
>> तृप्ती कुलकर्णी
नागपूरच्या साहित्यविश्वात आपले वेगळेपण जपणारा, साहित्यिक घडामोडींमध्ये अग्रेसर असणारा समूह ‘मैत्र’.
कोरोनाने काही वर्षांपूर्वी आपल्या आयुष्याची घडी विस्कटली; पण याच काळाने नव्या शक्यतांचे दरवाजेही उघडले. प्रत्यक्ष भेटीगाठी आणि साहित्यिक कार्यक्रम थांबले असताना डिजिटल माध्यमाचा सर्जनशील उपयोग करून साहित्याचा संवाद जिवंत ठेवणाऱया व्यक्तींमध्ये नागपूरच्या डॉ. अरुंधती वैद्य यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या एका व्हॉट्सअॅप समूहाचे पुढे ‘मैत्र’ या साहित्यिक समूहात झालेले रूपांतर ही त्यांच्या सर्जनशीलतेची आणि जिद्दीची सुंदर कहाणी आहे. आजही विविध साहित्यिक उपक्रमांतून हा समूह आपली वेगळी ओळख जपत आहे. या आगळ्यावेगळ्या वाटचालीची ही गोष्ट.
‘मैत्र’ हा नागपूरच्या साहित्यविश्वात आपले वेगळेपण जपणारा, साहित्यिक घडामोडींमध्ये अग्रेसर असणारा समूह आहे. विविध वर्तमानपत्रांनीही त्याच्या उपक्रमांची दखल घेतली आहे. कोरोनापूर्वी डॉ. अरुंधती विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयात संचालक म्हणून कार्यरत होत्या. आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जवळपास 40 ते 45 उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन केले. मात्र त्याच काळात कोरोना आला आणि साहित्यिक कार्यक्रमांना खीळ बसली. या परिस्थितीत हार न मानता संवादाचे नवे माध्यम त्यांनी शोधले. प्रत्यक्ष भेटीऐवजी व्हॉट्सअॅपद्वारा साहित्यिक संवाद साधता येईल, हे लक्षात येताच त्यांनी एक समूह स्थापन केला. त्यावरील पहिला उपक्रम होता ‘शब्दांची गंमतजंमत.’ सात दिवस चाललेल्या या उपक्रमामुळे सदस्यांना विचारांचा नवा खुराक मिळाला, ‘देशोन्नती’ने या उपक्रमाची दखल घेतल्याने समूहाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचली. हा समूह ग्रंथालयातील सदस्यांपुरता मर्यादित न राहता लेखक-वाचकांचा झाला. पुढे डॉ. अरुंधती वैद्य यांचा ग्रंथालयातील कार्यकाळ संपला आणि त्यांनी हा समूह बंद करण्याचे ठरवले. मात्र सदस्यांच्या आग्रहाखातर तो सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला आणि त्याचे ‘मैत्र’ असे नामकरण करण्यात आले.
संकटकाळात संवाद साधण्यासाठी एकत्र आलेले हे साहित्यप्रेमी ‘मैत्र’ आता कायमस्वरूपी मैत्रीच्या धाग्यात गुंफले गेले आहेत. कोणतेही शुल्क न घेता चालणारा हा समूह आजही दर्जेदार कार्यक्रम आणि उत्साही सदस्यांमुळे तितक्याच उत्साहाने कार्यरत आहे. वाचन प्रेरणा दिन, जागतिक पुस्तक दिन, जन्मशताब्दी, आषाढस्य प्रथम दिन, लेखकांना श्रद्धांजली अशा विविध निमित्तांनी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तचा कार्यक्रम ‘देहाकडून देशाकडे’, ‘रहे ना रहे हम’, नवरात्र विशेष ‘नवमेधावी दुर्गा’, ‘वाचनवसा’, ‘दिवाळी अंक आणि माझे मत’ – चर्चासत्र यांसारखे अभिनव उपक्रमही राबवले गेले. जी. ए. कुलकर्णी-सुनीता देशपांडे, ग्रेस-जी. ए. यांच्यातील पत्रव्यवहाराचे अभिवाचन, विद्याधर पुंडलिक जन्मशताब्दी, भारत सासणे यांच्या कथांचे अभिवाचन, डॉ. जयंत नारळीकर यांना आदरांजली असे विविध कार्यक्रमही या समूहाने सादर केले. लहान मुलांसाठी ऑडीओ-व्हिडीओद्वारे अभिवाचनाचे कार्यक्रम घेतले गेले. सलग तीन वर्षे ‘दिवाळी पहाट’आणि दरवर्षी कालिदासाच्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात लघुव्याख्यान व कविसंमेलनाचे आयोजन केले जाते. या उपक्रमांचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे डिजिटल माध्यमापासून दूर असणारे अनेक सदस्य नव्या गौष्टी शिकले.
2021 मध्ये सुरू झालेल्या या ‘मैत्र’ समूहाची वाटचाल आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे. वेगवेगळे विषय शोधून सर्व वयाच्या लेखक-वाचकांना बोलते, लिहिते करण्याचे, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्याचे काम हा समूह तळमळीने करत आहे. या वाटचालीचे श्रेय सदस्यांइतकेच ती अखंडपणे सुरू ठेवणाऱया सर्जनशील लेखिका डॉ. अरुंधती वैद्य आणि त्याचे काही सहकारी यांनाही जाते. कोरोनाच्या काळोखातून उमललेले ‘मैत्र’ आज शब्दांच्या निमित्ताने मने जोडते, नाती फुलवते आणि मैत्रीची ऊब जपते. शब्दांची ही वीण अशीच मनामनांना जोडत राहो.


























































