
>>दिलीप जोशी<<
आता परीक्षांचा मोसम संपत आलाय. या काळात अनेक विद्यार्थ्यांना केलेला अभ्यास ‘लक्षात राहिला ना?’ तशी चिंता सतावत आहे. अभ्यास तर झालाय, पण योग्य क्षणी ते ‘आठवलं’ पाहिजे यासाठी विविध पद्धतीने महत्त्वाच्या गोष्टी ‘लक्षात ठेवण्या’चा प्रयत्न सुरू असतो. परीक्षेत लिहिता-लिहिता सगळे आठवले किंवा माहीत होते, पण आयत्या वेळी ‘ब्लँक’ झाल्यामुळे इतके गुण गेले अशा गोष्टी नंतर ऐकायला मिळतात. शिकणाऱ्या प्रत्येकाला कधी तरी विद्यार्थीदशेतल्या या ‘स्मरणशक्ती’च्या कसरतीतून जावे लागते. त्या क्षणांची हुरहूर, वर्षभराची मेहनत तीन तासांत कामी आली तर होणारा आनंद आणि ते जमले नाही तर खट्टू होणे या साऱ्या गोष्टी कधी ना कधी वाटय़ाला येतात.
परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अवस्था तात्कालिक असते. पुढे आयुष्यात अनेकदा अनेक गोष्टी लक्षात ठेवून अचूकपणे करण्याची परीक्षा पदोपदी द्यावी लागते. उद्या करण्याच्या कामांपासून एखाद्या ठिकाणी जाताना सर्व वस्तू नीट बरोबर घेतल्या आहेत की नाही याची पडताळणी चार-चार वेळा केली जाते. तरीसुद्धा केव्हातरी व्हायचा तो घोळ होतो. आमचा एक मित्र परदेशी निघाला होता. दार उघडून सगळे सामान बाहेर काढताना शेवटी घेण्यासाठी ‘लॅचची’ चावी दाराजवळच्याच टेबलावर आठवणीने ठेवली होती. तेवढय़ात शेजारी ‘टाटा’ करायला त्यांच्या दारात आले. त्यांना पाहून घरातली सगळी प्रवासी मंडळी बाहेर कॉरिडॉरमध्ये आली आणि ‘घेतलेय ना सगळे नीट’ अशा चौकशीसह दार धाडकन लावून झाले… मग लक्षात आले की चावी आत राहिलीय आणि एक मोठी बॅगसुद्धा! थोडासा वेळ होता म्हणून बरे, धावपळ करून लॅच उघडणारा कारागीर आणला, कसेबसे सारे निस्तरून आणि घराची भिस्त शेजाऱयांवर सोपवून मंडळी मार्गस्थ झाली.
आता तो कदाचित अमेरिकेची ती ट्रीप विसरला असेल, पण ‘धाडकन लागलेले दार आणि चावी घरात’ या गोष्टी त्याला जन्मात विसरता येणार नाहीत. पुढे त्याने जगप्रवास केला, पण प्रत्येकवेळी घरून निघताना ‘आठवतं’ ते हेच!
माणूस काय लक्षात ठेवतो नि काय विसरतो? ठरवून काही लक्षात ठेवता किवा विसरता येते का? स्मरणशक्ती तीक्र असते की विस्मरणशक्ती? एक संशोधन आता असे म्हणते की, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यापेक्षा ती विसरणे जास्त कठीण असते. कारण म्हणे की एखादी गोष्ट विसरण्यासाठी मेंदूला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे ही गोष्ट त्याला ‘टफ’ वाटते.
यावर संशोधन करणाऱ्या मानसतज्ञांनी केलेल्या निरीक्षणात असे लक्षात आले की, आपल्या सगळय़ांना गतायुष्यातल्या काही गोष्टींचे स्मरणही वेदनादायी वाटते. आयुष्यातली प्रत्येक घटना मनाप्रमाणेच घडेल हे तर कोणाच्याही बाबतीत संभवनीय नाही, पण या गोष्टी ‘ट्रेन चुकली’ किंवा ‘सिनेमाचे तिकीट मिळाले नाही’ इतक्या साध्या असतील तर त्या आठवल्या किंवा विसरल्या तरी काहीच फरक पडत नाही, पण ‘ट्रेन चुकली आणि आजारी सुहृदाला वेळेत भेटायला जाता आले नाही’ असे घडले तर ती चुटपूट कदाचित जन्मभर विसरता येत नाही.
आयुष्यात नकोशा आठवणींचे ‘सल’ अनेक असतात. ते वेळोवेळी टोचत राहतात. त्यांचा आयुष्य झाकोळून टाकण्याइतका त्रास होत नसेल तर प्रश्न नसतो, पण त्यामुळे सतत अस्वस्थता येत असेल तर ‘पर्सनॅलिटी करेक्शन’ची गरज भासते. घडून गेला तो भूतकाळ परत आणता येत नाही. यापुढे मात्र काळजी घेऊ अशी स्वतःची समजूत घालून भागत असेल तर ठीक. नाहीतर काही गतस्मृती सतावत राहतात.
यातील शरीरशास्त्राच्या अभ्यासातून मेंदूच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडून नकोशा गोष्टी विस्मृतीत टाकायला मेंदूला अधिक कष्ट पडत असतील तर काय करायचे? हे संशोधक म्हणतात की, काळाच्या ओघात आठवणी धूसर होतातच. त्यांच्या फिकट होण्याची प्रक्रिया एकदा पूर्णपणे समजली की ‘नको त्या’ आठवणी क्षीण (वीक) करण्याचा मार्ग सापडेल.
विवेकी विचार करून अनेक माणसे दुःस्मृतींवर मात करतात तेव्हा ते आपल्या मनाची अशीच ‘समजावणी’ करत असतात; परंतु तार्किक पातळीवर कितीही पटले तरी मेंदूतल्याच ‘मनाची समजावणी पटेना’ अशीही अवस्था अनेकदा होते.
एक वृद्ध काका सांगत होते… ‘मी आता नव्वदीत आहे. बऱ्याच गोष्टी आठवत नाहीत. अहो तासाभरापूर्वी काय घडले हेसुद्धा कधी कधी विसरतो, पण बालपणी झाडावरून पडून कपाळाला खोक पडली होती तो प्रसंग डोळय़ासमोर जसाच्या तसा दिसतो…’ आमचा हा संवाद चालला असतानाच तिथे आणखी एक वृद्ध गृहस्थ आले. ते अगदी प्रसन्नचित्त असल्याचे चेहराच सांगत होता. ‘कसल्या गप्पा चालल्यायत?’ ‘काही नाही आता.. नको ते आठवते आणि हवे ते विसरते’ अशी स्थिती झालीय. यावर ते दुसरे गृहस्थ उद्गारले ‘मी तर शंभरीच्या अगदी जवळ आलोय… पण मागचा नाही… उद्याचा विचार करतो. त्यामुळे बरे वाटते. नाहीतर गतायुष्यात डोकावल्यावर कटू स्मृती येतातच. बघा जमतेय का?’
हे त्या दोघांचे वेगवेगळे पण सत्यानुभव, मी केवळ ऐकत होतो. कटू स्मृती विस्मरणात जाण्याचे एखादे तंत्र विकसित झाले तर किती बरे असे वाटत होते, असे मनात येत होते… आणि विस्मय वाटत होता तो त्या शंभरीच्या जवळ आलेल्या काकांच्या मेंदूतील पॉझिटिव्ह ऊर्जेचा. सगळय़ांनाच साधेल हे! प्रयत्न तर करावा!

























































