लेख : वेब न्यूज : एलियन्स नक्की आहेत का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

‘एलियन्स’ अर्थात ‘परग्रहवासी’ हा अखिल मानवजातीचा कायमच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. एलियन्स, त्यांचे प्रगत तंत्रज्ञान, त्यांच्या उडत्या तबकड्या आणि बरेच काय हे कायमच चर्चेचा विषय राहिलेले आहेत. एलियन्स या एका विषयाला वाहिलेल्या हजारो कादंबऱ्या, कथा, चित्रपट आणि एलियन्सना प्रत्यक्षात पाहिल्याचे छातीठोकपणे सांगणारे लोक असे काही ना काही सतत आपल्या समोर येतच असते. मात्र एलियन्सच्या अस्तित्वावर विश्वास असणाऱ्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.

नुकत्याच राबवण्यात आलेल्या एका प्रचंड मोठ्या शोधमोहिमेत पृथ्वीच्या आसपासच्या तब्बल 1327 ताऱ्यांचे निरीक्षण आणि अभ्यास करण्यात आला. त्यात कुठेही परग्रहवासीयांच्या अस्तित्वाचा लहानसा पुरावादेखील मिळू शकलेला नाही. ‘Search for Extraterrestrial Intelligence (SETI)’ नावाने ही शोधमोहीम राबवण्यात आली होती. ‘तांत्रिकदृष्टय़ा तरी एलियन्स अस्तित्वात नाहीत असे आता स्पष्टपणे म्हणायला हरकत नाही’ अशी निराशा या मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. जरी या मोहिमेला यश मिळाले नसले तरी काही तज्ञांनी मात्र याबद्दल वेगळेच मत व्यक्त केले आहे. एलियन्स किंवा त्यांच्या सिग्नल्ससाठी राबवण्यात आलेली ही मोहीम कदाचित चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर करण्यात आली असेल किंवा हे एलियन्स सिग्नल्स रेडिओ इंटरफेसच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीपासून लपवलेलेदेखील असू शकतात. शक्यता अनेक आहेत. मात्र ही मोहीम फसली म्हणून लगेच काही तर्क ठाम करावा असे शास्त्रज्ञांना अजूनही वाटत नाही. ‘Breakthrough Listen initiative’ या योजनेचा एका भाग असलेली ही मोहीम संपूर्ण दहा वर्षांसाठी रशियन बिलेनियर ‘युरी मिल्नेर’ यांनी प्रायोजित केलेली होती. या मोहिमेसाठी त्यांनी 100 मिलियन डॉलर्स एवढा अवाढव्य खर्चदेखील उचलला. शक्य तेवढय़ा अंतराळाचा ठाव घेणे, दुसऱ्या विश्वाचा शोध घेणे आणि त्या विश्वातील तंत्रज्ञांनी काही सिग्नल सोडले असल्यास अथवा संपर्काची इतर काही साधने उभी केली असल्यास त्यांचा माग घेणे हे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.