
>> देवीदास फुलारी
उपक्रमशील शिक्षक, संवेदनशील साहित्यिक ग. पि. मनूरकर तथा मनूरकर गुरुजी यांच्या निधनाने साहित्य, शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे. उच्च विद्याविभूषित असूनही ते आपले आयुष्य साधेपणाने जगले. एक निस्पृह, निःस्वार्थी आणि निरागस व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. एका सेवाभावी पर्वाचा अस्त झाला आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या उमरी तालुक्यातील मनूर नावाच्या एका खेडय़ात प्राचार्य ग. पि. मनूरकर यांचा जन्म झाला. गोदावरीच्या काठावर असलेले मनूर हे गाव प्राचार्य ग. पि. मनूरकरांच्या नावामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर अधोरेखित झाले. मनूरकरांचे कुटुंब सधन होते पण घरी शैक्षणिक वारसा नव्हता. पण ग. पिं.ची आई लक्ष्मीबाई यांना शिक्षणाचे मोल कळले होते अन् एक दिवस गणपत पिराजी मनूरकर हे नाव हजेरीपटावर आले. नांदेडला माध्यमिक शिक्षण घेताना राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक सर्जे गुरुजी, नरहर कुरुंदकर यांच्यासारखे प्रज्ञावंत अध्यापक भेटले. इथेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला खतपाणी मिळाले. पुढे नांदेड येथेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्राचार्य राम शेवाळकरांसारखे ‘वक्ता दशसहस्रेशू’ गुरू त्यांना लाभले. ग.पि.मनूरकरांमध्ये दडलेल्या कथाकाराला दिशा दाखविण्याचे काम शेवाळकरांनी केले. ‘कुरुंदकर-शेवाळकरांच्या तोंडून ‘गणपत’ या नावाचा प्रेमभावपूर्वक उद्गार हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान होय, असे ग. पि. मनूरकर नेहमी म्हणत असत. इथेच ग. पि. मनूरकरांनी पुढे आपल्याला शिक्षकच व्हायचे हे निश्चित केले. पुढे उमरी येथील यशवंत हायस्कूल ज्यू. कॉलेज येथे शिक्षक म्हणून एक तप तर मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून दोन तपांची मनूरकरांची वाटचाल देदीप्यमान राहिली. त्यांच्यामध्ये एक ज्ञानपिपासू विद्यार्थी दडलेला होता. वाचन, चिंतन अन् लेखनातून मनूरकरांमधील अध्यापक आणि लेखक उत्तरोत्तर समृद्ध होत गेला. धडपड व्यासपीठ, सावित्रीबाई फुले आदिवासी पालक योजना व मिनी हॉस्टेलच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण प्रक्रियेत विविध उपक्रम राबवले. अण्णाभाऊ साठे हा ग. पि. मनूरकरांचा आवडता लेखक होय. ‘निवडुंगातील झंझावात’,‘दलितांच्या दारी’ ही त्यांची पुस्तके दलितांच्या व्यथा वेदनेला अधोरेखित करतात. त्यांच्या विविध उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मानित केले. मराठवाडी बोलीचा रानगंध हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय़ होते. कथा, काव्य आणि कादंबरी या वाङ्मय प्रकारांत ग्रामीण माणसांचे जगणे आविष्कृत करताना मनूरकरांची लेखणी नेहमीच संवेदनशील अन् पारदर्शी राहिली. ‘गुडबाय’, ‘मेण्यातील चंद्रकोर’, ‘कळसाविना देऊळ’, ‘शेवटचे वर्तुळ’, ‘संवाद कथा’, ‘तळतमातील ठिणग्या’ हे मनूरकरांचे कथासंग्रह तसेच ‘बुरुज’ आणि ‘प्राणयात्रा’ या कादंबऱया मानवी नातेसंबंधाचा विशाल पट तर मांडतातच, शिवाय मनातील सांदी कोपऱयात अप्रकाशित असलेल्या भावभावनातही साक्षात उतरवतात. ‘शिक्षणालेख’सारखा लेखसंग्रह म्हणजे ग. पि. मनूरकरांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचे फलित होय. त्यांच्या एकूणच कार्याची दखल महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी घेतली.
प्राचार्य राम शेवाळकरांनी एका लेखात मनूरकरांचा विद्यार्थी म्हणून वेगळा सन्मान केला आहे. ते म्हणतात, ‘गणपत मनूरकरांसारख्या विद्यार्थ्यामुळेच आपल्या अध्यापकीय आयुष्याचे सार्थक झाल्याचा सुखद प्रत्यय खऱया शिक्षकाला येत असतो. किंबहुना अशा विद्यार्थ्यामुळेच त्यांचे आयुर्मानही वाढत असते. अशा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक स्वतःची वर्धिष्णू प्रतिभा शोधत असतो व धन्यता अनुभवत असतो. शेवाळकरांची ही प्रतिक्रिया म्हणजे मनूरकरांसाठी मोठा पुरस्कारच होय. वि. वि. चिपळूणकर शिक्षण संचालक असताना ग. पि. मनूरकरांची ‘यशवंत’ शाळा त्यांच्या पसंतीला पात्र ठरली होती. उमरीचे यशवंत हायस्कूल ज्युनियर कॉलेज हे मनूरकर गुरुजींचे कॉलेज म्हणून परिसरात ओळखले गेले. खेडय़ापाडय़ात फिरून लोकसहभागातून त्यांनी ‘यशवंत’ची इमारत उभी केली.
गणपत पिराजी मनूरकर नावाचं चालतं बोलतं विद्यापीठ 27 ऑक्टोबर रोजी शांत झालं. जवळपास सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या परिसरात शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ समृद्ध केली. उच्चविद्याविभूषित असूनही अतिशय साधेपणाने जगणारे प्राचार्य ग. पि. मनूरकर यांच्या निधनाने एका सेवाभावी पर्वाचा अस्त झाला आहे.



























































