विपुल ग्रंथसंपदेत रमलो

>> बाबा भांड (ज्येष्ठ लेखक)

ज्येष्ठ लेखक बाबा भांड. लहानांपासून मोठय़ांसाठी नव्याने साहित्यनिर्मिती, आरोग्यासाठी आयुर्वेद अशी सक्तीची सुट्टी आनंदाची केली.

कोरोना महामारीचं संकट जगावर आलं. एवढय़ा मोठय़ा सहा महिन्यांच्या काळात स्वतःसाठी वेळ मिळाला. या दिवसांत मी माझ्या आवडीच्या कामांसाठी, आरोग्य जपण्यासाठी आणि मनःस्वास्थ्यासाठी कसा वेळ देता येईल याचे नियोजन केले. बहात्तराव्या वर्षी गेल्या सहा महिन्यांत चोवीस तासांच्या कामांचे म्हणजे दिवसभरातील कामांची आखणी केली. यामध्ये लेखन, वाचन ही गोष्ट माझी आवडीची प्रमुख कामे. सहा तासांची झोप वगळता 45 मिनिटे फिरणे, तेवढाच वेळ व्यायाम करणे, प्राणायाम करणे, ध्यानधारणा करण्यासाठी दररोज सकाळी वेळ देतो. शिवांबू प्राशनही करतो. साधा आहार घेतो.

उरलेला 75 टक्के वेळ वाचन आणि लेखन करण्यासाठी तसेच 25 टक्के वेळ कुटुंब आणि नातवांच्या संगतीत राहणे, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणे यासाठी दिला आहे. केलेल्या नियोजनाचे पालन करत आहे.

माझ्या चाळिशीत काही शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी मी योगसाधनेकडे वळलो होतो. योगसाधनेमुळे आयुष्यातील अनेक संकटांना संयमाने तोंड देण्याचा मार्ग मला सापडला. आवडीच्या विषयांवरील लेखन आणि प्रवास या माझ्या व्यसनातून अनेक ग्रंथांचे लिखाण माझ्याकडून झाले. प्रवासाच्या छंदामुळे आतापर्यंत मी 80 देशांमध्ये फिरून आलो आहे.
कोरोनाच्या या काळात लेखक आणि माझ्या करण्यासाठी मित्रांच्या संगतीने महाराजा सयाजीराव गायकवाड या युगपुरुषाच्या जीवनावर आधारित वीस हजार पृष्ठांचा ग्रंथ महाराष्ट्र शासनासाठी छापू शकलो. असे पन्नास ग्रंथ छापण्यात आले आहेत. याचे मला खूप समाधान वाटते. तसेच या समितीच्या सचिवपदाच्या जबाबदारीनेही खूप आनंद मिळाला.

या काळात मी सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ लिहिला. मराठा महानायक गंगाराम म्हस्केंची गोष्ट मुलांसाठी लिहिली. सयाजीरावांच्या बालपणीच्या. बालसंवंगडय़ांची गोष्ट लिहिली. वाचकांना या गोष्टी वाचायला नक्कीच आवडतील. महामारीच्या या प्रदीर्घ कालावधीत संकटं माणसाला मार्ग काढण्याचे बळ देतातच हे मला शिकायला मिळाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या