रावणाचे पुष्पक विमान, श्रीलंका ते हिंदुस्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

रावणाचे पुष्पक विमान हे सत्य असून रावण हा विश्वातला पहिला वैमानिक होता यावर असंख्य श्रीलंकन जनतेचा ठाम विश्वास आहे. आता या विषयावर वैज्ञानिक संशोधन करून आपले प्राचीन वैभव पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार खुद्द श्रीलंकेच्या सरकारने केला आहे आणि यासाठी श्रीलंकन संशोधकांच्या मदतीसाठी हिंदुस्थानी संशोधकांनादेखील आमंत्रण देण्यात आले आहे.

आपल्या हिंदुस्थानात करोडो रामभक्त आहेत. रामावर श्रद्धा असणारे, रामायणावर विश्वास ठेवणारे हे लोक फक्त आपल्या देशात आहेत असे नाही बरं. श्रीलंकेतदेखील रावण, त्याची सोन्याची लंका आणि त्याचे पुष्पक विमान यावर श्रद्धा असणारे, त्याचे आकर्षण असणारे अनेक श्रीलंकावासी आहेत. रावणाचे पुष्पक विमान हे सत्य असून रावण हा विश्वातला पहिला वैमानिक होता यावर असंख्य श्रीलंकन जनतेचा ठाम विश्वास आहे. आता या विषयावर वैज्ञानिक संशोधन करून आपले प्राचीन वैभव पुन्हा मिळवण्याचा ठाम निर्धार खुद्द श्रीलंकेच्या सरकारने केला आहे आणि यासाठी श्रीलंकन संशोधकांच्या मदतीसाठी हिंदुस्थानी संशोधकांनादेखील आमंत्रण देण्यात आले आहे.

राजाधिराज रावण हा जगातला पहिला वैमानिक होता आणि त्याच्या काळात त्याच्या नगरीत, अर्थात लंकेत विमाने आणि विमानतळदेखील होते असा अनेकांचा दावा आहे. मात्र त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे अनेक संशोधक ठामपणे सांगतात. आता हा त्यांचा दावा खोडून काढण्यासाठी आणि वैज्ञानिकतेचा युक्तिवाद फेटाळून लावण्यासाठी तिथे काही संशोधक स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवातदेखील केली आहे.

साधारण दोन वर्षांपूर्वी पुरातत्त्व शास्त्रज्ञ, इतिहासकार, नागरी हवाई क्षेत्रातील तज्ञ, शास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ अशा अनेक महारथींची मांदियाळी श्रीलंकेतील कोलंबो येथे भरली होती. या परिषदेत रावणाने पहिले विमान श्रीलंकेहून हिंदुस्थानपर्यंत चालवत नेले आणि परत आणले असा ठाम निष्कर्ष काढण्यात आला. या यशस्वी परिषदेचे आयोजन झाल्यावर ताबडतोब तत्कालीन श्रीलंकन सरकारने या संशोधनासाठी 5 दशलक्ष श्रीलंकन रुपयांची मदत जाहीर केली. सध्याच्या राजेपक्षे सरकारलादेखील या संशोधनात प्रचंड रस असून या संशोधनाला त्यांनी महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जादेखील दिला आहे. ‘कोरोना’च्या उद्रेकामुळे थांबलेले संशोधनाचे कार्य हे संशोधक नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा जोमाने सुरू करणार असून त्यांच्या जोडीला या विषयात रस असणाऱया हिंदुस्थानी संशोधकांनादेखील आमंत्रण पाठवण्यात आले आहे. हिंदुस्थान सरकारनेदेखील या संशोधनात सहभागी व्हावे आणि श्रीलंका आणि हिंदुस्थान यांच्या प्राचीन वैभवाची आणि तंत्रज्ञानातील प्रगतीची ओळख जगाला करून द्यावी असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

आपल्या देशात रामायण, महाभारत यांना काल्पनिक समजले जाते. अगदी विविध माध्यमांतून त्यातील पात्रांची टरदेखील उडवली जाते. मात्र श्रीलंकेत याच्या अगदी उलट परिस्थिती असून रामायण आणि त्यातील सर्व पात्रे ही अगदी सत्य होती असा तिथला विश्वास आहे. श्रीलंकेतर्फे अवकाशात सोडण्यात आलेल्या एका उपग्रहाला तर चक्क रावणाचे नावदेखील देण्यात आलेले आहे.

श्रीलंकेत सुरू असलेल्या या संशोधनाला पाठिंबा देण्यात राजकारण्यांबरोबरच तिथल्या अनेक सन्माननीय व्यक्तीदेखील पुढाकार घेत आहेत हे विशेष. श्रीलंकेचे आधुनिक पायलट म्हणवले जाणारे ‘रे विजयवर्धने’ यांचा या पुष्पक विमानाच्या सिद्धांतावर प्रचंड विश्वास होता. आता त्यांची पुतणी आणि श्रीलंकेतील एक अग्रणी पर्यावरणवादी, वास्तुविशारद असलेली सुनेला जयवर्धनेदेखील या संशोधनाला पाठिंबा देण्यास पुढे आली आहे. ‘The Line of Lanka – Myths & Memories of An Island’ या आपल्या पुस्तकात तिने रावण, पुष्पक विमान यासंदर्भात अत्यंत उत्कटतेने लिखाण केले आहे. ‘सध्याच्या आधुनिक युगात रावण आणि त्याचे विमानोड्डाण अनेकांना काल्पनिक वाटते. कारण पहिले विमान राईट बंधूंनी उडवले आणि जे काही आधुनिक किंवा प्राचीन तंत्रज्ञान आहे ते फक्त परदेशात निर्माण झाले आहे अशी आपल्या लोकांची एक मानसिकता बनून गेली आहे असे त्यांचे ठाम मत आहे.

[email protected]