फोन स्मार्ट आहेच तुम्हीही स्मार्ट व्हा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निमिष पाटगावकर

आपली वैयक्तिक ओळख आणि माहिती जगाला सांगण्यासाठी आज सोशल मीडिया आहेच, पण आपल्या नकळत आपली माहिती जगाला कळवली जात असते किंवा कळवली जाऊ शकते हे बऱयाच जणांच्या माहीतही नसते. स्मार्टफोनच्या माध्यमातून होणाऱया या हेरगिरीला कसे दूर सारायचे हे सांगणारा हा लेख.

मूल्यवान वस्तूंची व्याख्या ही एकेकाळी फक्त स्थावर गोष्टींपुरती मर्यादित होती, पण आज त्या यादीत एका अशा गोष्टीची भर पडली आहे जी वरवर पाहता निरुपयोगी वाटू शकते, पण तिचा वापर कसकसा होऊ शकतो हे कळल्यावर त्या गोष्टीचे मूल्य पटायला लागते. त्या मूल्यवान गोष्टीचे नाव म्हणजे ‘डेटा’. डिजिटल युगाच्या ई – क्रांतीमुळे या मूल्यवान गोष्टीचे उत्पादन प्रचंड वाढले आणि कुठच्याच भौगोलिक घटकांवर अवलंबून नसल्याने या डेटाचे उत्पादन दिवसागणिक वाढतच जाणार यात शंकाच नाही.

हिंदुस्थानपुरता विचार करायचा तर गेल्या तीन वर्षांत स्मार्टफोन ग्राहकांची संख्या २२ कोटींहून वाढून ४० कोटी झाली आहे, मोबाईल फोन ग्राहकांची संख्या ९० कोटींहून वाढून १०८ कोटी झाली आहे आणि इंटरनेट ग्राहकांची संख्या ५० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. हे सगळे या डेटात दर सेकंदाला कळत नकळत भर घालत असतात. तो डेटा कधी असेल लिखित स्वरूपात तर कधी दृकश्राव्य माध्यमातून. या इतक्या डेटाचे संगोपन कसे करायचे हा तो डेटा निर्माण करणाऱया आणि डेटा साठवणाऱया दोघांपुढे गहन प्रश्न आहे. जो मोबाईल फोन दोन दशकांपूर्वी ऐच्छिक प्रकारात होता तो आता अत्यावश्यक प्रकारात आला आहे. बरं आज फोन हा नुसता बोलून संवाद साधण्याचे उपकरण राहिलेला नाही तर तो एक चालता बोलता डेटा संग्रह झाला आहे आणि तिथूनच खऱया प्रश्नांना सुरुवात होते.

आपली वैयक्तिक ओळख आणि माहिती जगाला सांगण्यासाठी आज सोशल मीडिया आहेच, पण आपल्या नकळत आपली माहिती जगाला कळवली जात असते किंवा कळवली जाऊ शकते हे बऱयाच जणांच्या माहीतही नसते. यात एक प्रकार असतो तो म्हणजे तुम्ही जी ऑप्लिकेशन्स फोनवर घेतली आहेत ती तुमचे जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाईट) स्थान बघून तुम्हाला उपयोगी पडू शकेल अशी माहिती सतत तुम्हाला पुरवत असते. तुम्ही नुसते विमानतळ परिसरात गेलात तरी तुमचे नेटवर्क लोकेशन बघितले जाऊन मोबाईल कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन्सच्या जाहिरातीचे एसएमएस तुम्हाला यायला लागतात किंवा तुम्ही कुठचेही हॉटेलातून जेवण मागवायचे ऍप फोनवर ठेवले असेल तर तुमच्या पसंतीला पडतील अशा तुमच्या सद्य ठिकाणच्या आसपासच्या रेस्टॉरंटच्या जाहिराती, सवलती तुम्हला दिसायला लागतात. ही न मागितलेली जादाची माहिती कधी कधी उपयुक्त पडू शकतेही पण खरा धोका असतो तो दुसऱया प्रकारात ज्यात तुमची माहिती एक संभाव्य ग्राहक म्हणून सदोदित कुणाला ना कुणाला दिली जात असते त्याचा. एक प्रकारची ही तुमच्यावर सदोदित चाललेली हेरगिरीच असते.

या हेरगिरीच्या शक्यता सांभाळून आपल्या स्मार्ट फोनचा स्मार्टपणे वापर कसा करता येईल हे आज प्रत्येकाने पहाणे गरजेचे आहे. आज सर्व वयोगटातील मोबाईल फोन ग्राहक नियमितपणे कसले ना कसले तरी ऑप्लिकेशन डाऊनलोड करत असतात. त्यात काही कामाची असतात तर काही मनोरंजनाची. मोबाईल फोन हा आज घडय़ाळ, गाणी ऐकण्याचे किंवा व्हिडीओ बघण्याचे साधन, उत्तम प्रतीचे फोटो काढण्याचे साधन आणि इतर अनेक गोष्टींना पूर्वी ज्या दहा वेगवेगळ्या गोष्टी वापरायला लागत होता त्या सर्वांना एकच उत्तर म्हणून अतिशय सुलभ पर्याय म्हणून उपलब्ध आहे फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण फोन कुठचा वापरतो आणि काय डाऊनलोड करतो त्याची.

आज सर्वात प्रचलित असलेल्या दोन प्रणाली म्हणजे अँड्रॉइड किंवा आयओएस थोडक्यात आपण गुगल किंवा ऍपल समजले तर प्ले-स्टोअर किंवा आयटय़ून्स वापरून आपण जेव्हा एखादे ऑप्लिकेशन फोनमध्ये डाऊनलोड करत असतो तेव्हा तुमच्या फोनमधले कायकाय उदाहरणार्थ फोटो, कॉन्टॅक्टस्, मायक्रोफोन किंवा कॅमेरा वापरायला त्या ऑप्लिकेशनला परवानगी आहे हे विचारले जाते. अँड्रॉइड किंवा आयओएस प्रमाणित ऑप्लिकेशन असल्याने हे विचारणे बंधनकारक आहे. पण त्यांचे काम तिथेच संपते. बऱयाचदा त्या ऑप्लिकेशनच्या लवकरात लवकर वापर सुरू करायच्या मोहापायी आपण न बघता धडाधड या सर्व परवानग्या देऊन टाकतो.
बहुतांशी प्रचलित ऑप्लिकेशनच्या बाबतीत या परवानग्या देणे धोक्याचे नसते कारण तुमचा डेटा त्यांना कायद्याप्रमाणे तिसऱया व्यक्तीला किंवा संस्थेला विकता येत नाही. खरा धोका असतो तो बहुतांशी अनेक गेमिंग ऑप्लिकेशनच्या बाबतीत. अनेक सुंदर सुंदर खेळ तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना मोहात पाडू शकतात आणि यातून डाऊनलोड करताना दिलेल्या परवानग्यातून तुमचा डेटा हा अयोग्य ठिकाणी विकला जाऊ शकतो. दिवसेंदिवस हे मोबाईल हेरगिरीचे प्रमाण वाढत चालले आहे. जागतिक पाहणीनुसार आज जगातील एकूण मोबाईल धारकांच्या १० ते ११ टक्के मोबाईलमधून ही पद्धतशीर हेरगिरी सुरू आहे. विशेष म्हणजे यात कधीकधी काही देशांच्या शासकीय अधिकृत हेरगिरीच्या समावेश असतो. संगणकाच्या सुरक्षेचे कवच भेदून डेटा मिळवण्यापेक्षा मोबाईलचे सुरक्षा कवच भेदणे हे बरेच सोपे आहे. तुम्ही कुठचा फोन वापरता आणि त्याची सुरक्षा कशी आहे यावर हे अवलंबून असते. आजकाल चांगल्या दिसणाऱया पण कमी दर्जाच्या चिनी बनावटीच्या मोबाईलचे पेव फुटले आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रमाणात संगणकाला अँटीव्हायरस वापरणे प्रचलित आहे तितकी सुज्ञता अजून बरेच लोक मोबाईलच्या बाबतीत दाखवत नाहीत. हे असे विनाकवचाचे स्वस्त फोन हे एखादे सॉफ्टवेअर आत घुसवून तुमची माहिती पाठवायचे उत्तम लक्ष्य असतात.

अर्थात काही ऑप्लिकेशनकरता मोबाईलमधल्या सुविधांची परवानगी असणे गरजेचे असते. उदाहरणार्थ आजकाल काही तुमच्या झोपेच्या पद्धतीचा अभ्यास करून तुम्हाला मार्गदर्शन करणारी ऑप्लिकेशन आहेत. त्यांना तुमच्या फोनमधील मायक्रोफोनची गरज आहे. याचा अर्थ मायक्रोफोनवरचे सर्व आजूबाजूचे संभाषण ऐकण्याचा त्यांना अधिकार मिळत नाही पण अशा कामाकरता जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठात संशोधन होत आहे. याच उदाहरणात सांगायचे तर तुमच्या झोपेचा अभ्यास करायला आजूबाजूच्या आवाजाची तीव्रता किती आहे याचा डेटा महत्त्वाचा आहे, ती तीव्रता सांगणारे संभाषण महत्त्वाचे नाही.

युरोपीय महासंघाने २५ मे २०१८ पासून अमलात आणलेल्या ‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर)’ कायद्याने युरोपीय महासंघ आणि नॉर्वे, आइसलँड आणि लिंकस्टाईनसारख्या देशांच्या नागरिकांच्या डेटा प्रायव्हसीची पुरेपूर काळजी घेतली जाईल. मोबाईल ऑप्लिकेशन बनवणाऱया कंपन्यांनाही ऑप्लिकेशनसाठी गरज नसलेली मोबाईलधारकाची खासगी माहिती गोळा करण्याचा अधिकार उरणार नाही.

थोडक्यात काय तर आज स्मार्ट फोन हा या हेरगिरीला चकवा देऊन कसा वापरता येईल हे तुमच्या स्मार्टपणावर अवलंबून आहे, फोनच्या स्मार्टपणावर नाही.

– [email protected]