‘स्थान’ माहात्म्य – मढी-मायंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

गर्भगिरीतील डोंगरमाथ्यावर वसलेले ‘मायंबा’ हे मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान आहे. मच्छिंद्रनाथांनी अकराव्या शतकाच्या अखेरीस समाधी घेतल्याचे सांगण्यात येते. मच्छिंद्रनाथांनी मायंबा येथे नैमित्तिक कारणाने वापरलेला ‘देव’तलाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गर्भगिरीचा परिसर हा खऱया अर्थाने नाथसंप्रदायाचे शक्ती-स्फूर्ती केंद्र आहे.

नाथसंप्रदायाचा उगम आणि विस्तार मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ या गुरुशिष्य द्वयीपासून सुरू होतो. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिह्यामध्ये गर्भगिरीच्या डोंगररांगांत आपल्याला मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्यासह ‘गहिनीनाथ’ या आणखी एक महत्त्वाच्या नाथपंथीय सिद्धपुरुषाचा प्रभाव दिसून येतो. गर्भगिरी येथे मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांचे आगमन गहिनीनाथांच्या कार्यारंभाचे सूतोवाच करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला बळकटी आणण्यासाठी झाले. महाराष्ट्रामध्ये नाथसंप्रदायाचे विस्तारीकरण निवृत्ती-ज्ञानदेवांच्या हातून व्हावे याकरिता गहिनीनाथांची योजना करण्यात आली होती. याचा उल्लेख नवनाथ भक्तिसाराच्या दहाव्या आणि तेविसाव्या अध्यायात आलेला आहे.

गोरक्षनाथांचा अनुग्रह लाभलेल्या गहिनीनाथांनी ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत यांना अनुग्रह दिला व पुढे काही काळानंतर गोविंदपंतांचे नातू आणि विठ्ठलपंतांचे चिरंजीव निवृत्ती यांनादेखील अनुग्रह दिला. पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला, त्यायोगे गहिनीनाथांकडे सोपवलेले कार्य पूर्णत्वास आले. महाराष्ट्र भूमीत ज्ञानेश्वरमाऊलींचा जन्म, वास्तव्य आणि कार्य घडण्याकरता ज्या गहिनीनाथांची योजना करण्यात आली त्यांच्याविषयीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

मच्छिंद्रनाथ यांनी गोरक्षनाथांना अनुग्रह आणि मंत्रदीक्षा देतेवेळी संजीवनी मंत्रदेखील दिला. गोरक्षनाथ मंत्रपठण करीत बसल्याचे पाहून मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गावात निघाले. त्याच वेळी इथे गावातील काही मुले खेळ खेळत गोरक्षनाथांपाशी आली. चिखल-मातीपासून त्यांना बैलगाडी आणि गाडीवान तयार करायचे होते. मात्र, काही केल्या मनासारखा गाडीवान त्यांना त्या मातीच्या गोळ्य़ातून तयार करता येईना. बराच प्रयत्न केला तरीही केवळ श्रम वाया जात असल्याचे पाहून मुलांनी तिथे जवळच बसलेल्या गोरक्षनाथांकडे मातीपासून गाडीवानाचा पुतळा बनवून देण्याची विनंती केली. गोरक्षनाथांनी होकार दिला आणि मातीच्या गोळ्य़ातून गाडीवानाचा सुबक पुतळा तयार केला. मात्र, पुतळा करतेवेळी मुखाने अविरत संजीवन मंत्राचा जप चालू राहिल्याने त्या मातीच्या गोळ्य़ात प्राणसंचार झाला आणि त्याच वेळी ‘करभंजन नारायण’ त्या पुतळ्य़ामध्ये चैतन्यरूपाने प्रवेश करते झाले. मृत्तिकारूपी भूमितत्त्व आणि जलतत्त्व यांच्या एकत्रित येण्याला गोरक्षनाथांच्या चैतन्यतत्त्वाची साथ मिळाली आणि जे बालक जन्म घेते झाले तेच पुढे ‘गहिनीनाथ’ म्हणून प्रसिद्धीस आले.

‘फिरस्तेपण’ हे नाथसांप्रदायिकांचे वैशिष्टय़ असल्याकारणाने मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथास संचार करतेवेळी आपल्या सोबत नेले. मात्र लहानग्या गहिनीनाथांना गावातील एका ब्राह्मण कुटुंबाकडे ठेवले. ब्राह्मण कुटुंबासह चौदा वर्षे वास्तव्य केलेल्या गहिनीनाथांना गोरक्षनाथांनी वृद्धेश्वर येथे अनुग्रह दिला आणि गोरक्षगडावर विद्याभ्यास शिकविला. त्यामुळे वृद्धेश्वर हेदेखील गहिनीनाथांच्या अस्तित्व खुणा दाखविणारे क्षेत्र आहे. इतकेच नव्हे, तर ‘मायंबा-माणिकदौडी’ मार्गावरील ‘घुमटवाडी’ हे गाव गहिनीनाथांचे तपश्चर्या स्थान, साधनास्थळी म्हणून सर्वत्र परिचित आहे. वृद्धेश्वर आणि त्या परिसरातील प्राचीन गुंफा ही गहिनीनाथांच्या साधनेची स्थाने असल्याचेही सांगण्यात येते.

गर्भगिरीतील डोंगरमाथ्यावर वसलेले ‘मायंबा’ हे मच्छिंद्रनाथांचे समाधीस्थान आहे. मच्छिंद्रनाथांनी अकराव्या शतकाच्या अखेरीस समाधी घेतल्याचे सांगण्यात येते. मच्छिंद्रनाथांनी मायंबा येथे नैमित्तिक कारणाने वापरलेला ‘देव’तलाव आहे. या तलावाच्या काठी असलेला कदंबवृक्षही पूजनीय असल्याचे सांगितले जाते. मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिरासमोर असलेली धोंडाई आणि सटवाईची मंदिरे गोरक्षनाथांनी ‘संरक्षक देवता’ म्हणून स्थापन केली. मच्छिंद्रनाथांनी स्थापन केलेला शनिदेव, औदुंबर तसेच सावजीबाबा या सत्पुरुषाची समाधी, धुनी, दत्तमंदिर आदी स्थाने आवर्जून पाहण्याजोगी आहेत. मायंबा डोंगरावर उभे राहिल्यास समोर कानिफनाथांची मढी दिसते.

मढी येथे गडावर कानिफनाथांची समाधी आहे. येथेच तळघरातील भुयारात कानिफनाथांचे साधनास्थळ आहे त्याला ध्यानमंदिर असे म्हटले जाते. कानिफनाथ किंवा कान्होबा या नावाने परिचित असलेला हा नाथसंप्रदायी सिद्धपुरुष विशेषतः भटक्या आणि विमुक्त जाती-जमातींचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘मढी’ या क्षेत्राला ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. कैकाडी, गोसावी, वैदू, गोपाळ, वडार, कोल्हाटी या व अशा अठरापगड जातीतील सर्वच मंडळींचे ‘कानिफनाथ’ हे ‘आराध्य दैवत’ आहे.

फाल्गुन वद्य पंचमी अर्थात रंगपंचमीचा दिवस येथील ग्रामस्थांकडून साजरा करण्यात येतो. हा कानिफनाथांच्या समाधीचा दिवस असल्याने या निमित्ताने यात्रेचे आयोजन करण्यात येते. गाढवांचा बाजार हे मढीच्या यात्रेचे पूर्वापार वैशिष्टय़ आहे. कानिफनाथांची यात्रा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा अशी पाच दिवसांची असते. या दिवशी कैकाडी जातीच्या मानकऱयांकडून मंदिराच्या कळसाला काठी लावण्याचा सोहळा साजरा केला जातो. होळीच्या दिवशी गोपाळ समाजाला होळी पेटविण्याचा मान दिला जातो. त्या आधी पंधरा दिवस सर्व गावांची मिळून एक होळी पेटविण्यात येते.

कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ यांची समाधी मढीपासून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या येवलेवाडी येथे आहे. त्यांच्या नजीकच गहिनीनाथांची समाधी आहे. मढीपासून 50 कि.मी. अंतरावर गोरक्षगड येथे गोरक्षनाथांचे वास्तव्य होते.

अशारीतीने, अहमदनगर जिह्यातील गर्भगिरीचा परिसर हा खऱया अर्थाने नाथसंप्रदायाचे शक्ती-स्फूर्ती केंद्र आहे. येथे वर्षभर यात्रा-उत्सव-सणांच्या निमित्ताने भाविकांचा वाढता ओघ असतो. महाराष्ट्रातील सर्व जिह्यांपासून हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे ‘अहमदनगर’ कायम कुठल्या ना कुठल्या यात्रा-उत्सवाच्या निमित्ताने भक्तांच्या मांदियाळीने गजबजलेले असते.
z [email protected]