ठसा – अनंत दीक्षित

745

>> मेधा पालकर

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांची पुरोगामी विचारधारा मानणारे सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. ‘केसरी’तून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून 1982 ते 2000 सालापर्यंत कार्यरत होते. त्यानंतर 2000 साली पुणे ‘सकाळ’च्या संपादकपदी ते रुजू झाले. पुणे ‘सकाळ’मध्ये त्यांनी चार वर्षे संपादक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर पुणे ‘लोकमत’मध्ये ते संपादक म्हणून रुजू झाले. ‘लोकमत’मधून निवृत्त झाल्यावरही ते पत्रकार म्हणून क्रियाशील होते. वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एका अभ्यासू संपादकाला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दीक्षित यांचा जन्म सोलापूर जिह्यातील बार्शी येथे झाला होता. त्यांचे शिक्षण बार्शीतच झाले. पुण्यात त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर आणि पुन्हा पुणे असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास राहिला. मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या जाणकार संपादकांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जायचं. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. तटस्थ राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांची ओळख होती. तसेच साहित्यविषयक त्यांचा व्यासंग होता. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान होते. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण विश्लेषण तसेच शैलीदार वत्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण होते. निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी न्यूज चॅनेलवर राजकीय विश्लेषक म्हणूनही आपली स्वतंत्र छाप पाडली होती. कोल्हापूर शहराशी त्यांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. कोल्हापूरशी आणि तिथल्या माणसांशी असणारी त्यांची नाळ शेवटपर्यंत कायम होती.

आपली प्रतिक्रिया द्या