हम ना तुम्हे भुलाएंगे – उदास उदास दूर पांगल्या साऊल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ना. धों. महानोर

प्रत्येक शतकाचा विचार केला की वेगवेगळय़ा क्षेत्रात काम करणारे प्रगल्भ विचारवंत, समाजकारणी, राजकारणी निर्माण होतात. यातही असे काही लोक असतात ज्यांच्यामुळे राज्य मोठं होतं, देश मोठा होतो. अशा लोकांमध्ये प्रतिभावंत ईश्वरी देणं लाभलेलं, साधना आणि मेहनत करून, दुःख पचवून जगभरात पोचलेलं नाव म्हणजे लता मंगेशकर. या नावाने आपले, आपल्या राज्याचे, देशाचे वैभव वाढवले. माणूस कधीतरी जाणार, वय झाले होते, आजारपण होते, सगळं खरं, पण अशा माणसांचं प्रत्यक्ष असणं, मार्गदर्शन करणं सुखद असतं. माझ्यासारख्या छोटय़ाशा गावात राहणाऱया, रानावनात रमणाऱया कवीशी मंगेशकर कुटुंबीयांनी जिव्हाळय़ाचे नाते जोडले. थोडीथोडकी नव्हे, तर 50 वर्षांची आमची ओळख. राजकारण, कला, साहित्य क्षेत्रात काम झाल्यानंतर विशिष्ट काळानंतर कुणी कुणाला विचारत नाही, ओळख दाखवत नाही; पण लतादीदी आणि एकूणच मंगेशकर कुटुंबाने एवढा काळ व्यक्तिगत नातं जोडून, मग माझं शेती करणं असेल, रानात राहणं असेल, माझं दुखणं, आजारपण, माझ्या कविता साऱयांना आपलं मानून प्रेम केलं.

1970 साली मी लता मंगेशकर यांच्या घरी प्रभुपुंजला पहिल्यांदा गेलो. माझ्यासोबत रामदास भटकळ आणि कवी चंद्रकांत पाटील होते. तेव्हा माझं ‘रानातल्या कविता’ पुस्तक आलं होतं. त्या भेटीत बाळासाहेब म्हणजे पं. हृदयनाथजींसोबत आमच्या खूप गप्पा झाल्या. दोन-तीन तास झाले म्हणून कुणीतरी येऊन रूममध्ये डोकावून जात होतं. त्या लतादीदी होत्या. हे कोण असतील, हृदयनाथ त्यांना घेऊन का बसले, असेही त्यांना वाटले असावे. एकदा त्या आत आल्या तेव्हा मी त्यांना नमस्कार केला. लतादीदींनी माझ्या कविता वाचल्याचे त्यावेळी मला सांगितले. दुपारी साडेबाराला प्रभुपुंजवर पोचलेले आम्ही संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बाहेर पडलो.

त्यानंतर 1977 साली मला एक पत्र आलं. आदिवासी जीवनावर एक संगीतप्रधान चित्रपट करायचा आहे. त्याची गाणी तुम्ही लिहायची आहेत, अशा आशयाचे ते पत्र होते. दोन तासांच्या चित्रपटात एकूण 16 गाणी असतील. आपण भेटून गाण्यांच्या जागा ठरवूया, असे पत्रात लिहिले होते. ते पत्र वाचून मी हादरलोच. मी पत्राला उत्तर दिले नाही. याचं कारण माझी हिंमत नव्हती. मी खेडय़ात राहणारा माणूस. माडगूळकर, शांता शेळके, खेबुडकर, पी. सावळाराम अशी दिग्गज असताना माझंच नाव मंगेशकर कुटुंबीयांनी का निवडलं असेल… मी तर कधी चित्रपटासाठी एकही ओळ लिहिलेली नाही. दोन गाणी वगैरे ठीक… पण अख्ख्या सिनेमासाठी इतकी गाणी लिहायची… जरा कठीणच वाटलं. असेच काही महिने गेले. त्यानंतर पुन्हा भारतीबाईंचे पत्र, जब्बार पटेलांचा निरोप आला. तुम्ही याच… तुमच्याकडून नवीन काहीतरी मिळेल. चित्रपट गीतांना लोकसंगीताचा बाज मिळेल… असा आग्रह झाला.

… आणि मी पुन्हा 19 मार्च 1977 रोजी प्रभुपुंजला गेलो. गुढीपाडव्याचा दिवस होता. चित्रपटाचे नाव ठरले होते ‘जैत रे जैत.’ त्यात काम करणारी स्मिता पाटील वगैरे मंडळी, दिग्दर्शक जब्बार पटेल, बाळासाहेब, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर असे सगळे त्या बैठकीला होते. ‘जैत रे जैत’ चित्रपटातील गाण्यांच्या जागा ठरवल्या जात होत्या. त्यावेळी हृदयनाथ आणि लतादीदींनी मला सांगितले, कवी, तुम्ही अजिबात दडपण घेऊ नका, संकोच करू नका. तुमचं स्वातंत्र्य घेऊन लिहा. थोडक्यात त्यांनी मला मर्जीनुसार काम करण्याची मोकळीक दिली. त्याचवेळी ‘मी रात टाकली, मी कात टाकली’ हे गीत माझ्याकडून लिहून झालं. मी ते म्हणून दाखवलं. ते ऐकल्यावर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. मी लिहिलेल्या पहिल्या गाण्याला मंगेशकर कुटुंबीयांनी दिलेली ती दाद होती. सारंच अविश्वनीय होतं. मग पुढे ‘नभ उतरू आलं’, ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘कुण्या राजान राजान…’ लिहीत राहिलो.

ती सुरुवात होती. ‘जैत रे जैत’ची सगळी गाणी आजही गाजतात. हृदयनाथांचे संगीत, दीदींचा स्वर यामुळे ती वेगळ्या उंचीवर गेली. त्या गाण्यांसोबत मंगेशकर कुटुंबीयांच्या प्रेमाचा ओलावा मला मिळाला. पुढे तर दीदींनी स्वतःहून माझ्याकडे पाच-सहा गाणी मागितली. तुमच्या लावण्या मी गाणार असे मला सांगितले. खान्देशी लोकसंगीताचा लहेजा मी माझ्या कवितासंग्रहात रूढ केला होता. तीच गाणी त्यांना हवी होती. ‘माझ्या आजोळची गाणी’ या नावाने सहा गाण्यांचा अल्बम त्यांनी केला. ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘चांद केवडय़ाची रात आलीया सामोरा’, ‘घन ओथंबून येती’, ‘आज उदास उदास दूर’, ‘बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं’, ‘किती जिवाला राखायाचं राखलं…’ खान्देशातील त्यांचे आजोळ. मला त्याच्याशी त्यांनी जोडून घेतलं. तुमची गाणी माझ्या आजोळची गाणी… आणखी काय पाहिजे. महानोरांचे शब्द असतील तर मी ‘सर्जा’ मध्ये गाईन असं त्यांनी रमेश देव यांना सांगितलं होतं. ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी…’ लतादीदींनी स्वतःहून माझ्याकडे गीत मागणे ही मोठी गोष्ट होती.
27 जुलै 2020 साली हृदयनाथांचा अचानक मला पह्न आला होता. रात्री 10 वाजता. मी जागा होतो. तब्येतीची विचारपूस वगैरे झाल्यावर त्यांनी पह्न दीदींकडे दिला. हॅलो, कवी मी लता बोलतेय… ते वाक्य ऐकून मी उडालोच. दीदी म्हणाल्या, माझं कपाट साफ करताना एक कागद सापडला. त्याच्यात तुमची कविता होती. इतकी सुंदर कविता तुम्ही लिहिलेय. तुमच्या हस्ताक्षरातील कविता मी जपून ठेवलेय. मग माझ्या कवितेवर, माझ्या खेडय़ावर, झोपडीवर, साधी राहणी आणि जगण्यावर त्या बोलल्या. त्या म्हणाल्या. साहित्यिक, कलावंत म्हणून मोठं असताना माणूस म्हणून मोठं असलं पाहिजे. हे मोठंपण मला दोन व्यक्तींमध्ये दिसलं. एक कुसुमाग्रज आणि दुसरे तुम्ही.
दीदींविषयी जितपं लिहीन तितपं कमी आहे. दुःखितांचे जगणे सुकर करण्यासाठी त्यांनी पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उभं केलं. माझ्या दुःखाच्या काळात, कठीण प्रसंगात त्यांनी आपुलकीने माझी विचारपूस केली. मला आधार दिला. लताबाईंचे नाव मी उद्यानाला दिले. माझी डोंगराच्या पायथ्याशी खडकाळ शेतजमीन आहे. या ठिकाणी पाणी नाही, काही उगवत नाही. त्या ठिकाणी मी सीताफळं लावली. सीताफळाचं झाड ऊन, वारा, पाणी नसताना प्रतिकूल परिस्थितीत जगतं. त्याचं लताबाईंच्या खडतर जीवनप्रवासाशी साधर्म्य असल्याने सीताफळाच्या उद्यानाला लता मंगेशकर उद्यान नाव दिले.

आज प्रभुकुजमध्ये जायची हिंमत नाही. त्या घरात दीदी नाहीत, त्यांचा स्वर, सुगंध नाही असं वाटतंय.
आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

दीदी मला एखाद्या वटवृक्षासम भासतात. त्या वटवृक्षाचे अस्तित्व देशभरात, जगभरात गेलंय. वटवृक्षाच्या सावलीत मी आणि माझ्यासारखे खूप लोक आहेत. त्याचा स्रोत शंभर-दोनशे नव्हे तर हजारो वर्षे कलावंतांना ऊर्जा देत राहील. कारण तो दैवी स्वर आहे, तो कधीही नष्ट होणार नाही.
(लेखक ज्येष्ठ निसर्गकवी आहेत.)