
स्पायडरमॅन
व्यवसाय मग तो कुठलाही असो, अभिनव प्रकारे केला तर लोकांच्या पसंतीस उतरतो आणि त्याला प्रसिद्धीदेखील मिळते हे नक्की. कोरोना महामारीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे चालू व्यवसाय बंद पडले. संपूर्ण जगाला कोरोनाने चांगला तडाखा दिला. मात्र या तडाख्याला संधी मानून अनेकांनी भन्नाट कल्पना लढवत नवे नवे व्यवसाय सुरू केले. अभिनव असे स्टार्ट-अप उभे राहिले. काही धाडसी लोकांनी तर चालू नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण केले आणि यशस्वीदेखील झाले. अनोख्या कल्पना घेऊन सुरू झालेले असे काही व्यवसाय जगात चर्चेचा विषय बनले. असाच एक व्यवसाय आहे ‘जुआन कार्लोस एल्वाराडो’ या कोलंबियन युवकाचा, जो सध्या सोशल मीडिया आणि इतर मीडियामध्येदेखील जोरदार चर्चेत आहे. इतके चर्चा होण्यासारखे या व्यवसायात आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डोकेबाज जुआन चक्क शुद्ध हवा बाटलीबंद करून तिची विक्री करतो आहे आणि बक्कळ पैसादेखील कमावता आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या बाटल्या खरेदी करणारे ग्राहक या हवाबंद हवेच्या बाटलीलादेखील तुफान प्रतिसाद देत आहेत.
सध्याच्या प्रदूषणाच्या काळात मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. चायनामध्ये तर काही काळापूर्वी प्रदूषणामुळे शहर बंद ठेवण्याची वेळ आली होती. आपल्याकडे दिल्ली शहरात प्रदूषणाची काय अवस्था आहे ते आपण अनुभवत असतो, वाचत असतोच. अशा वेळी शुद्ध हवेची खरी किंमत लक्षात घेते. हुशार जुआनने हेच हेरले. महत्त्वाचे म्हणजे, तो कोलंबियाच्या ज्या ‘मेडिलेन’ शहराचा रहिवासी आहे, त्या शहराला त्याच्या सर्वोत्तम आणि शुद्ध वातावरणामुळे ‘सिटी ऑफ इटर्नल प्रिंग’ म्हणून जगभरात ओळखले जाते. आपल्या शहरातील ही शुद्ध हवा जुआन त्याने विकसीत केलेल्या अनोख्या तंत्रज्ञानाने बाटलीबंद करतो. ही हवा शुद्ध असल्याने ती थेट बाटलीबंद केली जाते आणि मग दूरच्या शहरांमध्ये जाऊन ग्राहकांना त्याची हातोहात विक्री केली जाते.




























































