आभाळमाया – तारे जमीं पर?

>> वैश्विक ([email protected])

तारे जमीं पर’ नावाचा आमीर खानचा अप्रतिम सिनेमा सर्वांना माहीत आहे. जमिनीवरच्या दुर्लक्षित मानवी ताऱयांचं तेज त्यातून दाखवलंय, पण खरंच आपण पृथ्वीवर राहणाऱयांचा आणि अवकाशातील खऱ्याखुऱ्या ताऱयांचा काही संबंध आहे का? कुठून आलो आपण म्हणजे सजीव या पृथ्वीवर? आपल्याभोवतीच्या चराचरात सामावलेली जी मूलतत्त्व किंवा द्रव्यं आहेत ती तरी कुठून आली?

याचा विचार करायचा म्हणजे पार पृथ्वीच्या जन्मापर्यंत जावं लागतं. आपला जीवनदाता सूर्य पाच अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आल्यावर त्याच्याभोवती फिरणाऱ्या एकेका ग्रहाची निर्मिती त्याच्यातीलच द्रव्यातून झाली. म्हणून तर तो जन्मदाता किंवा जन्मतारा. केवळ पृथ्वीच नव्हे तर सूर्याभोवती परिक्रमा करणारे सारे दूरस्थ ग्रहसुद्धा सूर्याचीच निर्मिती. आपल्याकडच्या प्राचीन संकल्पनेत केवळ शनीला ‘रविपुत्र’ म्हटलंय, पण खगोलशास्त्र्ाात अवघी ग्रहमाला सूर्यप्रणितच आहे.

आता हा सूर्य निर्माण झाला तो एका तेजोमेघातून. त्याचा आकार आणि वस्तुमान इतकं विशाल आहे की, 110 पृथ्वी एकापुढे एक ठेवल्या तर सूर्याचा व्यास पूर्ण होईल. म्हणजे तो 14 लाख कि.मी. आहे. बरं, या भास्कराचं वस्तुमान (त्यातील द्रव्य-वजन इ.) इतर सर्व ग्रहांच्या तुलनेत 98 टक्के असून एका पारड्यात सूर्य ठेवला आणि दुसऱ्या पारड्यात अख्खी ग्रहमाला ठेवली तर समग्र ग्रहमाला फक्त दोन टक्के भरेल. अगदी गुरू-शनीसारखे मोठे ग्रह जमेस धरूनसुद्धा सूर्याशी स्पर्धा करता येत नाही.

सूर्यासारखे तारेसुद्धा जन्मतात आणि नष्ट होतात. पाच अब्ज वर्षांनी आपला सूर्य ‘विझेल’ आणि त्याचं व्हाइट ड्वार्फमध्ये (श्वेतखुजात) रूपांतर होईल. पृथ्वी, मंगळापर्यंतचे ग्रह त्याच्या सपाट्यात येऊन आधीच नष्ट होतील, पण ती झाली पुढची गोष्ट. ताऱयांचाही जीवनक्रम असतो. तो जाणून घेण्याच्या वेळी ती माहिती घेऊ. आता विचार केवळ ताऱयांच्या जन्माचा. एका विशाल तेजोमेघातून (नेब्युला) तारा जन्म घेतो. मृग नक्षत्रामधल्या प्रसिद्ध तेजोमेघात (एम-42) 10 हजार सौरमाला जन्माला येतील एवढं प्रचंड द्रव्य आहे. निरभ्र रात्री मनोहारी मृग नक्षत्र मिट्ट काळोख असताना (प्रकाश प्रदूषणविरहीत आकाशात) पाहता आलं तर हा तेजोमेघ नुसत्या डोळय़ांनीही दिसतो. दुर्बिणीतून तर फारच छान दर्शन देतो.

अशाच एका तेजोमेघाची निर्मिती म्हणजे आपला सूर्य. तसं पाहिलं तर तो विश्वातील अगदीच सामान्य तारा आहे, पण आपल्या दृष्टीने अनन्यसाधारण. तेजोमेघामध्ये जी मूलद्रव्यं असतात त्याची घुसळण होत कालांतराने तारे जन्माला येतात. या घुसळणीत मुख्यत्वे हायड्रोजन वायूचं हिलियममध्ये रूपांतर करणारी नैसर्गिक अणुभट्टी तयार होते. तिथलं तापमान अर्थातच कोटी कोटी सेल्सियस किंवा केल्विन असतं ते ‘केल्विन’ मापात मोजलं जातं.

या तप्त वायुगोल असणाऱ्या ताऱ्यातच ‘फोटॉन’ म्हणजे प्रकाशकणांचा जन्म होतो. तेसुद्धा धडपडत आस्तेकदम ताऱ्याच्या पृष्ठभागावर येतात आणि मग सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगाने धाव घेतात. तोच प्रकाशकिरण या प्रकाशाचा वर्णपट घेतला तर त्यामध्ये जसे सप्तरंग आढळतात तशाच काही काळ्या रंगाच्या विशिष्ट रेषाही आढळतात. फ्रॉनहॉपर या संशोधकाचे नाव त्यांना लाभले आहे.

काय सांगतात या रेषा? तर ताऱ्यात कोणती द्रव्यं आहेत ते सांगतात. त्यामध्ये विविध प्रकारची खनिजं सामावलेली असतात. पृथ्वीवरच्याच नव्हे, तर ग्रहमालेतील सर्वच ग्रहांवरील चराचराची निर्मिती सूर्याचीच करामत आहे. थोडक्यात काय तर ग्रहांवरचीं खनिजं ताऱयांमुळे निर्माण होतात. पुढे त्या ग्रहावर अनेक वैश्विक योगायोगांनी जो सजीव जन्माला येतो त्यामध्येही ती असतातच.

उदाहरणार्थ, आपल्या शरीरातील अस्थी आणि दातांमधलं कॅल्शियम शरीरातलं ऐंशी टक्के पाणी, केस-नखांमधलं ‘प्लॅस्टिक’ या सगळ्या गोष्टी म्हणजे अप्रत्यक्षपणे जनकताऱ्याचीच देणगी आहे. याचाच अर्थ असा की, आपलं आपल्या पृथ्वीशी आणि सूर्याशीही थेट नातं आहे. सूर्यामध्ये पृथ्वीवर सजीव घडवणारी मूलद्रव्यं नसती तर आपणही अवतरलो नसतो. त्यामुळे प्रसंगी ‘ताप’ देणाऱ्या या ताऱयांविषयी कृतज्ञच असायला हवं. एका प्रकारे पृथ्वीवरचे सारे सजीव-निर्जीव हे ताऱयांचेच ‘जमीं’ पर असलेले अंश आहेत. बुद्धीने ‘स्वयंप्रकाशी’ होणं मात्र आपल्या हाती आहे. जीवनात ‘तारा’ व्हायचं की परप्रकाशित ग्रह हे ज्याचं त्यानं ठरवायचं!

आपली प्रतिक्रिया द्या