लेख -सोशल मीडियाचा उबग!

>> महेश कोळी

आभासी दुनियेशी संबंधित अनेक व्यावहारिक पैलू आणि जोखीम लोकांना या दुनियेत वेळ घालवण्यापासून रोखत आहे. त्याचप्रमाणे आभासी लोकप्रियतेतून निर्माण झालेले गुंते आणि वास्तव या गोष्टीही लोकांना समजू लागल्या आहेत. ही जाण आणि वास्तवाचा स्वीकार या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. कारण या आभासी दुनियेत अमर्याद वेळ व्यतीत करण्याची सवय हा व्यक्तिगत दिनचर्येशी आणि स्वयंशिस्तीशी संबंधित मुद्दा आहे.

फेसबुकची मातृ कंपनी असणाऱ्या मेटा या बहुचर्चित सोशल मीडिया कंपनीला गेल्या अठरा वर्षांत पहिल्यांदाच मोठा तोटा झाला आहे. फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्याही प्रचंड घटली आहे. ताज्या अहवालानुसार, फेसबुकच्या सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये आतापर्यंत दरवर्षी चार टक्क्यांनी वाढ होत राहिली आहे. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांकडून मिळणाऱ्या जाहिरातींमधून फेसबुक कंपनी मोठा महसूल मिळवते. त्यामुळे गेल्या तिमाहीपासून कंपनीला दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये वाढीची अपेक्षा होती, परंतु ही संख्या अपेक्षेनुसार वाढली नाही. त्यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर दुष्परिणाम झाला असून कंपनीचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी घटले आहे. कंपनीने यासाठी नव्या सोशल मीडिया मंचना आणि त्यांच्याकडून दिल्या जात असलेल्या विविध सुविधांना जबाबदार मानले आहे.

ऍपल कंपनीने लोकांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे जे धोरण ठेवले आहे, तेही आपल्या घटत्या व्यवसायाचे कारण असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. कारण लोकांची सर्वच प्रकारची खासगी माहिती शेअर न करण्याच्या धोरणामुळे जाहिराती मिळण्यात आणि त्यायोगे महसुलात अडथळे आणतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. वास्तविक आभासी दुनियेतील सर्वात लोकप्रिय मंच असलेल्या फेसबुककडे वापरकर्त्यांनी पाठ फिरवायला सुरुवात करण्याची अनेक कारणे आहेत. आपल्या नफ्यात झालेली घट ही अन्य मंचकडून उपलब्ध केल्या जात असलेल्या सुविधांच्या वाढत्या यादीमुळे आणि खासगी माहिती शेअर होऊ नये म्हणून केलेल्या तांत्रिक सेटिंगमुळे झाली असल्याचे फेसबुककडून सांगितले जात असले तरी त्यामागे सामाजिक, मानसशास्त्रीय आणि वैयक्तिक कारणांचीही प्रचंड मोठी यादी आहे. खासगीकरणात अडथळे आणण्यापासून विनाकारण असामाजिक व्यस्तता, आभासी सक्रियतेमुळे निर्माण झालेला तणाव आणि वास्तव जीवनाकडे पाठ फिरवून क्रीनमध्ये डोकावण्यात खर्ची पडणारा वेळ वाढणे या कारणांमुळेही वापरकर्ते सोशल साइट्सपासून दूर जात आहेत.

अमेरिकी मानसशास्त्रज्ञ संघटनेच्या मते, फेसबुकचा वापर करून अन्य कामे केल्यास माणसाची उत्पादकता चाळीस टक्क्यांनी घटते. त्यामुळेच व्यक्तिगत जीवनापासून कामाच्या आघाडीपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक या मायावी जगात गुरफटून गेल्यामुळे निर्माण झालेली जोखीम आणि संघर्ष समजून घेऊ लागले आहेत. परिणामी, या आभासी दुनियेपासून दूर जाऊ लागले आहेत. गेल्या काही महिन्यांत मेटा कंपनीने आपले संपूर्ण लक्ष जाहिराती दाखविण्यावर केंद्रित केले आहे, हे वापरकर्त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे या मंचवर वापरकर्त्यांनी शेअर केलेली सामग्री पूर्णतः उपेक्षित राहत आहे. एवढेच नव्हे, तर खासगी माहिती शेअर करण्यापासून नकारात्मक आणि द्वेषमूलक सामग्रीचा झालेला विस्तार आणि मानवी तस्करीच्या समस्येशी संबंधित आरोपसुद्धा फेसबुकवर कायम झाले आहेत. आपल्या देशात हे माध्यम फेक न्यूजसाठी बऱ्याच अंशी चर्चेत असते.

या असामाजिक, दिखाऊ, बनावट दुनियेपासून लोक दूर होत चालले आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा मंचवर वाया जाणारा वेळ उपयोगात आणण्याविषयी निर्माण झालेली जागरुकता होय. गेल्या दोन वर्षांत कोविड काळात बदलत्या जीवनशैलीने लोकांचा क्रीनटाइम आणखी वाढविला. शाळा, कार्यालये आणि इतर आवश्यक बाबींशी संबंधित माहिती मिळविण्याचा मुद्दा असो किंवा सामान्य दिनचर्येशी संबंधित देवाणघेवाणीचे व्यवहार असोत, संपूर्ण जगच आभासी दुनियेत अधिकाधिक वेळ खर्ची घालत होते, परंतु आता अनेक जणांना असे वाटू लागले आहे आणि स्वीकारलेही जाऊ लागले आहे की, आवश्यकता म्हणून असो किंवा कामातून विरंगुळा म्हणून असो, सतत ऑनलाइन राहण्याची सवय अनेक व्याधींनाही जन्म देऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या नार्टन सायबर सेफ्टी-2021 इनसाइट अहवालानुसार, कोविड महामारीमुळे जवळ जवळ तीनमधील दोन म्हणजे 66 टक्के लोकांना ऑनलाइन राहण्याची सवय जडली आहे. अहवालात म्हटले आहे की, हिंदुस्थानात शैक्षणिक घडामोडी आणि कार्यालयीन कामकाज यांच्या व्यतिरिक्त दररोज सरासरी चार- चार तास क्रीनसमोर व्यतीत केले जातात.

याचबरोबर दहापैकी आठ म्हणजे 82 टक्के लोकांनी असे कबूल केले आहे की, कोरोना महामारीच्या काळात शिक्षण आणि कामाव्यतिरिक्तही बराच काळ फोनवर खर्च होत असे. या सर्वेक्षणात 72 टक्के हिंदुस्थानी प्रौढांनी मान्य केले आहे की, क्रीनटाइम अधिक असल्यामुळे त्यांच्या शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत, तर 55 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की, यामुळे मनःस्वास्थ्यावर अधिक प्रतिकूल परिणाम होत आहेत. ब्रिटनमधील फील गुड कॉन्टॅक्टच्या आकडेवारीनुसार, कोरोना काळात हिंदुस्थानी क्रीनटाइममध्ये झालेली वाढ आणि दृष्टी अधू होण्याच्या घटनांमध्ये घनिष्ट संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहे. दृष्टी अधू होण्याच्या तक्रारींबाबत हिंदुस्थान जगात आता पहिल्या स्थानी आला आहे. सुमारे 27.5 कोटी हिंदुस्थानी म्हणजेच आपल्या लोकसंख्येचा 23 टक्के हिस्सा अत्याधिक क्रीनटाइममुळे दृष्टीच्या कमकुवतपणाच्या समस्येशी झुंजत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, फील गुड कॉन्टॅक्टने ही आकडेवारी लॅन्सेट ग्लोबल हेल्थ, डब्ल्यूएचओ आणि क्रीनटाइम ट्रेकर डाटा रिपोर्टलच्या माध्यमातून एकत्रित केलेली आहे. वास्तविक, आभासी दुनियेशी संबंधित अनेक व्यावहारिक पैलू आणि जोखीम लोकांना या दुनियेत वेळ घालवण्यापासून रोखत आहे.

त्याचप्रमाणे आभासी लोकप्रियतेतून निर्माण झालेले गुंते आणि वास्तव या गोष्टीही लोकांना समजू लागल्या आहेत. ही जाण आणि वास्तवाचा स्वीकार या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. कारण या आभासी दुनियेत अमर्याद वेळ व्यतीत करण्याची सवय हा व्यक्तिगत दिनचर्येशी आणि स्वयंशिस्तीशी संबंधित मुद्दा आहे. प्रत्येक वयोगटातील ऑनलाइन आणि ऑफलाइन काळामध्ये उत्तम संतुलन राखले गेले तर आभासी सामाजिकता आणि वास्तव जग यांच्यातील दुव्यांमध्येही संतुलन निर्माण होईल. हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, सुरुवातीला लोक संपर्क वाढविण्यासाठी आणि जगभरातील लोकांशी जोडून घेण्यासाठी सोशल मीडिया मंचचा वापर करीत असत, परंतु हळूहळू लोक आपल्याच जीवनापासून दूर जाऊ लागले. स्वतःच्या जीवनापासून निर्माण झालेल्या अंतरामुळे जे तोटे होतात, ते आता दिसू लागले आहेत. खरोखरच या आभासी मंचाने लोकांना वास्तव जीवनापासून दूर नेले आहे.

(लेखक संगणक अभियंता आहेत)