रामराज्य पुन्हा अनुभवायचे असेल तर…

>> सुरेश जाखडे

आज प्रभू रामचंद्र व समर्थ यांच्या गुणांचे, कार्याचे स्मरण करावे असा दिवस. रामराज्य सर्वांना हवे, पण त्यासाठी कपट न करणारी विवेकबुद्धी हवी. श्रीराम, समर्थ रामदास यांचा पराक्रम, त्यांचे राष्ट्रप्रेम, विवेक, निःस्पृहता, सज्जनांचा आदर, जे सुधारण्याची शक्यता मावळली आहे. अशा दुष्ट दुर्जनांचा नाश इ. गोष्टी आचरणात आणल्या तर थोडय़ाफार प्रमाणात ‘रामराज्य’ अनुभवता येईल.

आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. या दिवशी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. ‘दुष्ट, दुर्जनांचा नाश आणि संत सज्जनांचे रक्षण’ असे रामजन्माचे प्रयोजन थोडक्यात सांगता येईल. संत एकनाथ महाराजांनी ‘भावार्थ रामायणा’त हे रामजन्माचे प्रयोजन स्पष्ट केले आहे.

निजधर्माचे संरक्षण। करावया साधूंचे पाळण।

मारावया दुष्टजन। रघुनंदन अवतरला।।

आजच्या रामनवमीच्या शुभ दिवशी रामदास स्वामींचाही जन्म झाला. तेव्हा दोघांच्याही अलौकिक चरित्राचे व कार्याचे आज स्मरण केले पाहिजे. म्लेछांच्या अन्यायी, अत्याचारी, हिंसक व हिंदुधर्म विध्वंसक कार्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून एक विलक्षण क्रांती केली. हिंदवी स्वराज्यासाठी रामराज्याची व रामाच्या आदर्शांची पार्श्वभूमी तयार करणे म्हणजेच धर्मस्थापना करणे. हे जीवितकार्य समर्थ रामदासांनी ठरवून त्याचा आयुष्यभर पाठपुरावा केला.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘श्रीराम हे पुरातन आदरणीय वीरपुरुष आहेत.  राम म्हणजे सत्याचा आदर्श, नीतिमत्तेचा आदर्श. तो आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श बंधू, आदर्श पिता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आदर्श राजा होता. असे अनेक गुण रामचरित्रातून अभ्यासता येतात. हिंदुस्थानच्या सांस्कृतिक इतिहासात रामाच्या आदर्शांना परमोच्च स्थान आहे आणि भविष्यातही ते तसेच राहील. रामदासस्वामींना वाटते की, या रामाच्या आदर्शांसाठी ‘रामकथा ब्रह्माण्ड भेदून पैलाड न्यावी.’ आज सर्व विश्वाला, मानवजातील या आदर्शांची नितांत गरज आहे. राज्याच्या उत्तराधिकारी असूनही रामाने पित्याच्या वाचनपूर्तीसाठी 14 वर्षे वनवास पत्करला. त्या काळात रावणासारख्या दुराभिमानी सम्राटाचा नाश केला. परत आल्यावर राज्यभार स्वीकारून आदर्श पद्धतीचे रामराज्य निर्माण केले. राजाने अलिप्त राहून निःस्पृहपणे राज्य कारभार करावा व प्रजेला सुखी समाधानी ठेवावे अशी राज्यपद्धती रामराज्याशिवाय इतरत्र दिसून येत नाही.

हे ‘रामराज्य’ कसे होते यासाठी समर्थ रामदासस्वामींनी मानपंचक या प्रकरणात रामराज्याचे सुरेख वर्णन केले आहे. त्यातील भावार्थ आजही सर्वांना मार्गदर्शक आहे. स्वामी म्हणतात –

राज्य या रघुनाथाचे/कळीकाळासी नातुडे।

बहुवृष्टी अनावृष्टी। हे कदा घडे जनीं।।

उद्वेश पाहता नाही। चिंता मात्र नसे जनी।

व्याधी नाही रोग नाही। लोक आरोग्य नांदती।।

राज्यराज्य सात्त्विकतेवर आधारले असल्याने काळालाही त्याच्यावर सत्ता चालवता येत नाही. या राज्यात पावसाची अतिवृष्टी झाल्याने येणारे दुर्भिक्ष नाही, तसेच पावसाअभावी येणारा दुष्काळ नाही. कारण लोक निसर्गनियमांचे पालन करणारे होते. हिंदू संस्कृती सांगते की निसर्गाविषयी पूज्य भाव ठेवा, निसर्गाशी कृतज्ञ राहा. त्यांच्याही भावभावनांचा आदर केला तर परस्पर सहकार्य मिळेल. निसर्गाशी दुर्वर्तन कराल तर तुम्हाला तसाच प्रतिसाद मिळेल. रामराज्यात खिन्नता, तिटकारा, भय, द्वेष, चिंता नाही. कारण यात अनेक रोगांचे बीज दडले आहे. हे नसल्याने प्रजा आरोग्यपूर्ण उच्च जीवन अनुभवत होती.

युद्ध नाही अयोध्या। राग ना मछरू नसे।

बंद निर्बंदही नाही। दंड दोष कदा नसे।।

रामराज्यात कोणाशी वैर नाही. कुठे सूडाची भावना नाही. सर्वत्र सहकार्याचे, मैत्रीचे वातावरण असल्याने तेथे भानगडी, कटकटी नाहीत. निःस्वार्थ बुद्धीने राज्य कारभार चालल्याने शेजारच्या राज्याशी संबंध चांगले होते. रामाचा पराक्रम माहीत असल्याने शेजारची राज्ये आगळीक करण्याची हिंमत करीत नसत. त्यामुळे युद्धाचा प्रश्नच नाही. रामाच्या राजधानीचे नावच ‘अ-योध्दा’ असे आहे. राज्यातील लोक स्वयंशिस्त मानणारे, समंजस असल्याने त्या राज्यात भांडणतंटे, खून, मारामाऱया, चोरी, भ्रष्टाचार हा विचार नाही. मग अशा प्रजेसाठी बंध, निर्बंध, शिक्षा, तुरुंग हवेत कशाला? आज आपण सर्वत्र बघतो तर लोक सरकारने घालून दिलेले नियम पाळत नाहीत. मग त्यांच्यासाठी कडक निर्बंध करावे लागतात. रामराज्यात लोक समंजस असल्याने त्यांच्यासाठी दंडाचे प्रावधान नव्हते.

बोलणे सत्य न्यायाचे। अन्याय सहसा नसे

अनेक वर्तती काया। येकजीव परस्परें।।

रामराज्य हे सत्याचे, न्यायाचे आहे. तेव्हा बोलणेही सत्याचे असे. त्यात खोटेपणाला, दांभिकतेला, भ्रष्टाचाराला वाव नसे. जे बोलायचे, वागायचे ते न्यायाला धरून असले पाहिजे. तेथे नेहमी ‘अ-न्याय’ आढळणार नाही. सर्वांचे आपापसात मैत्रीचे संबंध होते. लोक एकोप्याने राहात असल्याने त्यांचे देह जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा आत्मा, जीव एक आहे अशा भावनेने ते वागत. तेथे सत्याचे व न्यायाचे साम्राज्य होते.

दरिद्री धुंडता नाही। मूर्ख तो असेचिना।

परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो।।

लोक सुखी, समाधानी व उद्योगप्रिय असल्याने तेथे दरिद्री माणूस शोधूनही सापडणार नाही. विचारी विवेकी लोकांत मूर्ख असण्याची शक्यताच नाही. त्या राज्यात परोपकाराला व लोकसंग्रहाला महत्त्व होते. लोकसमुदायाने अनेक विकास कामे सहज पार पाडता येतात.

मठमाडय़ा पर्णशाळा। ऋषी आश्रम साजिरे।

वेदशास्त्र धर्मचर्चा। स्नानसंध्या तपोनिशी।।

ऋषी मुनींना अकारण त्रास देणाऱया राक्षसांना रामाने मारून संपवले होते. रामराज्यातील प्रजा केवळ पोटार्थी नव्हती. बौद्धिक पातळीवर त्याचे समाजमन सुसंस्कारित होते. स्नानादी क्रियांनी शुचिर्भूत होऊन जागोजाग, मठ, पर्णशाळा आश्रम यातून धर्मशास्त्रावर चर्चा चाले. त्यातून मौलिक तत्त्वे प्रजेला मिळत. त्यामुळे सारासार विचार, विवेक याचे ज्ञान मिळत असे.

चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे।

संतोष समस्तै लोका। रामराज्य भूमंडळी।।

रामराज्यातील प्रजा आनंदी, सुखी होती. समर्थांच्या मते हा आनंद धार्मिक, स्वातंत्र्य उपभोगण्याचा होता. तो भौतिक नसून आध्यात्मिक होता. त्यामुळे कायम टिकणारा होता.

आज प्रभू रामचंद्र व समर्थ यांच्या गुणांचे, कार्याचे स्मरण करावे असा दिवस. रामराज्य सर्वांना हवे, पण त्यासाठी कपट न करणारी विवेकबुद्धी हवी. श्रीराम, समर्थ रामदास यांचा पराक्रम, त्यांचे राष्ट्रप्रेम, विवेक, निःस्पृहता, सज्जनांचा आदर, जे सुधारण्याची शक्यता मावळली आहे. अशा दुष्ट दुर्जनांचा नाश इ. गोष्टी आचरणात आणल्या तर थोडय़ाफार प्रमाणात ‘रामराज्य’ अनुभवता येईल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या