लेख: वेब न्यूज: स्वदेशी HSTDVची चाचणी अयशस्वी?

>>स्पायडरमॅन

नुकत्याच मिळालेल्या एका रिपोर्टनुसार हिंदुस्थानच्या ‘Defence Research and Development Organisation’s (DRDO)’ ने हायपरसॉनिक डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल अर्थात Hypersonic Technology Demonstrator Vehicle (HSTDV) ची डॉ, अब्दुल कलाम बेटावर घेतलेली चाचणी अयशस्वी ठरल्याची बातमी आहे. एचएसटीडीव्ही मॅक – 6 च्या पलीकडे जाण्यासाठी लागणारी हायपरसॉनिक गती मिळवण्यासाठी क्रॅमजेट इंजिनचा वापर करते.

देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेसाठी ही चाचणी फारच महत्त्वाची होती. बुधवारी घेण्यात आलेल्या या चाचणीत हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल (एचएसटीडीव्ही) ठरवण्यात आलेले मापदंड तांत्रिकदृष्टय़ा पूर्ण करू शकली नाही आणि तिचे प्रक्षेपण अयशस्वी ठरले. एचएसटीडीव्ही मानवरहित असे विमान आहे, जे हायपरसोनिक स्पीड फ्लाईटसाठी डिझाइन केलेले आहे. मिळालेल्या अहवालानुसार एका विशिष्ट उंचीपर्यंत एचएसटीडीव्हीला घेऊन जायचे आणि त्यानंतर प्रक्षेपण यानातून एचएसटीडीव्हीला प्रक्षेपित करायचे. प्रक्षेपण झाल्यानंतर स्वतःच्या क्रॅमजेट इंजिनाच्या मदतीने एचएसटीडीव्हीला आपली पुढची गती मिळवायची होती, परंतु या चाचणीच्या दरम्यान असे करण्यात एचएसटीडीव्हीला अपयश आले. यासाठी वापरण्यात आलेल्या प्रक्षेपण वाहनासाठी सॉलिड रॉकेट मानल्या जाणाऱ्या अग्नी-1 या बॅलेस्टिक मिसाईलची मोटर वापरण्यात आलेली होती.

हिंदुस्थानने भविष्यात आखलेल्या हायपरसॉनिक क्रूझ मिसाईलच्या निर्मिती प्रकल्पासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानले जात होते. या चाचणीच्या वेळी अग्नी-1 हे प्रक्षेपण वाहन अर्थात बुस्टर प्रक्षेपण झाल्यावर अनियंत्रित बनले आणि त्यामुळे त्याला अपेक्षित उंची गाठण्यात अपयश आले. दुसरीकडे Defence Research and Development Organisation’s (DRDO) ने मात्र 11ः27 वाजता मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आणि विविध रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रकिंग सेन्सर, टेलिमेट्री स्टेशन्सच्या मदतीने एचएसटीडीव्हीचा यशस्वी अभ्यास केला गेला आणि यासंदर्भातील सर्व माहितीदेखील संकलित करण्यात आली आहे. आता पुढील अभ्यासासाठी या डाटाचे विश्लेषण करण्यात येणार असल्याचेदेखील सांगण्यात आले आहे. सध्या इंडो-रशियन ब्रह्मोस-2 आणि अमेरिकन बोइंग एक्स-51 वेव्हराइडर ही दोनच मिसाईल क्रॅमजेट इंजिनाचा वापर यशस्वीपणे करू शकतात.

आपली प्रतिक्रिया द्या