
>> प्रशांत गौतम
संतसाहित्यातील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कुमुद दिगंबर गोसावी (85) यांच्या निधनाने संतसाहित्याचा व्यासंगाने, साकल्याने विचार करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. आदर्श शिक्षिका ही ओळख असलेल्या डॉ. गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या. मागील आठ ते दहा वर्षांपासून पुण्यात त्यांचे वास्तव्य होते. अलीकडच्या काळात त्या काही महत्त्वाच्या दैनिकांसाठी नियमित स्वरूपात सदर लेखन करीत असत. त्यांनी विपुल प्रमाणात ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यात ‘संत एकनाथांचे स्फुट लेखन’, ‘मौनी प्राजक्त’, ‘संत कबीर तीस यंत्र’, ‘अरूपे घेतले रूप’, ‘चैतन्याचा धनू’, ‘हरिगंध’, ‘युग संजीवक नाथ’, ‘शिलालेख’, ‘एका जनार्दनी’, ‘भारूड भावार्थ’ तसेच ‘संत एकनाथ’, ‘म्हणे जनार्दन’, ‘संत वचनामृत’, ‘किल्लेदार जनार्दन स्वामी’, ‘युगप्रवर्तक संत एकनाथ’ (14 आवृत्त्या), ‘नाथ चरित्र चित्रावली शूलिभंजन महिमा’ आदी ग्रंथसंपदेचा समावेश आहे. कुमुदताईंनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. संत एकनाथ महाराजांवरील ‘एकोबा’ ही कादंबरी मराठीसह इंग्रजीत प्रकाशित झाली. ती जगभर गाजत आहे. तसेच संत एकनाथ महाराजांच्या पत्नी ‘गिरिजा’ यांच्या जीवन प्रवासावर आणि त्या काळातील गृहिणींच्या भावविश्वावर आधारित त्यांनी ‘गिरिजा’ ही कादंबरीही लिहिली आहे. आपल्या साहित्याद्वारे त्यांनी संतांचे विचार, भक्ती आणि समाज प्रबोधनाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. बळवंत वाचनालयाच्या माजी ग्रंथपाल प्रतिभा जोशी यांनी कुमुदताईंविषयी एक वेगळी आठवण सांगितली आहे. त्यात त्या म्हणतात, त्यांचे वडील इतिहास संशोधक न.शे. पोहनेरकर 1968-70 च्या काळात त्यांना सोबत घेऊन गोसावी गुरुजींच्या घरी गेले. गोसावी गुरुजी व पोहनेरकर राज्य शासनाच्या ‘भावार्थ रामायण’ संपादन समितीवर एकत्र काम करीत असत. तेव्हापासून दोघांच्या भेटीगाठी होत. कुमुदताईंचे पती दिगंबर गोसावी यांचे ते वडील. काही दिवसांनी कुमुदताई दादा पोहनेरकरांना भेटायला आमच्या घरी आल्या. त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘दादा, मी जनार्दन स्वामींवर पीएच.डी. करीत आहे. आपण मार्गदर्शन करावे.’’ तेव्हा दादा त्यांना म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही गोसावी गुरुजींच्या सूनबाई! संशोधनासाठी जरूर मदत करीन’’ आणि कुमुदताईंचे न.शे.पोहनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू झाले. कुमुदताई व प्रतिभा जोशी यांच्यातील असा हा स्नेहाचा धागा अखेरपर्यंत कायम होता. कुमुद गोसावी यांचे महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘भारूड भावार्थ’, ज्याला संतसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ यु.म.पठाण यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या पुस्तकात कुमुद गोसावी यांनी ‘भारूडः भावार्थ निर्मिती प्रयोजन’, ‘भारूड ः बहिरंग अंतरंग’, ‘भारूड ः भावार्थ’, ‘संहिता काही निवडक भारुडांची’ अशा काही प्रकरणांतून संपूर्ण विषय सोपा करून समजावून सांगितला आहे. संत एकनाथ महाराजांनी लोकसंवाद साधण्यासाठी आपल्या प्रवचन कीर्तनातून भारुडातील रूपक नाट्याचा मुक्तपणे वापर केला आहे. हे त्यांचं भारुडाचं एकंदरीत रूप बघितले म्हणजे आपल्या लक्षात येते. कीर्तन हे एकपात्री नाट्य असेच असते. म्हणूनच नाथ महाराजांच्या कीर्तनास अलोट गर्दी होत असे. आपल्या अनेक भारुडांतून त्यांनी समाजनाट्याची संहिताच सादर केली. ती विविधरूपी, बहुरंगी, बहुढंगी अशी असून लोकधर्मी नाट्याशी जवळीक साधणारी आहे.
नाथाघरची उलटी खूण ।
पाण्याला लागली मोठी तहान ।।
आत घागर बाहेर पाणी ।
पाण्याला पाणी आले मिळोनि ।।
अजी म्या एक नवल देखिले ।
वळचणीचे पाणी आढ्या लागले ।।
शेतकऱ्याने शेत पेरिले ।
राखणदाराला तेणे गिळले ।।
नाथ महाराजांची अशी एक कुटात्मक रचना सांगणारी भारुडे समजायला अवघड जात असली तरी त्यातील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी त्यांची जिज्ञासा जागृत करून जातात. उलट्या व्यावहारिक अर्थाने सांगितलेला हा गूढ परमार्थ होय, जो कुमुदताई आपल्या ‘भारूड भावार्थ’ या ग्रंथात विस्ताराने निरूपण करून सांगतात. संतसाहित्य लेखन, व्याख्यान योगदानासाठी कुमुदताईंना गुरुमाहात्म्य पुरस्कार, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई ट्रस्ट पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, संत एकनाथ पुरस्कार, सदाचार संवर्धन पुरस्कार, साहित्य पुरस्कार, श्री हरिकीर्तनोत्तेजक पुरस्कार प्राप्त झाले. सतत लेखन, वाचन, चिंतन यात व्यस्त असणाऱ्या कुमुदताईंनी संतसाहित्यात दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, जे पुढील पिढीतील लेखकांस, अभ्यासकांस मार्गदर्शन करणारे आहे.





























































