीज विदीर्ण करून जाणारा आवाज. हे सर्व १९६२ मध्ये पंतप्रधान नेहरूंच्या समोर “ऐ मेरे वतन के लोगो’’ हे अमर गाणे सादर केले गेले तेव्हा हिंदुस्थानींच्या प्रत्ययाला आले होते. सैनिक सीमेवर लढतात आणि देश सुरक्षित राहतो! ते आपल्या प्राणांची कुर्बानी करतात कारण देशाच्या पुढच्या पिढीचे भवितव्य उज्ज्वल राहावे म्हणून. जे जीव गमावतात त्यांचे आयुष्य सार्थकी लागते, परंतु जे जखमी होऊन मायदेशी परततात त्यांचे भवितव्य काय असते? सरकारतर्फे तर तहहयात पेन्शन, इतरही काही सुविधा दिल्या जातात, परंतु त्यांच्यात जे क्रीडांगण कौशल्य असते, त्याचे काय? त्यांच्याकरिता खास ऑलिम्पिक धर्तीचे सामने भरवण्याची प्रथा अमेरिकेने सुरू केली. २०१३ मध्ये त्यावेळी इंग्लंडचा राजपुत्र हॅरी उपस्थित होता. त्याला स्फूर्ती मिळाली. त्याने मोठय़ा प्रमाणावर लंडनमध्ये २०१४ साली जखमी सैनिकांचे क्रीडाकौशल्य जगाच्या समोर यावे म्हणून स्पर्धा आयोजित केली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. अशाच प्रकारचा सोहळा गेल्या वर्षी फ्लॉरिडा राज्यातल्या ओरलँडो शहरात संपन्न झाला.
यावेळेस १७ देशांनी भाग घेण्यासाठी आपापले सैनिक क्रीडापटू पाठवले आहेत. फ्रान्सपासून न्यूझीलंडपर्यंतची राष्ट्रे यात सामील आहेत. अफगाणिस्तानही आपली टीम पाठवणार आहे. वेगवेगळय़ा १२ खेळांच्या स्पर्धा होतील. त्यात सीटिंग व्हॉलीबॉल, व्हीलचेअर बास्केटबॅल, व्हीलचेअर रग्बी, गोल्फ, स्विमिंग, आर्चरी असे खेळ समाविष्ट आहेत. एकूण साडेपाचशे स्पर्धक भाग घेतील. यजमान राष्ट्र कॅनडाची टीम ही ९० जणांची असेल. विलियम वर्थ या जखमी सैनिकाची कहाणी ही निश्चितच प्रेरणादायक आहे. हा निष्णात गोल्फपटू होता. त्याला अफगाणिस्तानमध्ये शांतता सैनिक म्हणून पाठवले गेले. तेथील तालिबानी आतंकवादी खून-मारामाऱया, क्रूरता, ज्वालाग्राही इस्लामनीती यांचा उघडउघड पाठपुरावा करणारे. त्यांना शांतता हा शब्दच जहरी गोळीइतका त्याज्य वाटतो. त्यांनी देशात शांतता नांदावी म्हणून प्रयत्नशील असलेल्या परदेशी सैनिकांवर छुपे हल्ले चढवण्याचे सत्र चालूच ठेवले. सुरुंग (landmines) पेरून ठेवले. त्यामुळे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी वर्थ हा एक होता. त्याचा एक डोळा पार निकामी झाला. तसेच त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली म्हणून त्याला रणभूमीवरून मायदेशी कॅनडात परतावे लागले. तो या ऑलिम्पिक्समध्ये उत्साहाने सामील होता.
वर्थला गोल्फचे वेड हे लहानपणापासून होते. जॅक निकोलस अर्नाल्ड पामर यांच्यासारख्या अव्वल गोल्फपटूंच्या स्पर्धा तो मन लावून वयाच्या नवव्या वर्षापासून पाहत असे! हिंदुस्थानमध्ये सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर हे जसे देवत्वाच्या पातळीवर पोहोचले आहेत तसे गोल्फवेडय़ांच्या करता निकोलस आणि पामर. ते स्पर्धेत भाग घेत असले की वर्थ तासन् तास टीव्हीसमोर डोळय़ांची पापणी न हलवता आपल्या आदर्शाचा खेळ मन लावून पाहत असे! गोल्फमध्ये करीअर करायची हे त्याने ठामपणे ठरवले होते. त्याकरिता पहिल्यांदा खरेदी केली ती पाच डॉलर्स किमतीच्या स्टिकची. तो राहायचा आँटेरिओ राज्यातल्या वॉटर्लू या लहानशा गावात. आई घरीच लहान मुलांची देखभाल करणारी डे केअर सेंटर चालवत असे. वर्थला गोल्फइतकाच आईसहॉकी खेळही आवडायचा. त्याचे स्वप्न होते मिलिटरीमध्ये जायचे. १६व्या वर्षी राखीव सैनिकी दलात त्याला प्रवेश मिळाला. दोन वर्षांनी तो संपूर्ण सैनिकी हुद्दा मिळवता झाला. गोल्फ काय, मिलिटरी काय – तिथे यशस्वी होण्याकरता भरपूर मनोबल लागते. ते येरा गबाळय़ाचे काम नोहे!
वर्थला २००६ मध्ये अफगाणिस्तानला पाठवण्याचा बॉसने निर्णय घेतला. तोपावेतो त्याचे इंजिनीयरिंगचे शिक्षणही पूर्ण झाले होते. मे २०१० मध्ये वर्थ अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करता झाला. आपल्या कामात जबरदस्त धोका आहे. प्रसंगी प्राणही गमवावे लागतील हे त्याला पूर्णपणे ठाऊक होते. कंदाहरमध्ये पंजवायी परगाणा आहे. तिकडे त्याला डय़ुटी करायची होती. काही दिवसांतच तो अशा एका जागी पोहोचला की जिथे दोन ‘आयईडीज’ होत्या. अशावेळी सैनिक जागा शोधून काढतात. मग त्यांच्या पोटांवर ओणवे होऊन सरपटत जाऊन हातातल्या लोखंडी पट्टीने या अस्तावरची धूळ बाजूला सारतात. त्यानंतर जवळ असलेले ‘C४’ प्लास्टिक दारूगोळा ते आयईडीच्या जवळ ठेवतात आणि सुरक्षित अंतरावर जाऊन प्लास्टिक रिमोटच्या सहाय्याने उडवून देतात. आयईडी निकामी होते.
नेमकी त्याचवेळी तालिबान्यांची टोळी तेथे टपकली. त्यांच्यावर आकाशातून घोंघावत असलेल्या अमेरिकन हेलिकॉप्टर्सनी मारा केला. त्यामुळे वर्थ बचावला. पण आपले काम किती धोकादायक आहे याची चुणूक दिसली होती! हाच प्रकार त्यानंतर प्रत्येक दिवसाआड घडत राहिला. या प्रयत्नात रोज काही सैनिक गतप्राणही व्हायचे. त्यात कॅनेडियन्सची संख्या लक्षणीय होती. वर्थला आपला मित्र, सहकारी मरण पावल्याचे दुःख जरूर व्हायचे, पण शोक करण्यास वेळ नव्हता. कारण शत्रू खतरनाक होता. अज्ञातस्थळी लपला होता. मुख्य म्हणजे या भागाचा संपूर्ण माहीतगार होता. मानवी जीवन कस्पटासमान मानणारा होता. सार्जंट जेम्स मॅकनिलच्या हाताखाली वर्थचे शिक्षण झाले होते. एके दिवशी जेम्सच्या मरणाची वार्ता आली व त्या दिवशी वर्थच्या डोळय़ांतून अव्याहत अश्रूधारा वहात होत्या.
दुसऱयाच दिवशी वर्थची पाळी आली. आईडीशी मुकाबला करताना स्फोट झाला व वर्थ त्या जागेपासून चार फूट उंच उडाला. डोळय़ांपुढे अंधकार पसरला. असंख्य सुया शरीरात भोसकल्या जात आहेत असे वाटत होते. तेव्हा त्याने आकाशात हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला. त्याला दिलासा मिळाला व त्याची शुद्ध हरपली. शुद्धीवर आला तेव्हा तो जर्मनीतल्या एका हॉस्पिटलमध्ये बँडेजेस्नी वेढून टाकलेल्या अवस्थेत होता. त्याची स्मरणशक्ती क्षीण झाली. पाठदुखी कायमची सोबतीला आली. तरी गर्लफ्रेण्ड एकनिष्ठ होती. वर्षभरात त्यांनी विवाह केला. आता त्यांना दोन मुले आहेत. वर्थ सध्या २७ वर्षांचा आहे. त्याचा उत्साह पूर्ववत होण्याकरिता त्याच्या क्रीडाप्रेमाची अनन्यसाधारण मदत झाली.
मायकेल क्लार्क हा ग्लोब अॅण्ड मेल या प्रतिष्ठत वृत्तपत्राचा वार्ताहर आहे. शिवाय युद्धात जखमी झालेला सैनिक असल्याने स्वतः खेळाडू म्हणूनही ऑलिम्पिक स्पर्धक असणार आहे. २०० आणि १५०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत तो सामील होणार आहे. १९८९ पासून तो व्हीलचेअर रेसिंगमध्ये भाग घेतो आहे. त्याची जिगर पहा. आजपर्यंत ५० मॅरेथॉन्स (त्यात ६ बॉस्टन मॅरेथॉनचा समावेश होतो)मध्ये त्याने भाग घेतला आहे! त्याला आतापर्यंत १४ बक्षिसेही मिळाली आहेत. कॅनडातर्फे मी खेळणार आहे या विचारानेच मला प्रचंड ऊर्जा मिळते असे तो सांगतो. हॅण्ड सायकलिंगमध्ये त्याने स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. याची रोज तो अडीच तास प्रॅक्टिस करतो आणि ३५ कि.मीटर्स ताशी वेगाने तो हॅण्ड सायकल दामटवू शकतो. त्याला पदक मिळो वा न मिळो; परंतु मायकेल किंवा वर्थ यांनी समाजासमोर अनमोल आदर्श ठेवला आहे. दुःखांनी खचून जाऊ नका. वेदनांनी हतबल होऊ नका. जीवन हा महासंग्राम आहे. त्याकरता लढाऊवृत्तीच अंगी बाणवायला हवी!
(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत)


























































