ठसा – प्रतिभावान नाटय़कलावंत

>>  सुरेंद्र तेलंग

मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गुणी कलावंत ‘पद्मश्री’ दाजी भाटवडेकर यांची आज जन्मशताब्दी आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याविषयी परिचय करून देणारा लेख.

कृष्णचंद्र मोरेश्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर यांचा जन्म 15 सप्टेंबर 1921 रोजी झाला. लहान वयातच पिताश्री मोरेश्वरपंत यांनी त्यांना बालगंधर्वांची ओळख करून दिली व जणू काय मराठी रंगभूमीच्या विषयाच्या प्रेमाची बीजे त्यांच्या मनात रुजविली. दाजीसाहेब हे विल्सन महाविद्यालयाचे विद्यार्थी-गुरुवर्य प्रा. वेलणकर यांच्यावर परमभक्ती असलेले बुद्धिमान छात्र. 1944 साली संस्कृत विषय घेऊन दाजींनी मुंबई विद्यापीठाची एम.ए. ही पदवी मिळविली. त्यानंतर आपल्या रंगभूमीच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर डॉ. एस. जी. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.चा प्रबंध लिहिला व 1993 साली मुंबई विद्यापीठाने वरील पदवी त्यांना बहाल केली.

ब्राह्मण सभेच्या सहाय्याने दाजींनी बरीच संस्कृत नाटके रंगभूमीवर आणावीत अशी प्रेरणा महामहोपाध्याय डॉ. काणे व प्रा. वेलणकर यांनी दाजींना दिली. त्यांच्या प्रेरणेने दाजींनी बरीच नाटके रंगभूमीवर आणली व स्वतः शापुंतल, दुष्यंत, रत्नवालीत उदयन राजा, मालविकाग्निमित्रात गणदास, वेणीसंहारात सूत्रधार व कृष्ण यांच्या भूमिका उत्तमरीतीने सादर केल्या. तसेच आधुनिक नाटय़महर्षी वेलणकर यांच्या ‘संगीत सौभद्र’ नाटकात बलराम व ‘लोकमान्य स्मृती’ या तीन अंकी नाटकात लोकमान्य टिळकांची भूमिका दाजींनी समर्थपणे केली. संस्कृतचे शुद्ध व स्पष्ट उच्चार दाखवून देऊन त्यांनी इतर भाषांतील लोकांपेक्षा महाराष्ट्राचे वेगळेपण सिद्ध केले.

त्यांनी नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे, केशवराव दाते, मामा पेंडसे इत्यादी कलाकारांबरोबर कामे केली. त्यांच्याकडून नाटय़कलेचे शिक्षण त्यांना मिळाले. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकातील काकाजीची भूमिका दाजींनी अजरामर केली. नाटकातील नायक, खलनायक व विनोदी पात्र अशा वेगवेगळय़ा तऱहेच्या भूमिका करून त्यांनी स्वतःचा लौकिक प्राप्त केला.

नटवर्य बाबूराव पेंढारकर, नानासाहेब फाटक यांच्या भूमिकेतील आवडलेल्या छटांचा स्वीकार करून स्वतःचे वैशिष्टय़ दाखवून त्यांनी ‘झुंझारराव’ नाटकात झुंझाररावाची भूमिका केली. ‘घर गंगेच्या काठी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या दोन चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. दाजींनी रेडिओवरील नाटकाच्या नभोवाणी रूपांतरात भाग घेतला. त्यांचे बऱयाच संस्थांशी सभासद, अध्यक्ष, कार्यवाह इत्यादी नात्याने संबंध होते. मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख कार्याध्यक्ष व कार्यवाह होते. बालगंधर्व, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, महामहोपाध्याय डॉ. पा. वा. काणे, प्रा. न. र. फाटक इत्यादींवर दाजींनी लिहिलेले लेख मराठी साहित्याचे अलंकार ठरतील अशा योग्यतेचे होते. दाजी गणपतीचे व अक्कलकोट स्वामी महाराजांचे भक्त होते. विष्णूसहस्रनाम, वासुदेवानंद, सरस्वतीची गणेशस्तोत्र, दत्तात्रयस्तोत्र यांचे ते नियमित वाचन करीत होते.

1967 साली केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ ही पदवी दिली. राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते ‘नटसम्राट’ ही पदवी प्राप्त झाली. 1992 साली त्यांच्या संस्कृत नाटय़सेवेबद्दल ‘संस्कृत पंडित’ म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. नाटय़दर्पण प्रतिष्ठान (मुंबई) या संस्थेने ‘नाटय़भूषण’ ही पदवी बहाल केली. चिंतामणराव देशमुख, राधाकृष्ण, डॉ. शंकर दयाळ शर्मा, इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदके मिळाली.

1997 साली अक्कलकोट स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘तोचि एक समर्थ’ या चित्रपटात स्वामींची प्रमुख भूमिका त्यांनी केली होती. काही मालिकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. संस्कृत रंगभूमीला वैभवाच्या शिखरावर नेणारा नट, प्रतिभावंत कलावंत, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ता असलेल्या दाजींचे वयाच्या 85 व्या वर्षी 26 डिसेंबर 2006 रोजी निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या