ठसा – रवींद्र रसाळ

1744

>> अनिकेत कुलकर्णी

मराठवाडय़ातील ज्येष्ठ पत्रकार तथा ‘गोदातीर समाचार’चे संपादक रवींद्र रसाळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवसाचा समारंभ 29 डिसेंबर रोजी होता; पण तत्पूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मराठी ग्रामीण पत्रकारितेत पीएच.डी. मिळवणारे ते पहिले संपादक होते. विज्ञानाची दृष्टी असलेला बहुआयामी संपादक काळाच्या पडद्याआड गेला आहे. रसाळ यांचा पिंडच संघर्ष करण्याचा होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी त्यावेळी मराठवाडय़ातील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व केले. मराठवाडय़ाच्या विकासासाठी व परभणीस कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी ते आंदोलन होते. ब. ल. तामसकर आणि विजय गव्हाणे यांच्या साथीने रसाळ यांनी या आंदोलनात स्वतŠला झोकून दिले. त्यांच्या घरी स्वातंत्र्यसैनिक शोएब उल्ला खान व स्वातंत्र्यसेनानी रामानंद तीर्थ येत असत. रवी बाबूंमध्ये संघर्षाच्या बीजाची पेरणी त्यातूनच झाली. रसाळ अभ्यासातही हुशार होते. नांदेडच्या सायन्स कॉलेजमधून एम.एस्सी. विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्यातले टॅलेंट ओळखून प्राचार्य कालिदास देशपांडे यांनी रवीबाबूंना वैज्ञानिक होण्याचा सल्ला दिला. रवीबाबूंनी त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली होती. पण त्यांचे वडील, दै. ‘गोदातीर समाचार’चे संस्थापक संपादक देवीदासराव रसाळ यांच्या निधनाने या वृत्तपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी रसाळ यांच्यावर पडली आणि त्यांच्या करीयरची दिशाच बदलली. पण या बदललेल्या करीयरमध्येही त्यांनी आपले प्राण ओतले. विविध विषयांवर वस्तुनिष्ठ अग्रलेख लिहून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. संपादकाची जबाबदारी सांभाळत त्यांनी विज्ञान चळवळीतही सक्रिय सहभाग नोंदवला. भूकंपशास्त्र्ाात त्यांनी लेखन केले. नांदेडमध्ये भूकंपमापक यंत्रणा बसवली गेली ती रवीबाबूंच्या प्रयत्नानेच. त्यांना विज्ञान चळवळ खूप पुढे न्यायची होती. नांदेड हे विज्ञान चळवळीचे केंद्र व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. पण नियतीने त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. रवींद्र रसाळ यांचा राजकीय, आंतरराष्ट्रीय विषयावर खूप दांडगा अनुभव होता. कश्मीरच्या विषयावर त्यांनी अनेक अग्रलेख लिहिले. ग्रामीण भागात वार्ताहरांची फळी निर्माण करण्याचे काम त्यांनी आपल्या काळात केले. वेगवेगळय़ा विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके ही अभ्यासपूर्णच होती. मराठवाडय़ातील वेगवेगळय़ा विकास आंदोलनांच्या बाबतीत हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ग्रामीण भागाचा विकास, शिक्षण व नवीन तंत्रज्ञान आदी प्रश्नांवर त्यांनी आपली लेखणी झिजवली. यासंदर्भात आलेल्या नव्यानव्या पुस्तकांचा अभ्यास करून व ती वाचून त्यावर चर्चा करायची. ग्रामीण भागातील मूळ प्रश्न व ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीने होईल याबाबत त्यांनी मराठवाडा विकास आंदोलनात आवाज उठविला होता. बेकारी, महागाई या विषयांवरदेखील त्यांनी आपल्या लेखणीतून कडाडून हल्ला चढविला होता. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शरद जोशी यांच्यासमवेत त्यांनी सहभागही नोंदवला. त्यांच्या आंदोलनाला पूरक असे लिखाण त्यांच्या लेखणीतून झाले. 1989 साली ग्रामीण भाषिक वृत्तपत्रावरील डॉक्टरेट ही पदवी मिळविणारे डॉ. रवींद्र रसाळ हे मराठवाडय़ातील पहिले विद्यार्थी ठरले. लातूरचा भूकंप झाल्यानंतर त्यावर त्यांनी केलेला अभ्यास व शासनाला सादर केलेला अहवाल यावरदेखील बरीच चर्चा झाली. त्यातील अनेक उपाययोजनांचा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी अभ्यास करून त्यानुसार भूकंपग्रस्त भागात योग्य त्या सूचना दिल्या होत्या. याबाबत विलासराव देशमुख यांच्यासमवेत अनेकदा त्यांच्या भेटी झाल्या होत्या. एक तत्त्वनिष्ठ संपादक, वैज्ञानिक आणि पत्रकारितेचे चालते बोलते व्यासपीठ त्यांच्या जाण्याने हरपले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या