मार्केटवर परिणाम करणारे घटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

शेअर्सची प्राईस कमी जास्त होणं हा मार्केटचा मूळ स्वभाव आहे. प्राईस कमी जास्त होण्यास अनेक घटना कारणीभूत ठरत असल्या तरी काही महत्त्वाच्या घटना असतात, ज्यांचा मार्केटवर सर्वात जास्त परिणाम होत असतो.

कंपनीचा परफॉर्मन्स – एखाद्या कंपनीच्या शेअरची प्राईस कमी जास्त होण्यात कंपनीचा परफॉर्मन्स ही घटना खूप महत्त्वाची असते. कंपनीच्या बाजूने सकारात्मक बातमी आली, उदाहरणार्थ- कंपनीच्या महसुलात वाढ झाली,  कंपनीने एखादं नवीन प्रॉडक्ट लाँच केलं किंवा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली. अशा प्रकारच्या बातमीने त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढू शकते. त्याउलट एखादी नकारात्मक बातमी, उदाहरणार्थ कंपनीला झालेला तोटा किंवा कंपनीत उघडकीस आलेले एखादे स्कँडल. अशा प्रकारच्या बातमीने त्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी होते.

इकॉनॉमिक इंडिकेटर – इकॉनॉमिक इंडिकेटरचाही परिणाम संपूर्ण स्टॉक मार्केटवर होत असतो. उदाहरणार्थ-  जीडीपी, बेराजगारीचा- महागाईचा निर्देशांक, व्याज दर यांचा खूप मोठा परिणाम शेअरच्या प्राईसवर होतो. साधारणतः सकारात्मक निर्देशांकामुळे गुंतवणुकदारांमध्ये आत्मविश्वास वाढतो, तर नकारात्मक निर्देशांकामुळे मार्केटमध्ये सेलऑफ व्हायची शक्यता वाढते.

इंडस्ट्री ट्रेंड – स्टॉक मार्केटमध्ये फार्मा, बँकिंग, स्टील, आयटी, ऑटो, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर आदी सेक्टर असतात. अर्थातच त्या सेक्टरमधल्या ट्रेंडचा परिणाम त्या सेक्टरमधील कंपनीच्या शेअरवर होतो. उदा. नवीन टेक्नॉलॉजी, संचालक मंडळात झालेला बदलाचा परिणाम शेअरच्या किमतीवर होतो.

राजकीय बदल किंवा आंतरराष्ट्रीय कलह – निवडणुका, दोन देशांतली युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय ट्रेड अॅग्रीमेंट किंवा संमती यांचा परिणाम स्टॉक मार्केटवर होत असतो. जेव्हा दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा मार्केटमधले चढउतार अतिजलद  होतात आणि अनिश्चितता कायम राहते. अशा वेळी मार्केट कोसळण्याची शक्यता दाट असते.

मार्केट सेंटिमेंट – भावनांक ही गोष्ट छुपी असली तरी तिचा परिणाम होत असतो. एखाद्या घटनेविषयी, कंपनीविषयी लोकांची मतं बनत जातात. त्याचा परिणाम मार्केटवर होत असतो. पॉझिटिव्ह सेंटिमेंटमुळे शेअरचं डिमांड वाढतं आणि त्यामुळे प्राईसही वाढते. याच्या उलट निगेटिव्ह सेंटिमेंटचे परिणाम दिसायला लागतात.

कंपनी गायडन्स – एखादी कंपनी जनमानसात आपली प्रतिमा बनवत असते. त्याचा परिणाम प्राईसवर झालेला दिसतो. कंपनीने केलेले इव्हेंट, एखाद्या प्रोजेक्टमधून निर्माण केलेला विश्वास यांचा परिणाम कंपनीच्या शेअरच्या वाढीवर होतो.

सप्लाय आणि डिमांड – डिमांड आणि सप्लाय हा कोणत्याही मार्केटचा आत्मा असतो. शेअर मार्केटमध्येही एखाद्या कंपनीच्या शेअरला हाय डिमांड असेल आणि लिमिटेड सप्लाय असेल तर शेअरची किंमत वाढते आणि याउलट जर कमी डिमांड असेल आणि हाय सप्लाय असेल तर प्राईस कमी होते.

 (लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत)