विद्रोही परखड लेखनाचे दीपस्तंभ

>> समीर गायकवाड

अंतर्मुख करणारं सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारं दिग्दर्शन आणि प्रभावी पण संयत अभिनयामुळं हिंदुस्थानी साहित्य व कलाक्षेत्रावर स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचे नुकतेच निधन झाले. परखड लेखन आणि विद्रोही विचार यामुळे पुरोगामी चळवळीचे ते आधारस्तंभ ठरले.

आपल्या जन्मदात्या वडिलांच्या वंशातून न जन्मलेल्या, पण आपल्या जन्माआधीपासूनच आपल्या मायपित्यासोबत राहणाऱया आपल्या सावत्र भावास आपल्याच वडिलांचं नाव लावता यावं म्हणून कुठल्या धाकटय़ा भावानं संघर्ष केल्याचं तुमच्या पाहण्यात आहे का? नाही ना! पण एक माणूस होता असा. गिरीश कर्नाड त्याचं नाव. गिरीश कर्नाडांच्या मातोश्री किशोरी विधवा होत्या. कृष्णाबाई त्यांचं नाव. पहिल्या पतीपासून त्यांना एक मुलगा झाला होता. पतीच्या निधनानंतर काही काळ खचलेल्या त्या स्त्राrने पुनर्विवाह करायचं ठरवलं. त्या काळी असं धाडस करणं म्हणजे अग्निदिव्य होतं. तेव्हा कृष्णाबाईंचा पहिला मुलगा आठ-नऊ वर्षांचा होता.

गिरीश यांचे वडील रघुनाथा डॉक्टर होते. आपल्या पहिल्या मुलाची हकीकत गिरीश यांच्या मातापित्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तोही आपलाच सख्खा भाऊ आहे असं ते अनेक वर्षे समजत होते. गिरीशजींच्या मातोश्रींनी वयाच्या 82 वर्षी आपली कहाणी लिहिली, तेव्हा त्यांना त्याविषयी समजले. मात्र त्यामुळं ते विचलित झाले नाहीत की त्यांचा दृष्टिकोनही बदलला नाही. आपल्या त्या भावाला आपल्या वडिलांचे नाव लावण्याचा अधिकार मिळावा यासाठी गिरीश कर्नाडांनी समाजाशी संघर्ष केला. गिरीश कर्नाडांच्या विद्रोहात, बंडखोरीत आणि परखडपणात कारणीभूत असणारा हा इतिहास कमालीचा टोकदार आहे. त्यांच्या प्रतिभाशाली साहित्यकृतीतून त्याची सार्थ अनुभूती येते.

गिरीशजींच्या साहित्यकृतींपैकी एक प्रसिद्ध रचना म्हणजे ‘नागमंडल’ हे नाटक होय. स्त्रीच्या शोषणावर या नाटकातून प्रकाश टाकण्यात आलाय. स्त्राrचं दमन करण्यात सहभागी असलेल्या समाजास उद्देशून ते प्रश्न करतात की, ‘‘स्त्राrचा खरा पती कोण?’’. या प्रश्नाचा खिळा ते प्रेक्षकांच्या मस्तकात ठोकतात हे मान्य, पण प्रत्यक्षात हे नाटक लिहिताना त्यांच्या डोळ्यासमोर जन्मदात्या आईचा दुःखद भूतकाळ आला असेल. तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील नाही का! त्यांच्या अन्य रचनांहून आपल्या नवऱयाचे बाहेर संबंध आहेत हे माहीत असूनही पत्नीने त्याच्याशी एकनिष्ठ राहावे, त्याची तक्रार करू नये, झालंच तर स्त्राrजन्माचे भोग म्हणून ते सोसावेत. त्याचवेळी तिने मात्र कुठल्याही परपुरुषाशी बदफैली करू नये याकडे तिच्या पतीचा, कुटुंबाचा, समाजाचा, पर्यायाने सगळ्यांचाच कटाक्ष असतो, तर दुसरीकडे बाहेरख्याली असणाऱया नवऱयाने बायकोवर संशय घ्यावा अन् खरंखोटं जाणून न घेता तिच्या अब्रूचे खोबरे आपल्याच हाताने गावभर उधळावे ही बाब आपल्याकडे सामान्य आहे. यावर अचूक बोट ठेवत गिरीश कर्नाडांनी ‘नागमंडल’ हे नाटक लिहिले होते.

दक्षिण हिंदुस्थानात सर्वश्रुत असलेल्या काही सर्पविषयक लोककथांवर ते आधारित आहे. कर्नाटकातील दोन लोककथा, ज्या नागपंथावर आधारित आहेत, त्यांचे हे एक सुंदर नाटय़रूपांतर आहे. पैकी एक कथा दुसऱया दंतकथेतले कच्चे दुवे समोर आणत त्यावर प्रहार करते. आपल्याकडे असलेल्या सूत्रधाराच्या मुखातून वदवल्या जाणाऱया लोकनाटय़ाप्रमाणेच एका कलाकारास केंद्रस्थानी ठेवून त्याचं प्रकटीकरण केलेलं आहे. ‘राणी’ नावाच्या नवविवाहितेची ही कथा आहे. विवाहबाह्य संबंधातून ती गर्भवती राहिली आहे असा तिच्या नवऱयाचा तिच्यावर आरोप असतो. गावाच्या पंचायतीसमोर जबाब देताना राणी एक काल्पनिक कथा रचते. खरं तर ही कथा म्हणजे तिला हवाहवासा असलेला विकार, वासनांचा कल्पनाविलास असतो. या कथेतून तिची हतबलता स्पष्ट होते.

लोककलेच्या शैलीतून नाटक समोर येतं आणि वैवाहिक जीवनातील पदर उलगडताना स्त्राrच्या घुसमटीवर भाष्य करतं. इतिहासात घडलेल्या घटना, त्यातली पात्रे, त्यातून देण्यात येणारा तत्कालीन संदेश यांचा वापर कर्नाड आताच्या काळाशी जुळवत त्यात एकजिनसीपणा आणतात. पण केवळ पुराणातल्या कथा वा लोककथा जशाच्या तशा घेऊन त्यावर वर्तमानाचा मुलामा चढवणे ही कर्नाड यांची प्रकृती नव्हती. अशा कथांचे समकालाशी नाते जोडणे, त्यांचे नेमके अन्वयार्थ लावणे कर्नाड यांना जमले. त्यामुळेच त्यांच्या कलाकृती एकसमान नसून त्यात कमालीचे वैविध्य आहे. ‘हयवदन’मध्ये अर्धा घोडा व अर्धा पुरुष असे प्रतीक त्यांनी वापरले होते. स्त्राrला एकाच वेळी बुद्धिमान आणि बलवान पुरुष हवा असतो अशी संकल्पना असलेल्या या लोककथेत त्यांनी असा घोडा प्रतीक म्हणून वापरला होता.

’नागमंडल’मध्येही मूळ कथेत त्यांनी कथेशी व कथेच्या आशयाशी सुसंगत असे बदल केले होते. हे बदल त्यांच्या लोककथांना, पुराणकथांना एका वेगळ्याच पातळीवर पाहण्याच्या दृष्टिकोनाचे दर्शक ठरले. ही नाटके कन्नड रंगभूमीपुरतीच मर्यादित राहिली नाहीत. हिंदी व मराठीतही ‘हयवदन’चा अतिशय उत्तम असा प्रयोग झाला. जगविख्यात झालेल्या या नाटय़कृतींनी 1998 मध्ये त्यांना ज्ञानपीठ मिळवून दिलं. केवळ नाटककार म्हणून त्यांना ‘ज्ञानपीठ’ मिळणे ही हिंदुस्थानी रंगभूमीसाठी अत्यंत सन्मानाची व महत्त्वाची बाब होय.

अंतर्मुख करणारं सर्जनशील लेखन, नवदृष्टी देणारं दिग्दर्शन आणि प्रभावी पण, संयत अभिनयामुळं हिंदुस्थानी साहित्य व कलाक्षेत्रावर स्वतःचा अमीट ठसा उमटवणारे प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक अशी त्यांची बहुआयामी प्रतिमा होती. बहुभाषिक व बहुपेडी व्यक्तिमत्त्व असलेल्या कर्नाड यांनी तब्बल चार दशके नाटय़लेखन, दिग्दर्शन व अभिनयानं रंगभूमी गाजवली. कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजीसह विविध भाषांमध्ये त्यांची नाटके रूपांतरित झाली. वेगळ्या धाटणीची व नवा दृष्टिकोन देणारी त्यांची नाटकं सुजाण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. केवळ रंगभूमीवरच न रमता सिनेमाचा पडदाही त्यांनी गाजवला. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित ‘संस्कार’ चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘उत्सव’ या हिंदी चित्रपटानं समीक्षकांची वाहवा मिळवली. दूरदर्शनच्या ’टार्ंनग पॉइंट’ या विज्ञानविषयक कार्यक्रमात त्यांनी निवेदकाची भूमिका पार पाडली. ‘पुकार’, ‘इक्बाल’ व ‘टायगर जिंदा है’ या हिंदी चित्रपटांतूनही ते झळकले होते. 33 वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटात गिरीश कर्नाड यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या पतीची भूमिका केली होती.

त्यांचा एकूण प्रवास प्रेरणादायी होता. रायगड जिह्यातील माथेरान इथं 19 मे 1938 साली त्यांचा जन्म झाला. कर्नाटक विद्यापीठातून 1958 साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केलं. पुढं फेलोशिप मिळवून उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी एमएची पदवी घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. वयाची पंच्याहत्तरी पार केल्यानंतरही कर्नाड कार्यरत होते. सार्वजनिक कार्यक्रम, चर्चासत्रे व साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर हजेरी लावत होते. आपली मतं ठामपणे मांडत होते. गिरीश कर्नाड यांनी त्यांची मतं वा भूमिका कधीच लपवल्या नाहीत. देशातील वाढती असहिष्णुता व साहित्यिक, पत्रकारांवर होणाऱया हल्ल्यांविरोधात त्यांनी निडरपणे आवाज उठवला. पत्रकार गौरी लंकेश आणि ज्येष्ठ विचारवंत एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यांमध्ये ते सहभागी झाले होते. देशातील पुरोगामी चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. सर्जनशील, विद्रोही, विविधांगी आणि कसदार लेखनामुळे त्यांची प्रतिमा कायम दीपस्तंभासारखी राहील.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या