निसर्गजागर – शिकाऱयांची शिकार करणे गरजेचे…!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> यादव तरटे पाटील

वन्य प्राण्यांच्या तस्करीमध्ये सर्वात वरचा क्रमांक खवले मांजर या प्राण्याचा आहे. तद्नंतर दुसऱया क्रमांकावर असलेला प्राणी म्हणजे कासव होय. सॉफ्ट शिल्ड आणि फ्लॅप शिल्ड या गावठी कासवांपासून ते स्टार कासव आणि सागरी कासवे अर्थात ऑलिव्ह रिडले यांचाही समावेश आहे. गुप्तधनासाठी मांडूळ सापाची तस्करी, नागमणीच्या नावाखाली नागाची हत्या, लक्ष्मीचे वाहन म्हणून शृंगी घुबडांचे विक्री, पेंटिंगच्या ब्रशसाठी मुंगसाची हत्या हे सगळे जीव तस्करांच्या तावडीत सापडले आहेत. पेंच, ताडोबा व मेळघाटातील वाघांच्या शिकार प्रकरणामध्ये नेपाळ व नवी दिल्ली येथील शिकारी टोळ्याही गुंतलेल्या आहेत, हे सिद्ध झालेच आहे. वाघांच्या शिकारप्रकरणी वनाधिकाऱयांच्या संयुक्त पथकाने दिल्ली येथून 2016 मध्ये सरजू हा आंतरराष्ट्रीय शिकारी व त्याच्या दोन सहकाऱयांना अटक केली होती. या तिघांकडून वाघाचे कातडे, 36 वाघनखे, 20 किलो वाघाची हाडे आणि 52 लाख 75 हजार रुपये रोख रक्कम जप्त केली. वन्य प्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीविरोधात महाराष्ट्रातील वनाधिकाऱयांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई होती. त्याचप्रमाणे दोन चितळ प्राण्यांची कातडी जवळ बाळगल्याप्रकरणी मोमिता घोष या मॉडेलला अटक केली होती. मध्य प्रदेशातील कटनी व छतीसगडमधील गंडईसारख्या भागात जाऊन वन विभागाच्या चमूसोबत मीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला आहे. हे चित्र जवळून अनुभवताना अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. वाघ व इतर वन्य प्राणी यांच्याभोवती असलेलं अर्थकारण व राजकारण पाहून आपण थक्क झाल्याशिवाय राहत नाही.

माणसाप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. वन्य जिवांचे संरक्षण व संवर्धनासाठी मदत करण्यामध्ये या वन्य जीव प्रेमींचा महत्त्वाचा सहभाग ठरतो. केवळ हौस व आपली ऐट दाखवण्यासाठी शिकारींची संख्या कमी झाली असली तरी अंधश्रध्दा आणि गैरसमजुतीमुळे जैवविविधतेला नष्ट करण्याकडे सक्रिय असलेल्यांची मोठी टोळी आजही कार्यरत आहे.

वन्य प्राण्यांची शिकार व अवैध व्यापार हा आंतराष्ट्रीय प्रश्न आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, सुरक्षा यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यांच्या प्रयत्नांनंतरही त्यावर अद्याप नियंत्रण मिळविता आले नाही. वन्य प्राणी शिकार व अवैध व्यापार आणि त्याभोवती फिरणारे अर्थकारण हे खूप मोठे आहे. खाण्यासाठी, करमणूक, काळी जादू, औषधी आणि सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मिती आदी कारणांसाठी जगात दुसऱया क्रमांकाची सर्वाधिक तस्करी ही वन्य जिवांची होते. हिंदुस्थानात संस्थानिक ते इंग्रज राजवट व तद्नंतरही वाटेल त्याने वाटेल त्यावेळी राजरोसपणे शिकारी केल्यात. वन्य प्राण्यांच्या शोभिवंत वस्तू करून आपले दिवाणखाने व हवेल्या सजवल्यात. गेम रिझर्व्ह संकल्पनेतून सामूहिक शिकारीच्या माध्यमातून जिवाच्या आकांताने पळणाऱया वन्य प्राण्याचा जगण्यासाठीचा संघर्षही तेव्हा चवीने चघळला गेला. या शिकार सत्रांनी तर काही वन्य प्राण्यांची अख्खी पिढीच संपवून टाकली. चित्ता हे यातील उत्तम उदाहरण म्हणता येईल. सन 1948 मध्ये हिंदुस्थानातून चित्ता प्राणी नामशेष झाला.

भारतीय वन्य जीव संवर्धन अधिनियम, 1972 अन्वये हिंदुस्थानात वन्य प्राण्यांच्या शिकारीस बंदी आहे. मात्र सन 1972 पूर्वी वन्य प्राणी शिकारीला खुली परवानगी होती. वन्य प्राणी शिकार व अवैध व्यापार केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली. माणसाप्रमाणेच वन्य प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. सबब, कालांतराने या प्राण्यांच्या पाठीशी उभी राहणारी वन्य प्रेमींची चळवळ उभी राहिली. कार्यकर्ते निरनिराळे असतील, संस्थाही वेगवेगळ्या असतील. मात्र त्यांचा ध्यास एकच आहे. वन्य जिवांचे संरक्षण व संवर्धनासाठी मदत करण्यामध्ये या वन्य जीव प्रेमींचा महत्त्वाचा सहभाग ठरतो. केवळ हौस व आपली ऐट दाखवण्यासाठी शिकारींची संख्या कमी झाली असली तरी अंधश्रध्दा आणि गैरसमजुतीमुळे जैवविविधतेला नष्ट करण्याकडे सक्रिय असलेल्यांची मोठी टोळी आजही कार्यरत आहे. वन्य जीव तस्करांची ही टोळी कोणत्याही कायद्याची आणि यंत्रणेची दखलही न घेता थेट तस्करी करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करते. वन्य प्राण्यांच्या मांसाची चटक लागलेल्यांकडून तर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या समाजाकडून वन्य प्राण्यांना मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हा आवाका खूप मोठा आहे.

वन्य जीव म्हणजे काय तसेच वन्य जिवांचा व्यापार व अवैध धंदे का व कसे चालतात यापासून अजूनही बहुसंख्य जनता अनभिज्ञ आहे हे एक दुर्दैव आपल्याला नाकारून चालणार नाही. भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या कलम 2 (37) नुसार कोणताही प्राणी, पक्षी, पाण्यातील अथवा जमिनीवरील वनस्पती हे वन्य जीव आहेत. या व्याख्येत निसर्गात आढळणारा कोणताही प्राणी व वनस्पती-मग तो समुद्री जीव असो की गोडय़ा पाण्यातील जीव असो-या सर्वांच्याच शिकारीस अथवा शिकार करण्याच्या कोणत्याही प्रयत्नास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या देवाणघेवाणीस आणि सर्व प्रकारच्या व्यापारासही बंदी आहे. सबब प्राण्यांपासून बनवलेल्या वस्तू, हाडे, दात, कातडी, पाठ, शोभेसाठी वापरल्या जाणाऱया वनस्पती, औषधे, सुगंधी द्रव्ये, लाकूड, वनस्पती, कस्तुरीमृग यांच्याही व्यापारास बंदी आहे. भारतीय वन्य जीव अधिनियम 1972 अंतर्गत प्रकरण 5 व 5 (अ) मध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे. यातील तरतुदींचा भंग केल्यास तीन ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 25 हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही प्रकारची एकत्रित शिक्षा होऊ शकते. या क्षेत्रात काम करणाऱया ट्रफिक संस्थेच्या अंदाजाप्रमाणे 2001 ते 2007 या कालावधीमध्ये सुमारे 30 ते 35 लाख सरडय़ांची कातडी, 30 लाख मगरींची कातडी, 30 ते 35 लाख सापांची कातडी ही युरोपियन बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती, तर 1995 ते 1999 या कालावधीत सुमारे 15 लाख जिवंत पक्षी, 6 ते 7 लाख सरपटणारे प्राणी, 3 लाख मगरींची कातडी, 10 ते 11 लाख सापांची कातडी, 10 लाखांहून अधिक प्रवाळ व अंदाजे 21 हजार मारलेल्या प्राण्यांच्या ट्रॉफीज या अवैध मार्गाने विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या.

हिंदुस्थानमध्ये वाघ व बिबटय़ांची कातडी, दात, हाडे, गेंडय़ाची शिंगे, हस्तिदंत, हरणाची कस्तुरी, अस्वलाची बाइल ग्लँड तसेच तिबेटियन हरणांच्या शाली (शहतूस) याशिवाय रक्तचंदन, प्रवाळ, विविध पक्षी, साप, सरडे आणि औषधी वनस्पती यांची मोठय़ा प्रमाणावर तस्करी चालते. नवी दिल्ली, कोलकाता, सिलिगुडी, मुंबई, चेन्नई, जबलपूर, कटनी, जयपूर, हरिद्वार, पिठोरागड, लखनऊ व अमृतसर ही वन्य जिवांच्या अवैध व्यापाराची पेंद्रे बनली आहेत. हिंदुस्थानातील नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार व बांगलादेशबरोबर असलेली व पूर्णपणे संरक्षित नसलेली सरहद्द ही या अवैध व्यापारातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाण्यासाठी पूरक आहे.
महाराष्ट्रासह देशात वन्य जिवांच्या शिकारीसाठी बारा बोअरच्या एक नळी किंवा दुनळी बंदुका अथवा पॉइंट थ्रीचा वापर केला जातो. वन्य जिवांचे पाय अडकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सापळे किंवा तारांचे फासे तयार केले जातात. पाणवठय़ावर विषप्रयोग किंवा विष लावलेले बाण वापरले जातात. इतपंच काय, 220 व्होल्टच्या विजेचाही शिकारीसाठी उपयोग केला जातो. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ व गडचिरोली जिह्यांसह पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही मोठय़ा प्रमाणावर शिकारीच्या घटना घडतात. सन 2011 ते 2021 या दशकात महाराष्ट्रात 862 बिबळ्यांच्या मृत्यूपैकी 88 घटना शिकारीच्या, 28 घटना विजेचा धक्का लागून, 13 विषबाधा तर 27 बिबळे सापळा किंवा फासामध्ये अडकून अशा एकूण 156 घटना शिकार व शिकारजन्य कारणामुळे घडलेल्या आहेत. वाघांच्या एकूण 139 मृत्यूपैकी 31 घटना शिकारीच्या, 12 घटना विजेचा धक्का लागून, 9 विषबाधा तर 10 वाघ सापळा/फासामध्ये अडकून अशा एकूण 62 घटना शिकार व शिकारजन्य कारणामुळे घडलेल्या आहेत. वाघांच्या शिकार व शिकारजन्य कारणामुळे मृत्यूंच्या घटना लक्षात घेता सन 2011 ते 2021 या वर्षात एकूण मृत्यूंच्या 43 टक्के इतके मोठे प्रमाण केवळ शिकार व शिकारजन्य कारणांमुळे वाघांचे मृत्यू झालेले आहेत. हे प्रमाण अतिशय जास्त आहे. तर बिबटय़ांच्या मृत्यूचे प्रमाणही 16 टक्के इतके आहे. वन्य जिवांचा अवैध व्यापार, त्यांची शिकार व अवयवांची तस्करी रोखण्यासाठी आज राज्यासाठी स्वतंत्र अशा राज्य वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरोची प्राधान्याने आवश्यकता आहे. राज्य वन्य जीव अपराध नियंत्रण ब्युरो स्थापन झाल्यास हा आकडा अतिशय कमी प्रमाणावर आणता येऊ शकतो. मोठय़ा प्रमाणात वाघ, बिबटय़ा व इतर वन्य प्राण्यांची शिकार रोखून जैवविविधता संवर्धन करणे शक्य होईल. आजच्या घडीला निव्वळ कायद्यावर विसंबून न राहता याबाबत लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जनजागृतीचीदेखील आवश्यकता आहे. मानवाला प्राणवायू, पाणी व अन्न देणाऱया जंगलातील वनस्पती व वन्य प्राण्यांची शिकार, अवैध व्यापार व उपभोग घेऊन आपण आपल्याच मृत्यूची तयारी करतोय.

(लेखक महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाचे सदस्य आहेत)
[email protected]